मुंबई : १९९०नंतर अनेक विनोदी चित्रपटांची निर्मिती झाली. हिंदीमध्ये अनेक विनोदवीर उदयास आले. त्यामधले एक ज्येष्ठ नाव म्हणजे दिनयार कॉन्ट्रॅक्टर. त्यांचे बुधवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७९ वर्षाचे होते. गुजराती तसेच हिंदी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये त्यांनी कामे केली आहेत.
दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांनी अनेक वर्ष हिंदी तसेच गुजराती रंगभूमीसाठी काम केले. तसेच, 'खिलाडी', 'बादशाह', 'दरारा' आणि '३६ चायना टाउन' या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. मालिकांमध्ये त्यांनी 'तेरी भी चूप मेरी भी चूप', 'कभी इधर कभी उधर' आणि 'दमा दम दम' या मालिकांमधील त्यांची बॉस ची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात राहिली. जानेवारी २०१९मध्ये रंगभूमी, मालिका तसेच चित्रपटांमधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विटकरून त्यांना आदरांजली वाहिली. 'दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांनी अनेकांच्या चेह-यांवर हास्य फुलवले, अनेकांना आनंद दिला, मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे' असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले होते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat