चर्चा 'आंध्र पॅटर्न'ची

    दिनांक  07-Jun-2019विजेत्याचा इतिहास लिहिला जातो किंवा चर्चाही जिंकणाऱ्याचीच केली जाते, असे म्हटले जाते. सध्या हे मांडण्याचे कारण म्हणजे, आंध्र प्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे गाजणारे 'आंध्र पॅटर्न.' जगनमोहन यांनी आंध्रचा कारभार हाती घेतल्यापासून नवनवीन 'पॅटर्न' राबवायला सुरुवात केली आहे. आता तर एक, दोन नाही तर तब्बल पाच उपमुख्यमंत्रिपदे आपल्या मंत्रिमंडळात ठेवण्याची त्यांनी घोषणा केली आहे. याआधी काही राज्यांमध्ये दोन उपमुख्यमंत्रिपदे देण्यात आली होती. मात्र, पाच उपमुख्यमंत्रिपदे देण्याचा हा देशाच्या राजकीय इतिहासातील पहिलाच प्रयोग ठरणार असून राबवायच्या आधीच त्याची देशात चर्चाही सुरू झाली आहे. संयुक्त आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व आंध्र काँग्रेसचे तत्कालीन नेते डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी (वायएसआर) यांचे जगनमोहन हे चिरंजीव. चंद्राबाबू नायडू यांनी जरी आपल्या कार्यकाळात आंध्रमधील शहरे सुधारली असली तरी डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी आंध्रच्या ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास केल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आंध्रच्या 'एनटीआर' या लोकप्रिय लोकनेत्यानंतर डॉ. वाय. एस. राजशेखर यांना आंध्रातील लोकांचे भरघोस प्रेम लाभले. जन्माने ख्रिश्चन असलेल्या डॉ. वाय. एस. राजशेखर यांच्या २००९ साली झालेल्या अपघाती निधनानंतर दुःखवेगाने हिंदुबहुल आंध्रातील तब्बल शंभराहून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. यावरून त्यांच्या अफाट लोकप्रियतेची कल्पना येते. त्यानंतर त्यांचे पुत्र जगनमोहन यांनी काँग्रेस हायकमांडकडे मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त केली होती. पण याप्रश्नी काँग्रेसने त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे 'भिजते घोंगडे' ठेवल्याचे ध्यानात येताच जगनमोहन यांनी बंड पुकारले आणि थेट 'वायएसआर काँग्रेस' या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. सुरुवातीला 'वायएसआर काँग्रेस'ला मर्यादित यश मिळाले. पण, त्यानंतर या पक्षाचा आलेख चढताच राहिला. मात्र, यामागे जगनमोहन यांचे अफाट कष्ट आहेत. प्रसिद्धी आणि माध्यमांच्या मागे न जाता चोवीस तास सामान्य कार्यकर्त्यांच्या गराड्यात त्यांच्यातीलच एक होऊन केले जाणारे 'जगन' यांचे 'राज'कारण आपल्याकडच्या राजकीय नेत्यांना निश्चितच चिंतन करायला लावणारे आहे.

 

आणि आता महाराष्ट्राचा 'पॅटर्न'

 

'वायएसआर काँग्रेस'च्या स्थापनेनंतर जगनमोहन यांनी आंध्रात तब्बल साडेतीन हजार किमीची 'प्रजा संकल्प यात्रा' यशस्वी केली. ही पदयात्रा टप्प्याटप्प्याने काढली गेली असली तरी एखाद्या राजकीय नेत्याने एवढे प्रचंड अंतर पायी चालणे हा भारतीय राजकारणाच्या इतिहासातील एक विक्रमच आहे. “मी आंध्रातील प्रत्येक गावखेड्यात पायी पोहोचलो आणि तेथील अडचणी समाजातील सर्वात निम्न घटकाकडून प्रत्यक्ष समजून घेतल्या तरच मला आंध्रचे नेतृत्त्व करण्याचा अधिकार आहे,” हे जगनमोहन यांचे काही वर्षांपूर्वीचे बोलच खूप काही सांगून जातात. पण, जगनमोहन नुसते बोलून थांबले नाहीत, तर त्यांनी हे विधान खरेही करून दाखवले. आंध्रच्या प्रत्येक गावागावात आणि नक्षलबाधित भागामध्येही त्यांची 'प्रजा संकल्प यात्रा' पोहोचली होती. सध्या जगनमोहन यांच्या 'आंध्र पॅटर्न'ची चर्चा रंगली असली तरी तो 'पॅटर्न' महाराष्ट्राच्या प्रकृतीला कितपत लागू पडेल, याविषयी शंका आहे. आपला देश कमालीच्या वैविध्याने नटलेला आहे. त्याचे प्रतिबिंब राजकारणातही जाणवते. महाराष्ट्र हे सुरुवातीपासून पुरोगामी आणि सगळ्या राज्यांच्या तुलनेत प्रगत असे राज्य. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यासारखे खरे 'जाणते' राज्यकर्ते महाराष्ट्राला लाभल्याने राज्याची पायाभरणीच चांगली झाली. जगनमोहन यांच्या 'एकला चलो रे...' या पॅटर्नची भुरळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पडल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी झळकले होते. हे खरे असेल आणि जगन यांच्याप्रमाणे राजकारण राज यांना करायचे असेल, तर राज यांना त्यांचा आताचा 'पॅटर्न' पूर्णपणे बदलावा लागेल. त्यांच्या पक्षाच्या नावात जरी 'महाराष्ट्र' असला तरी त्यांच्या पक्षाचे अस्तित्व विदर्भासारख्या मोठ्या भागात जवळपास नाही. त्याकडे त्यांना गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकच्या बाहेर, गावागावांमध्ये नाही जमले तरी निदान तालुके पिंजून काढावे लागतील. शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था तळागाळातून समजून घ्यावी लागेल. राज यांनी राजकारणात तीस वर्षे घालवल्यानंतर काही दिवसांपूर्वी अमरावतीत आदिवासी बांधवांकडे जेवण घेतले होते. मात्र, त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आपल्या राजकीय आयुष्यातील सुरुवातीच्या टप्प्यातच पालघरमधील आदिवासी बांधवांच्या घरी जेवण केले. या दोन घटना बापलेकाच्या वेगवेगळ्या 'स्टाईल' सांगून जातात. मात्र, जगनमोहन यांचे अनुकरण करायचे असेल, तर अशा नेत्यांना स्वतःला अक्षरशः लोकांमध्ये गाडून घ्यावे लागेल.

- शाम देऊलकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat