समाज एकसंघ करण्यासाठी...

    दिनांक  05-Jun-2019   अण्णाभाऊ साठेंच्या विचारांतील देशप्रेम समाजात रूजवण्यासाठी बाबुराव मुखेडकर अहोरात्र प्रयत्नशील आहेत. समाजहितासाठी समाज एकसंघ राहिला पाहिजे, या सूत्रावर त्यांचे काम सुरू आहे.


"अण्णाभाऊ साठे हे डाव्या विचारसरणीचे होते. त्यांनी जे काही लिखाण केले ते डाव्या विचारसरणीला धरूनच केले," असे समाजामध्ये माओवाद स्वीकारला जावा यासाठी काही विघातक प्रवृत्तीची लोक खोटेनाटे पसरवत आहेत. खरे तर अण्णाभाऊ साठेंचे साहित्य डाव्या विचारसरणीला धरून नाही, तर समाजाला धरून आहे. देशाला धरून आहे. त्यांनी नेहमीच सत्याची आणि न्यायाची बाजू घेतली. म्हणूनच तर ते डफ घेऊन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत उतरले. म्हणूनच तर ते ‘बरबाद्या कंजारी’ कादंबरी लिहू शकले. या कादंबरीमध्ये त्यांनी समाजामध्ये होणाऱ्या धर्मांतराचे विदारक चित्रण केले आहे,” निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त बाबुराव मुखेडकर सांगत होते. मातंग समाजाचे एक समाजशील कार्य करणारे आणि अत्यंत धडाडीचे व्यक्तिमत्त्व म्हणजे बाबुराव मुखेडकर. “अण्णाभाऊ साठे हे समाजाचे दैवत आहेत. त्यांच्या नावाने समाजात कोणी दुफळी निर्माण करत असेल, तर त्यांना रोखणे आपले कर्तव्यच आहे,” असे त्यांचे म्हणणे. अण्णाभाऊंच्या साहित्याचा अन्वयार्थ ‘समाजहित’ आणि ‘देशप्रेम’ या संकल्पनेतून मांडत आहेत.

 

महाराष्ट्रभरातून समाजातील अनेक गरजू मुंबईत उपचारासाठी, शिक्षणासाठी येतात. या मायानगरीत त्यांना काय करावे, हे अक्षरश: सुचत नाही. त्यावेळी बाबुराव तन-मन-धनाने त्यांच्या मदतीला धावतात. “समाजातील व्यक्ती सुखदु:खात एकमेकांना मदत करणार नाहीत, तर कधी करणार?” असा त्यांचा सवाल आहे. जातीयतेच्या वणव्यात समाजातील काही लोक अजूनही होरपळत आहेत. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे, संघटित होणे आणि शिक्षण घेऊन प्रगती करणे, यावर बाबुराव यांचा विश्वास आहे. तो विश्वास सार्थही आहे. कारण, चौंडी-मुखेड कर्नाटकमधील बाबुराव यांचे लहानपण म्हणजे जातीयतेच्या चौकटीतील जगणे होते. ‘अस्पृश्यता पाळणे’ यात विशेष असे काही वाटूच नये अशा प्रकारचे जगणे. त्यातच किशोरवयात असताना १९७० साली दुष्काळाने महाराष्ट्र होरपळलेला. या काळात सामाजिक आणि आर्थिकस्तरावर मागास असलेल्या बाबुराव यांनी लहानपणी दगड फोडणे, रस्ते बांधणे अशी कामेही केली. पण, याबद्दलही त्यांचे मत आहे की, त्यात काय इतके! गावांमध्ये वयाच्या पाचव्या वर्षापासून लेकरू मायबापासोबत कामाला जुंपलंच जातंआयुष्याच्या प्रत्येक समस्येला सकारात्मकतेने सामोरे जात बाबुराव शिकत होते. त्यांचे वडील तुळशीराम हे गावात छोटी-मोठी कंत्राट घेत, तर आई गृहिणी. घरात अठराविश्वे दारिद्य्रच, पण याला ‘दारिद्य्र’ म्हणतात, ही समज नसण्याइतके दारिद्य्र खिळलेले. या अशा वातावरणात तुळशीराम यांनी मात्र नेहमीच बाबुराव यांना “बाबू, तू शिक, मोठा हो, आमचे सायब कसे मोठे आहेत, तसे तू अधिकारी हो,” अशी सातत्याने शिकवण दिली. बाबुराव यांच्या शिक्षणाला अग्रक्रम दिला. त्यामुळे बाबुराव यांचा शिक्षणाचा हुरूप वाढत होता. गावात चौथीपर्यंतच शाळा. पाचवीची शाळा महाराष्ट्रात लातूरच्या सीमेवर. ती शाळा सहा किलामीटर दूर आणि शाळेत जाताना एक नदी, एक ओढा ओलांडावा लागे. शर्ट, वह्या-पुस्तकांची कापडी पिशवी एका मोठ्या पिशवीत घालून ती पिशवी डोक्याला बांधून नदी ओलांडणे, हे नित्याचेच.

 

पुढे दुष्काळात जगण्यासाठी मुखेडकर कुटुंब कर्नाटक सोडून उद्गीरला आले. त्यावेळी बाबुराव दहावीला होते. तिथेच एका खाजगी वसतिगृहात राहून ते शिकू लागले. तिथे दोन वेळचे अन्न मिळू लागले, हेही त्यावेळी मोठे अप्रुप. त्याच काळात त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण लागले. त्यावेळी एसीपी म्हणून अरूप पटनाईक उद्गीरमध्ये रूजू झाले होते. एकदा शाळेत ते प्रमुख अतिथी म्हणून आले. ते म्हणाले, “सैनिक सीमेवर देशाचे रक्षण करतात आणि पोलीस देशाच्या आत. पण, यामध्ये समाजाचेही कर्तव्य आहे की, त्यांनी देशाचे आणि समाजाचे रक्षण करावे.” त्यावेळी पहिल्यांदा बाबुराव यांना वाटले की, आपणही समाज आणि देशाचे रक्षण करायला हवे. हे स्वप्नाचे बीज मनात रूजून गेले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र वाचून तर कष्टमय, प्रतिकूल परिस्थितीमध्ये यश मिळवायलाच हवे, ही इच्छा प्रबळ झाली. त्यातूनच मग प्रतिकूल परिस्थितीमध्येही बाबुराव यांनी कला शाखेचे पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेतले. महाराष्ट्र शासनाची एमपीएसीची परीक्षा दिली. परंतु, या परीक्षेत त्यांना दोनदा अपयश आले. पण, वडिलांनी एकच सांगितले, “थकू नकोस, जिद्द सोडू नकोस.” अपयश पचवून प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाबुराव एमपीएसीची परीक्षा उत्तीर्ण झाले. कर्नाटकच्या खेड्यातल्या या युवकाला पहिली पोस्टिंग मिळाली ती मुंबईत. पोलीस दलात २५ वर्षे नोकरी करत ते साहाय्यक आयुक्त या उच्चपदापर्यंत पोचले होते. या कारकिर्दीमध्ये त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल १८० पारितोषिकेमिळाली. या अतुलनीय यशानंतरही बाबुराव यांची समाजशील वृत्ती कधीही बदलली नाही. समाज आणि समाज ज्यांना मानतो, त्या महापुरुषांचे नाव देदीप्यमान करावे, त्या महापुरुषांचे विचार जगभर सकारात्मकरीत्या पोहोचवावेत, याच प्रेरणेने आणि जिद्दीने ते आज काम करत आहेत. समाजबांधणी करत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat