निसर्गासाठी कार्य करणारा ‘इडियट’

    दिनांक  07-Jun-2019


 


‘बीएनएचएस’ या आंतरराष्ट्रीय मान्यता लाभलेल्या संस्थेत साहाय्यक संचालक (शिक्षण) या पदावर कार्यरत असलेल्या निसर्गवेड्या डॉ. राजू कसंबे यांची ही कर्तृत्वगाथा...


मुंबई ( अक्षय मांडवकर) : वैद्यकीय प्रतिनिधी ते पक्षी अभ्यासक असा एका माणसाचा प्रवास थक्क करणारा आहे. वयाच्या एका टप्प्यावर मनाविरुद्ध सुरू असलेल्या मात्र, स्थिर पगाराच्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी निसर्गकार्यास प्रारंभ केला. पक्षी त्यांचे सगेसोयरे झाले. एका पक्ष्यावर पीएच.डी. करून त्यांनी ‘डॉक्टरेट’ पदवी मिळविली. गेल्या कित्येक वर्षांपासून इंग्रजी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या पक्ष्यांचे त्यांनी मराठीत ‘बारसे’ केले. ग्रामीण विभागाचे प्रतिनिधित्व करणारे ते आता ’बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (बीएनएचएस) या आंतरराष्ट्रीय मान्यता लाभलेल्या संस्थेत साहाय्यक संचालक (शिक्षण) या पदावर कार्यरत आहेत. या निसर्गवेड्या माणसांचे नाव डॉ. राजू कसंबे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा या गावात डॉ. राजू कसंबे यांचा जन्म १५ एप्रिल, १९७१ साली झाला. शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आल्याने जगण्यासाठीचा संघर्ष राजू यांनी अनुभवला आहे. घरची परिस्थिती तशी जेमतेम. पाच बहिणी आणि चार भाऊ असा कुटुंबाचा मोठा गोतावळा. त्यामुळे बालपणी शेतात कामाला जा, रानात जा, बोरं खा अशा वातावरणात त्यांचे बालपण जात होते. याने मनात निसर्ग आस्थेची बीजं रोवण्यास मदत तर झाली; मात्र, त्याला दिशा देणारा कोणी मार्गदर्शक नव्हता. विज्ञान शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे नोकरी करण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर नव्हता. त्यामुळे मनात दडलेल्या निसर्गकार्याच्या इच्छेवर दगड ठेवून त्यांनी नोकरीला सुरुवात केली. एका बहुराष्ट्रीय औषध कंपनीत ते वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून रुजू झाले. नांदेड, औरंगाबाद, अमरावती, नागपूर असा त्यांचा प्रवास झाला.

 
 
 

 

या काळात निसर्गप्रेमाची ऊर्मी मनात जागृत ठेवून त्यांनी आठ वेगवेगळ्या पदव्या संपादित केल्या. १९९७ ते २००४ या कालावधीत त्यांनी अमवरावती येथील ’युथ हॉस्टेल्स असोसिएशन’ सोबत काम केले. पुढे अमरावतीला वन्यजीव आणि पर्यावरण संस्थेची स्थापना केली. या जिल्ह्यातील ‘नल-दमयंती’ सागराच्या मुखावर वर्धा नदीच्या थडीला वीण करणाऱ्या निळा शेपूटधारी शेपटीच्या ‘वेडा राघू’ या पक्ष्यावर संशोधन करून त्यांनी एमएस्सीची पदवी मिळवली. २००४ ते २०१० दरम्यान ते नागपुरामध्ये वास्तव्यास होते. येथे त्यांची ओळख डॉ. अनिल पिंपळापुरे आणि गोपाळराव ठोसर यांच्याशी झाली. येथे असताना त्यांनी फुलपाखरांवर संशोधन करून एम.फील. आणि ‘भारतीय राखी धनेश’वर संशोधन करून ‘आचार्य’ पदवी मिळविली. त्यावेळी विदर्भात पक्ष्यांचा अभ्यास करून त्यावर ‘आचार्य’ पदवी मिळविण्याची कसब कसंबे यांनी दाखविली. याच दरम्यान नागपूर येथील महाराज बाग परिसरात नियमित पक्षीनिरीक्षणाकरिता त्यांचे येणे-जाणे होते. याठिकाणी येणारा ‘भारतीय राखी धनेश’ पक्षी त्यांना खुणावत होता. हा पक्षी कसंबे यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. या पक्ष्यावर पीएच.डी करून त्यांनी ‘डॉक्टरेट’ मिळवली. पुढे नोव्हेंबर २००९ मध्ये डॉ. कसंबे यांनी ‘थ्री इडियट्स’ चित्रपट पाहिला आणि मनाविरूद्ध सुरू असलेली नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. २००९ सालच्या शेवटच्या दिवशी त्यांनी १७ वर्षे करत असलेल्या वैद्यकीय प्रतिनिधीपदाचा राजीनामा दिला. चार महिने घरीच बेरोजगारीत काढले. मात्र, निसर्गकामाच्या ध्येयाने घेतलेल्या निर्णयाचे फळ त्यांना मिळाले. एप्रिल २०१० मध्ये ते मुंबईमधील ’बीएनएचएस’ या संस्थेत प्रकल्प व्यवस्थापक म्हणून रुजू झाले.
 


 

 
’आयबीए प्रोग्राम’सह ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यांनी गोरेगाव येथील ‘संवर्धन शिक्षण केंद्रा’चे प्रभारी म्हणून काम सुरू केले. एप्रिल २०१८ पासून ते साहाय्यक संचालक (शिक्षण) या पदावर कार्यरत असून ‘संवर्धन शिक्षण केंद्रा’चा कार्यभारही सांभाळत आहेत. या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांसाठी निसर्ग शिक्षणाचे तसेच हौशी आणि या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी पर्यावरण शिक्षणाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांचे ‘भारतातील संकटग्रस्त पक्षी’ हे सन २००९ मध्ये प्रकाशित झालेले पहिले पुस्तक. त्यानंतर आजवर त्यांची पक्षी आणि फुलपाखरांवर आधारित एकूण १३ पुस्तके आणि १०० हून अधिक शास्त्रीय साहित्य प्रकाशित झाले आहे. त्यांनी तीन ई-पुस्तके लिहिली असून मोफत डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये ‘महाराष्ट्रातील फुलपाखरे,’ ‘मायाळू धनेशाचे गुपित,’ ‘इंडिअन ग्रे हॉर्नबिल,’ ‘थ्रेटन्ड् बर्ड्स ऑफ महाराष्ट्र,’ ‘इम्पॉर्टंट बर्ड एरियाज ऑफ महाराष्ट्र,’ ‘पॉप्युलर बर्ड्स ऑफ मिझोरम,’ ‘इम्पॉर्टंट बर्ड अ‍ॅण्ड बायोडायव्हर्सिटी एरियाज ऑफ इंडिया’ आणि ‘बटरफ्लाईज ऑफ वेस्टर्न घाट्स’ या काही पुस्तकांचा समावेश आहे. ‘बर्डलाईफ इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय संघटनेचे एशिया विभागाचे तीन वर्षे उपाध्यक्षपद त्यांनी भूषविले. तसेच सध्या ते ‘महाराष्ट्र पक्षी मित्र’ संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी दिलेले योगदान आणि ‘पक्षी’ या विषयाला अनुसरून केलेल्या परेदशवाऱ्या भारताच्या पक्षी अभ्यासाचा दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. डॉ. राजू कसंबे यांच्या पक्षीजगतातील अभ्यासामुळे महाराष्ट्रातील पक्षी चळवळीला दिशा मिळाली आहे. निसर्गशोधाचा प्रवास एकट्याने न करता त्यामध्ये सहप्रवाशांना सामील करून घेण्याचा त्यांचा गुण उल्लेखनीय आहे. पक्ष्यांचे मराठीत बारसे केल्यानंतर आता त्यांनी फुलपाखरांच्या मराठी नामकरणाचे शिवधनुष्य उचलून ते पेलण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा !
 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat