डॉ. आ. ह. साळुंखेंचा इतिहास

    दिनांक  06-Jun-2019   "मी इतिहास लिहिला तर स्वत:च्या गटविचारांचा उदो उदो आणि तुझ्या विचार अस्तित्वाच्या द्वेषमूलक चिंधड्या करणार." अशी वृत्ती इतिहास लिहिताना इतिहासकारांनी ठेवली तर? तर तो इतिहास त्या व्यक्तीच्या वैयक्तिक भावनांचा पसाराच मांडतो किंवा फार फार तर ती व्यक्ती ज्या वैचारिक किंवा कृतीप्रवण गटाची सदस्य असते, त्या गटाचे मनोव्यापार स्पष्ट करते इतकेच. इतिहास मांडताना तो सत्यान्वेषी असावा, त्यात निष्पक्षता असावी हे अत्यंत गरजेचे. या पार्श्वभूमीवर डॉ. आ. ह. साळुंखे यांनी त्यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात तरुणांना संदेश दिला की, "आपला इतिहास हितसंबंधासाठी चुकीच्या पद्धतीने लिहिला गेला आहे. तुम्ही खोट्या इतिहासाचा डोंगर उलथून टाका." पण, इतिहासाचा खरेखोटेपणा तपासायचा कसा? डॉ. साळुंखे म्हणतात की, "इतिहास हितसंबंधांसाठी चुकीच्या पद्धतीने लिहिला गेला तर ते हितसंबंध कुणाचे?" जेव्हा हितसंबंध कुणाचे, हा विषय येतो, त्या परिघामध्ये डॉ. आ. ह. साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकांना बाजूला सारता येईल का? ‘इतिहास’ हा समाजबांधणीसाठी असतो की समाज तोडण्यासाठी, ही संकल्पना आधी स्पष्ट व्हायला हवी. तसेही ‘धर्म आणि धर्मापलीकडेही’, ‘शंभर कोटी मेंदू आणि दोनशे कोटी हात’, ‘आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल’ वगैरे वगैरे पुस्तकांची नावं वाचूनही समजेल की, इतिहासकाराची भूमिका कोणत्या अंगाने जाणार आहे. विज्ञान किंवा समाजशास्त्राची संकल्पना गृहितकांवर आधारित असू शकते. पण, इतिहास गृहितकांवर आधारित नसतो. तो निष्पक्षपणे आणि मनात कोणतीही किल्मिष गृहितक न मांडताच मांडावा लागतो. या पार्श्वभूमीवर डॉ. आ. ह. साळुंखे आधीचा इतिहास खोटारडा आहे, अशी भूमिका घेऊन इतिहासाची मांडणी करत असतील तर त्या इतिहास मांडणीचे काय होणार? ते आपल्या मार्गदर्शनात नेहमी तथागत बुद्धांचे विचार मांडतात की, "कुणी सांगितले, आवडले म्हणून कोणतीही गोष्ट स्वीकारू नका, तर त्याची सत्य अनुभूती घ्या." पण, दुसरीकडे आ. ह. साळुंखे आपले इतिहासाबाबतचे त्यांचे विशेष मत मात्र तरुणांवर लादत आहेत. बुद्ध तत्त्वज्ञानाप्रमाणे समाजाला अनुभव द्या की इतिहास काय आहे ते?

 

आता उरलो बारामतीपुरता!

 

'पुणेरी पगडी’ की ‘फुलेंची पगडी’ वगैरे वगैरे सवंग गोष्टी करणाऱ्यांना जनतेने कोणतीही पगडी न घालता उघड्या डोक्याने आणि मनाने विचार करण्याचा आदेश दिला आहेच म्हणा. या अशा परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी जखमेवर मीठच चोळले आहे. ते नुकतेच म्हणाले की, "शरद पवार हे फक्त बारामतीचेच नेते आहेत." बहुतेक पहिल्यादांच स्थळ, काळ, वेळ जाणून आणि पेशवा मनुस्मृतीच्या इतिहासातून बाहेर येत प्रकाश आंबेडकर यांनी विधान केलेले दिसते. प्रकाश यांचे विधान खरे वाटते. शरद पवारांनी नेहमीच बारामतीला झुकते माप दिले आहे, असे अनुभवी लोक सांगतात. या विधानाला पुष्टी देण्यासारखे नुकतेच घडले आहे. सध्या सगळा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत आहे. पाणी पेटणे काँग्रेसचे गेल्या कित्येक वर्षाचे पाप आहे, असे काही जण म्हणतील. तर असो, या पार्श्वभूमीवर बारामतीला होणारा बेकायदेशीर पाणीपुरवठा थांबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याला शरद पवार, ‘राजकारण केले’ म्हणतात. पण, सत्य पाहिले तर दिसते की, हे राजकारण नाही तर न्याय आहे. कारण, वीर-भाटघर धरणाच्या पाणीवाटपाचे धोरण १९५४च्या पाणीवाटप कायद्यानुसार ठरले होते. त्यानुसार उजव्या कालव्यातून ५७ टक्के पाणी सातारा जिल्ह्यातील फलटण तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला व पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळत होते. डाव्या कालव्यातून ४३ टक्के बारामती व इंदापूर तालुक्याला पाणी मिळत होते. पण, २००४ साली शरद पवार व २००९ साली अजित पवार यांनी पाणीवाटपाचा करार बदलला. त्यामध्ये नीरा देवधर धरणातून डाव्या कालव्यातून ६० टक्के पाणी बारामती व इंदापूर तालुक्याला व ४० टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला गेला. यावेळी पवार कंपनीने बारामतीचा विचार केला, मात्र सातारा सोलापूरवर अन्याय केला. हा करार ३ एप्रिल, २०१७ पर्यंतचा होता. मात्र, करार संपल्यावरही बेकायदेशीरपणे हे पाणी बारामतीला दिले जातच होते. शरद पवार आणि टीमने माळशिरस सांगोला आणि पंढरपूरच्या तोंडचे पाणी पळवून बारामती आणि इंदापूरला का दिले? उत्तर सोपं आहे, प्रकाश म्हणाले आहेतच की, "शरद पवार म्हणजे आता नेता उरलो फक्त बारामतीपुरता..."

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat