धारदार शस्त्राने क्रिकेटपटूची हत्या

    दिनांक  07-Jun-2019


 

मुंबई : दुचाकीमध्ये इंधन भरण्यासाठी मैत्रिणीसह पेट्रोलपंपावर आलेल्या एका क्रिकेटपटूची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी रात्री भांडुपमध्ये घडला. राकेश पवार असे हत्या झालेल्या क्रिकेटपटूचे नाव असून याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले असून पोलिसांकडून दिवसभर त्याचा तपास सुरु होता.

 

राकेश हा गुरुवारी रात्री भांडुपमधील महावीर पेट्रोल पंपाजवळ आपल्या मैत्रिणीसोबत आला. यावेळी पेट्रोलपंपावर २ ते ३ अज्ञात हल्लेखोर दबा धरून बसले होते. राकेश दुचाकीमध्ये इंधन भरत असताना हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात राकेशचा मृत्यू झाला. राकेशची हत्या झाल्याने त्याची मैत्रीणही संशयाच्या भोवऱ्यात अडकली. पोलिसांनी राकेशच्या त्या मैत्रिणीला ताब्यात घेतलं आहे. तर हत्या करणारे तिघे फरार झाले आहेत.

 

पूर्ववैमन्यसातून हत्या?

 

राकेश पवार हा विवाहित असून, त्याला दोन मुलंदेखील आहेत. राकेशची हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. राकेश पवार हा पेशाने क्रिकेटर असून, तो जिल्हास्तरावर क्रिकेट खेळत होता. तसेच तो लहान मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षणही देत होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat