दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘ग्रीन आयडिया २०१९’ चा समारोप

    दिनांक  07-Jun-2019मुंबई : ‘मुंबई तरुण भारत’ आयोजित ‘ग्रीन आयडिया २०१९’ या तीन दिवसीय महोत्सवाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. शुक्रवारी पार पाडलेल्या या महोत्सवाचा समारोप महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि नामवंत वन्यजीव संशोधकांचे परिसंवाद आणि ‘नदी वाहते’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने झाला. ५,६,७ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या या पर्यावरण महोत्सवाला प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली होती.

 

पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीव संवर्धनाच्या प्रबोधनाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ‘मुंबई तरुण भारत’ने तीन दिवसीय ‘ग्रीन आयडिया २०१९’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५, ६ आणि ७ जून रोजी हा कार्यक्रम ठाण्याच्या जांभळी नाका परिसरातील शिवाजी मैदानात आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात शुक्रवारी ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’चे संचालक तथा मुख्य वनसंरक्षक अन्वर अहमद उपस्थित होते. त्यांनी या महोत्सवाअंतर्गत मांडलेल्या विविध संस्थांच्या प्रदर्शनाला भेट दिली. शिवाय ‘मुंबई तरुण भारत’ने आयोजित केलेल्या या तीन दिवसीय महोत्सवाचे कौतुक केले.

 

सायंकाळी ‘गूढ सागरी कासवां’चे या सत्राअंतर्गत प्रसिद्ध कासवमित्र मोहन उपाध्ये आणि कासवतज्ज्ञ पशुवैद्यक डॉ. दिनेश विन्हेरकर यांच्यासोबत परिसंवादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोहन उपाध्ये यांनी उपस्थित वन्यजीवप्रेमींना सागरी कासवांच्या विणीपासून वनविभाग आणि कोकणातील स्थानिक ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सुरू असलेल्या संवर्धन मोहिमेची माहिती दिली, तर पशुवैद्यक विन्हेरकर यांनी सागरी कासवांना मानवनिर्मित कारणांमुळे होणाऱ्या जखमा आणि त्यावरील उपचारपद्धती यावर भाष्य केले. यानंतर ज्येष्ठ वन्यजीव संशोधक भाऊ काटदरे यांनी ‘गुपित खवले मांजरांचेया सत्राअंतर्गत कोकणातील खवले मांजर संवर्धन मोहिमेची माहिती उपस्थितांना दिली. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ या संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या खवले मांजर संवर्धनातील काही महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा त्यांनी या सत्राअंतर्गत केला. यानंतर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नदी वाहते’ या चित्रपटाचे प्रदर्शन पार पाडले. हा चित्रपट पाहण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

 

तीन दिवस पार पडलेल्या या महोत्सवाला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी, वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, ठाण्याचे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि उपायुक्त ओमप्रकाश दिवटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवात महाराष्ट्रात पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणासाठी कार्यरत असलेल्या ५० हून अधिक संस्था उपस्थित होत्या. त्यांनी मांडलेल्या प्रदर्शनाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याशिवाय तीन दिवस पार पडलेल्या वन्यजीवविषयक परिसंवादांना वन्यजीवप्रेमींना गर्दी केली होती. या महोत्सवाअंतर्गत ‘मुंबई तरुण भारत’ने बिबट्या संशोधक निकीत सुर्वे, समुद्री कासव संवर्धक मोहन उपाध्ये, डॉ. दिनेश विन्हेरकर, सागरी जीवतज्ज्ञ प्रदीप पाताडे, पक्षी अभ्यासिका तुहिना कट्टी आणि ज्येष्ठ वन्यजीव संशोधक भाऊ काटदरे यांनाग्रीन अव्हेंजर्स’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या कामाला ५० हजार रुपयांचा सहयोग निधी ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने देण्यात आला. यावेळी अशा प्रकारचा महोत्सव दरवर्षी आयोजित करण्याची मागणी प्रेक्षकांनी केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat