मोदी लागले योग दिनाच्या तयारीला; ॲनिमेटेड व्हिडिओ व्हायरल

    दिनांक  07-Jun-2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिवसाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. गुरुवारी मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ताडासन व त्रिकोणासन या योग प्रकाराचे ॲनिमेटेड व्हिडिओ शेअर केले. यासोबतच त्यांनी आपण येत्या २१ जूनला योग दिन साजरा करत असल्याचे सांगत, योगाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे योगास आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवा आणि इतरांनाही योगासने करण्यासाठी प्रेरित करण्याचे पंतप्रधान आवाहन मोदींनी केले.


शुक्रवारीही मोदींनी वृक्षासन योग प्रकाराचा व्हिडीओ शेअर करत, आपल्या शरीरास व आपल्या मेंदूस हा योग प्रकार उपयुक्त असल्याचे सांगितले आहे. लोकांना योगासने करण्याची प्रेरणा मिळावी व योगाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून संबंधित व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. मागील वर्षीही नरेंद्र मोदी यांनी अशाचप्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या प्रमोशनच्या पद्धतीचे सोशल मीडियामधून जोरदार स्वागत केले जात आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा सत्तेवर आल्यानंतर २०१५मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाची घोषणा केली होती. तेव्हापासून २१ जूनला योग दिवस साजरा केला जातो. सध्या केंद्रात भाजपची दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमताने सत्ता आल्याने २१ जूनच्या योग दिवसाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने यंदा केंद्र सरकारच्या माध्यमातून दिल्ली, सिमला, म्हैसूरु, अहमदाबाद तसेच रांची येथे विशेष कार्यक्रम होणार आहेत.


 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat