राधाकृष्ण विखे-पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा

    दिनांक  04-Jun-2019मुंबई : विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विखे पाटलांनी आपला राजीनामा मंगळवारी विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला. राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाणार असल्याचे म्हटले जात असून राजीनाम्यानंतर भाजप प्रवेशाच्या हालचालींना आणखी वेग आला आहे.

 

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांनी २.८१ लाख मतांनी धूळ चारत विजय मिळवला. मुलाने भाजपची वाट धरल्याच्या अवघ्या काही दिवसांतच राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेतील विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी आपल्या आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे.

 

८ ते १० आमदार भाजपच्या संपर्कात

 

राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर नाराज असलेले ८ ते १० आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांनी केला. राज्यातील काँग्रेस नेतृत्वानेच पक्षाला संपवल्याची आरोपही त्यांनी केला असून सत्तार यांच्या दाव्यानंतर काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. उमेदवारी न दिल्याचे कारण देत नाराज असल्याचे जाहीर करणारे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मंगळवारी विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून राजीनामा देण्यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुंबईतील बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीला आमदार अब्दुल सत्तार, आमदार भारत भालके, जयकुमार गोरे, माढाचे खासदार रणजीत निंबाळकर आदी नेते उपस्थित होते.

 

काँग्रेसमध्ये माझी घुसमट

माझी काँग्रेसमध्ये कोंडी होत आहे असुन आता माझी इथे घुसमट होत आहे. मला अनेक आमदार भेटत आहेत परंतु, त्यांनी राजीनामा द्यायचा की नाही हा त्यांचा निर्णय आहे. मी मात्र आज एकटा राजीनामा देत आहे.

- राधाकृष्ण विखे-पाटील

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat