पायल रोहतगीचा अखेर माफीनामा

    दिनांक  04-Jun-2019
आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे दिले स्पष्टीकरण


मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून वादाला तोंड फोडणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीने मंगळवारी आपला माफीनामा सादर केला. पायलने मंगळवारी सकाळी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत सर्वांची जाहीर माफी मागितली. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे स्पष्टीकरण तिने दिले.

 

'शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत, तर त्यांचा जन्म एका शूद्र जातीच्या शेतकरी कुटुंबात झाला होताअसे ट्विट करत पायलने सोमवारी नव्या वादाला तोंड फोडले होते. याबाबत नेटीझम्सकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर सडकून टीका करण्यात आली. त्यानंतर तिने एक व्हिडिओ शेअर करत मंगळवारी आपली बाजू मांडली.

 

या व्हीडिओत ती म्हणते 'मी विचारलेला साधा-सरळ प्रश्न कोणाला समजलाच नाही. त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मला केवळ शिवाजी महाराजांबद्दल जाणून घ्यायचे होते. पण ज्यांना असे वाटले की मी त्यांच्या महाराजांबद्दल काही चुकीचे बोलले तर मी त्या सगळ्यांची माफी मागते. मी तुमच्या महाराजांबद्दल काही गोष्टी वाचल्या केवळ मला त्याविषयी खात्री करून घ्यायची होती. पण, माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी मला लक्ष्य करण्यात आले. मला कोणालाही प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही, भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यच अस्तित्वात नाही हे मला आज समजलंअसेही ती यावेळी म्हणाली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat