संपवून टाक नरेंद्रा, हा दहशतवाद...!

    दिनांक  05-Jun-2019वि न इन्द्र मृधो जहि

नीचा यच्छ पृतन्यत:।

अधमं गमया तमो यो अस्माँ अभिदासति॥

(अथर्ववेद १.२१.२)

 

अन्वयार्थ

 

(इन्द्र) हे नरेंद्रा, राजा, सेनापती, (न:) आम्हा प्रजाजनांना (मृध:) उद्ध्वस्त करणाऱ्यांना (वि) विशेष पद्धतीने (जहि) मारून टाक. (पृतन्यत:) दहशत दंगे करू इच्छिणाऱ्यांना (नीचा) खाली दरीत (यच्छ) ढकलून दे. (य:) जो कोणी (अस्मान्) आम्हा देशवासीयांना (अभिदासति) नाहीसे करू इच्छितो, त्याला (अधमं) घनघोर अशा (तम:) अंधार कोठडीत, दुर्गतीच्या मार्गाकडे (नय) घेऊन जा.

 

विवेचन

 

वैदिक ज्ञान हे त्रिकालाबाधित आहे. अल्पज्ञ मानव, समाज हा अविवेकामुळे दिशाहीन होऊ शकतो, याची जाणीव ऋषिमुनींना होती. म्हणूनच त्यांनी ज्ञानदात्या परमेश्वराकडे पारिवारिक, सामाजिक, आध्यात्मिक, राष्ट्रीय, सांस्कृतिक व इतर विषयांसंदर्भात मार्गदर्शनाची कामना केली. ईश्वरानेदेखील आपल्या पवित्र अशा अजरामर श्रुतिकाव्याच्या माध्यमाने केवळ मानवासाठीच नव्हे, तर संबंध ब्रह्मांडातील सर्व प्राणिमात्राच्या कल्याणाकरिता मौलिक उपदेश केला. चारही वेदांतील मंत्रांमध्ये भूत, वर्तमान व भविष्याचे शाश्वत कल्याण दडलेले आहे. अफाट बुद्धिसामर्थ्य लाभलेला मानव ज्ञान-विज्ञानाने इह-परलोकाची उन्नती साधत धर्म-अर्थ-काम व मोक्ष या पुरुषार्थ प्राप्तीने सफल ठरावा, हेच अभिप्रेत आहे. पण, हाच मानव जेव्हा काम, क्रोध, लोभ, ईर्ष्या आदी दोषांनी ग्रासला की राक्षस बनतो. आपल्या स्वार्थापुढे त्याला काहीच सुचत नाही. कुटुंब, समाज, देश व इतकेच काय तर आपले वैयक्तिक हित कशात सामावलेले आहे, याची पण त्याला जाणीव राहत नाही. मग तो वाटेल तसा वागू लागतो. क्षुद्रवृत्तीतून उदयास आलेले संकीर्ण असे मत-पंथ व जातिभेद, वर्णभेद, प्रांत व देशभेद किंवा गरीब-श्रीमंतीसारखे भेद यामध्ये तो गुरफटून जातो. माणुसकीचा खरा धर्म विसरून हाती शस्त्र घेऊन रक्ताचे पाट वाहण्यास प्रवृत्त होतो. अशा वेळी ‘शठे शाठ्यं समाचरेत्।’ या उक्तीनुसार देशाच्या सम्राटाने (राजाने) वेळीच पावले उचलणे गरजेचे ठरते. दुष्टांच्या वाईट प्रवृत्तींचा योग्यवेळी बंदोबस्त न केल्यास त्यांच्यातील हिंस्र वृत्ती अधिक बळावण्याची दाट शक्यता असते. कारण, शत्रुसंहार हा क्षत्रियांचा धर्म असतो. भगवद्गीतेत योगेश्वर कृष्णांनीही अर्जुनाला आपल्या जन्माचा उद्देशपवित्राणाय साधुनां विनाशायच दुष्कृताम्!’ हा सांगितला होता. ‘शत्रू’ आतला असो की बाहेरचा, ‘शस्त्राकरिता शस्त्रच उत्तर।या उक्तीप्रमाणे हाती शस्त्रे घेऊन त्यांचा नायनाट करणेच इष्ट; अन्यथा दहशतीचे साम्राज्य वाढीस लागून साऱ्या पृथ्वीवर हिंसेचे थैमान होईल.

 

या मंत्रात राष्ट्रप्रमुखास शत्रूंचे निर्दालन करण्याचा आदेश दिला आहे. भौतिक सुखसोयी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्या तरी, चोर, लुटारू, अतिरेकी आदींच्या दहशतीखाली जनता सुखा-समाधानाने नांदू शकत नाही. अशावेळी राजाने या सर्व दुष्टांचा बंदोबस्त करणे इष्ट असते. उपरोक्त मंत्रात राजास किंवा राष्ट्राध्यक्षास ‘इंद्र’ या नावाने संबोधले आहे. ज्याकडे सर्व प्रकारचे ऐश्वर्य व सामर्थ्य आहे, तो इंद्र! जो शत्रूला कधीही घाबरत नाही, तो इंद्र! अशा इंद्रास प्रजा आर्त विनवणी करते. कारण, आपल्यावर होणाऱ्या दुष्टांच्या अतिरेकी हल्ल्याने ती त्रस्त झाली आहे. म्हणून ती आपल्या राष्ट्रनेत्याकडे रक्षणाचे साकडे घालत आहे. ‘न: मृध: वि जहि।’ आम्हा सर्वांचे जगणे हिरावून घेणाऱ्या राक्षसीवृत्तींना नाहीसे कर. साध्या पद्धतीने नव्हे, तर विशेष अत्याधुनिक शस्त्रसामग्रीच्या साहाय्याने त्यांना नष्ट कर. कारण, शत्रू तितकाच बलशाली झालेला आहे. तोदेखील नवनवीन अस्त्रांनी सुसज्ज आहे. म्हणून आपल्याकडे ही नूतन तंत्रज्ञानाने विकसित झालेली अस्त्रे हवीत. शक्तिशाली आण्विक शस्त्रांनी राक्षसांचा नायनाट करावा. जनतेची पुढील मागणी ही ‘नीचा यच्छ पृतन्यत:।’ हिंस्र राक्षसांना इतके खाली दाबावे किंवा हाणून लावावे की ते पुन्हा डोके वर काढता कामा नयेत. मंत्रातील दुसऱ्या चरणात शत्रूंना त्याहीपेक्षा पुढचा रस्ता दाखविण्याची विनंती केली आहे- ‘यो अस्मान् अभिदासति(तम्) अधमं तम: नय।’ म्हणजेच ज्याने आमचे जगणे उद्ध्वस्त केले आहे, अशा त्या अतिनीच शत्रूंना परास्त कर, त्यांना घनघोर अंधारात घेऊन जा!’

 

राक्षसी वृत्तीला कायमचा धडा शिकविला पाहिजे. त्यांना पुन्हा संधी मिळता कामा नये. जर काय आपण त्यांना क्षमापूर्ण भावनेने दया दाखविली, तर ते अधिकच उन्मत्त होतील. म्हणूनच वेदमंत्रात म्हटले आहे की, वाईटांचा कायमचा नायनाट व्हावयास हवा! त्यांना प्रकाशमार्गात आणणे योग्य नाही, त्याकरिता त्यांना मृत्युरूपी दंडाद्वारे जन्मजन्मांतराची गर्द अंधार कोठडीच बरी! वरील मंत्राशय सांप्रत युगासाठी अत्यंत मार्गदर्शक आहे. हा भाव आजच्या परिस्थितीशी तंतोतंत जुळणारा आहे. कारण, केवळ आपला देशच नव्हे तर सारे जग आज दहशतवादाच्या हिंसक कारवायांमुळे प्रचंड भयभीत झाले आहे. भारतावर वारंवार होणारे अतिरेक्यांचे हल्ले काळजाचा थरकाप उठविणारे आहेत. निष्पाप जनतेचा किंवा आमच्या शूर सैनिकांचा होणारा संहार थांबणार तरी कधी? म्हणूनच वेदमंत्रानुसार देशाच्या नेत्यांनी (नर + इन्द्र = नरेंद्रांनी) किंवा सेनाप्रमुखांनी (सेनापतींनी) योग्य ती निर्णायक पावले उचलणे काळाची गरज आहे. वेदोक्त मंत्रार्थ देश व जागतिक पातळीवरील दहशतवादाचे आणि दुष्टवृत्तींचे निर्दालन करण्याकरिता प्रेरित करणारा ठरो, हीच कामना!

 

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat