देशाच्या इकोसिस्टमला धक्का न लावता विकास करणे गरजेचे - प्रवीण परदेशी

    दिनांक  05-Jun-2019




 

ठाणे : देशाच्या इकोसिस्टमला धक्का न लावता विकास करणे गजरेचे असून भारतासमोर असलेली पर्यावरणीय आव्हाने आपल्या लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून समजून घेणे आवश्यक असल्याचे मत, मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मुंबई तरुण भारतआयोजित ग्रीन आयडियाया पर्यावरण महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मांडले. तसेच हा महोत्सव पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनामध्ये नक्कीच परिवर्तन आणू शकतो, असे म्हणत त्यांनी मुंबई तरुण भारतच्या या उपक्रमाचे कौतुक केले. पर्यावरण दिनाचे अवचित्य साधून मुंबई तरुण भारतने ठाण्यात तीन दिवसीय पर्यावरण महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या बुधवारी पार पडलेल्या उद्धाटन सोहळ्याला परदेशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी महोत्सवाच्या उद्घाटनासोबत वन्यजीव संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या संशोधकांना ग्रीन अॅव्हेजर्सपुरस्कार देऊन त्यांचे कौतुक केले.

 
पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीव संवर्धनाचे उदिष्ट्य डोळ्यासमोर ठेवून मुंबई तरूण भारतदरवर्षी ग्रीन आयडियाया महोत्सवाचे आयोजन करते. यंदा हा महोत्सव ठाण्याच्या जांभळी नाका परिसरातातील शिवाजी मैदानात पार पडत आहे. महाराष्ट्रात पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या संस्थांचे प्रदर्शन आणि प्रसिद्ध वन्यजीव संसोधकांशी संवाद, हे या कार्यक्रमाचे आकर्षण आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा बुधवारी सकाळी पार पडला. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर ठाणे महानगरापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, उपायुक्त ओमप्रकाश दिवटे आणि भारतीय विचार दर्शनचे अध्यक्ष सुश्रृत चितळे यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी निकीत सुर्वे, मोहन उपाध्ये, डा. दिनेश विन्हेरकर, प्रदीप पाताडे आणि भाऊ काटदरे या वन्यजीव संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संशोधकांना ग्रीन अव्हेजर्सपुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या कामाला सहयोग निधी म्हणून ५०,००० रुपये मुंबई तरुण भारतच्या वतीने त्यांना देण्यात आले. तसेच ठाण्यातील पर्यावरण स्नेही बचतगट आणि कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यामध्ये आघाडीवर असणाऱ्या गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. महत्वाचे म्हणजे त्यांनी तयार केलेले खत परदेशी यांच्या हस्ते गरजू शेतकऱ्यांना देण्यात आले. याशिवाय पुराणिक बिल्डर्सयांनी समर्थ भारत व्यासपीठया संस्थेला दिलेल्या कचऱ्यापासून इंधन निर्मितीच्या यंत्राचे उद्घाटनही करण्यात आले.
 

ग्रीन आयडियाया महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाची प्रस्तावना सृश्रृत चितळे यांनी केली. तर मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांनी या महोत्सवामागील भूमिका स्षष्ट केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धन हे विषय नेहमीच माध्यमांकडून दुर्लक्षित राहतात . मात्र, यापुढे दरवर्षी ग्रीन आयडियामहोत्सवाचे आयोजन करुन मुंबई तरुण भारतपर्यावरण रक्षण आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्राला हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम करेल. तसेच पर्यावरणचा ऱ्हास न करता विकास साधणे हे सद्यस्थितीत आपल्यासमोरील मोठे आव्हान असून प्लास्टिक पासून इंधन निर्मिती, वृक्षारोपन असे उपाय एकत्रित राबविल्यास देशाचा विकास नक्की होईल असा विश्वास प्रवीण परदेशींनी आपल्या भाषणात व्यक्त केला. यावेळी ठाणे महानगरपालिका उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी महापालिकेअंतर्गत सुरू असलेल्या विविध पर्यावरणीय कामांचा आढावा मांडला.

 

तारपा आणि पथनाट्य

 

महोत्सवाचे उद्घाटन झाल्यावर पर्यावरण पर्यटन या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. तर उपस्थित असलेल्या आदिवासी बांधवांनी तारपाया लोकनृत्याच्या तालावर ठेका धरला. यावेळी उपस्थित प्रेक्षक तारपाच्या तालावर मंत्रमुग्ध झाल्याचे दिसले.

 

विविध संस्थांचे प्रदर्षण

 

ग्रीन आयडियाया महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील महत्वाच्या पर्यावरणवादी संस्था दाखल झाल्या आहेत. पर्यावरणाच्या विविध विषयांमध्ये काम करणाऱ्या ५० हून अधिक संस्था पुढील दोन दिवस या महोत्सवात ठिय्या मांडून असणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र वन विभाग, कांदळवन संरक्षण विभाग, बीएनएचएस, मत्स्यव्यवसाय विभाग आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यनाचा समावेश आहे. या सर्व संस्थांचे प्रदर्शन ६ आणि ७ जून रोजी पर्यावरणीय प्रेमींकरिता सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.

 

महोत्सवात आज

 

आज महोत्सवात सकाळपासून विविध संस्थांचे प्रदर्षण खुले असणार आहे. सायंकाळी ६ वाजता वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या उपस्थितीत ग्रीन आयडिया या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायकांळी ७ वाजता पक्षी निरीक्षणावर बीएनएचएसच्या शास्त्रज्ञ तुहिना कट्टी, ८ वाजता सागरी जीवांविषयी प्रदीप पाताडे आणि ९ वाजता कचरा व्यवस्थानासंबंधी शैलेंद्र सिंग राजपुत यांच्याशी परिसंवाद पार पडेल.

 
 
 माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat