मोदी सरकारचा ॲक्शन प्लॅन; आठ कॅबिनेट समित्यांची पुनर्बांधणी

    दिनांक  06-Jun-2019नवी दिल्ली : देशातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी व अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धपातळीवर काम सुरु केले आहे. यासंबंधी बुधवारी दोन नव्या समित्या मोदी सरकारने स्थापन केल्या होत्या. यानंतर लगेचच गुरुवारी आठ कॅबिनेट समित्यांमध्ये पुनर्बांधणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे, या आठही समित्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना स्थान देण्यात आले आहे. नव्याने पुनर्बांधणी झालेल्या समित्यांमध्ये मंत्रिमंडळ नियुक्ती समिती, गृहनिर्माण समिती , आर्थिक समिती, संसदीय समिती, राजकीय कार्य समिती, सुरक्षा समिती, गुंतवणूक आणि विकास समिती व रोजगार आणि कौशल्य विकास समितीचा समावेश आहे.

 

मंत्रिमंडळ नियुक्ती समितीमध्ये पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाह यांचा समावेश असणार आहे. तसेच संसदीय संबंधी मंत्रिमंडळाच्या समितीच्या अध्यक्षपदी अमित शहा असणार असून निर्मला सीतारामन, रामविलास पासवान, नरेंद्र सिंह तोमर, रविशंकर प्रसाद, थावरचंद गहलोत, प्रकाश जावडेकर आणि प्रल्हाद जोशी हे या समितीचे सदस्य असणार आहेत. तर अर्जुन राम मेघवाल आणि व्ही. मुरलीधरन हे या समितीचे विशेष आमंत्रित सदस्य असणार आहेत. दरम्यान, नव्याने पुनर्बांधणी झालेल्या समित्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे आठ पैकी सहा समित्यांमध्ये असतील. रेल्वेमंत्री पियुष गोएल यांचा पाच समित्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना केवळ दोन समित्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे.

 

दोन नव्या समित्या

 

देशातील अर्थव्यवस्थेतील मंदी आणि वाढत्या बेरोजगारीचा सामना करण्यासाठी दोन नवीन कॅबिनेट समित्या बुधवारी स्थापन केल्या. गुंतवणूक आणि विकास यावर आधारित कॅबिनेट समितीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामण, नितीन गडकरी आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा समावेश आहे. तसेच रोजगार आणि कौशल्य विकास यासंबंधी दुसरी समिती स्थापन करण्यात आली असून यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अर्थमंत्री निर्मला सीतारामण, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, कौशल्य विकास मंत्री महेंद्रनाथ पांडे, राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार आणि हरदीप सिंह पुरी यांचा समावेश करण्यात आला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat