तेलंगणात काँग्रेसला खिंडार

    दिनांक  06-Jun-2019हैदराबाद : देशभरात काँग्रेसच्या नेत्यांचे, पदाधिकार्‍यांचे राजीनामा सत्र सुरु असतानाच दक्षिणेतील तेलंगणमध्येही काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. कारण, काँग्रेसच्या तब्बल १२ आमदारांनी तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) मध्ये प्रवेश करणार असल्याचे पत्र विधानसभा अध्यक्षांना सुपूर्द केले आहे.


नुकत्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उत्तम कुमार रेड्डी नालगोंडा मतदारसंघातून निवडून आले. त्यामुळे आमदार असलेल्या रेड्डींनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे गुरुवारी सुपूर्द केला. त्यानंतर एकूण ११९ आमदारांच्या तेलंगण विधानसभेत काँग्रेसचे केवळ १८ आमदार उरले. आता त्यापैकीही १२ आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे केवळ सहा काँग्रेसचे आमदार तेलंगण विधानसभेत पक्षाचे प्रतिनिधित्व करतील. त्यातही विधानसभा अध्यक्षांनी या १२ आमदारांचे पत्र स्वीकारल्यास काँग्रेसला विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदीही दावा सांगता येणार नाही.
 

महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, या आमदारांचे सदस्यत्व काँग्रेसला रद्द करता येणार नाही. कारण, दोन तृतीयांश सदस्यांनी पक्षबदल केल्यास पक्षबदल विरोधी कायदा लागू होत नाही. तेलंगण विधानसभेचा कार्यकाल संपण्यापूर्वीच के. चंद्रशेखर राव यांनी विधानसभा विसर्जित करुन मुदतपूर्व निवडणुकीचा घाट घातला होता. त्याचे त्यांना अपेक्षित फळही मिळाले आणि ११९ पैकी ८८ जागांवर त्यांनी घवघवीत विजय संपादित केला. बहुमताचे सरकार स्थापन करुन राव मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करत १२ काँग्रेस आमदारांनी टीआरएसचा मार्ग स्वीकारला आहे. आहे. टीआरएसमधून फुटून काँग्रेसमध्ये आलेल्या आमदार रोहित रेड्डींचाही या नाराज आमदारांमध्ये समावेश आहे. ते पुन्हा टीआरएसच्या वाटेवर आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat