सुरक्षा दलाची मोठी कारवाई; चार दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

    दिनांक  07-Jun-2019 


जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठी कारवाई करत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. पुलवामा येथील लस्सीपोरा येथे सुरक्षा दलाच्या जवानांनी ही कारवाई केली. या दहशतवाद्यांकडून चार AK47 रायफली जप्त करण्यात आल्या असून परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याच कारणामुळे सुरक्षा दलाने आपली शोध मोहीम सुरूच ठेवली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाच्या जवानांना लस्सीपोरा भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती काही स्थानिकांनी दिली. माहिती मिळताच ४४ राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिसांचा विशेष कारवाई गट आणि सीआरपीएफच्या जवानांनी पुलवामामधील या भागात संयुक्त शोध मोहीम हाती घेतली होती. शोध मोहीम सुरू असतानाच परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. यानंतरच्या कारवाईत या चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

 

अनंतनागमध्ये जवानाची हत्या

 

अनंतनाग जिल्ह्यात ईद साजरी करण्यासाठी घरी आलेल्या प्रादेशिक सेनेच्या मंजूर अहमद बेग या जवानाची दहशतवाद्यांनी गोळी मारून हत्या केली. बेग काही दिवसांपासून लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्ससोबत काम करत होते. मात्र सध्या ते ईद साजरी करण्यासाठी आपल्या घरी आले होते. हीच संधी साधत दहशतवाद्यांनी सादूरा येथील त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat