विचार तसा आचार...

    दिनांक  04-Jun-2019   मुलं ही अनुकरणाने शिकतात, हे विसरून कसे चालेल? तेव्हा, आपल्या मुलांच्या हाती संगणक, मोबाईल, व्हिडिओ गेम देताना त्यांच्या डोळ्यासमोर नेमके काय चित्र आपण उभे करत आहोत, याचे पालकांनी भान ठेवायलाच हवे; अन्यथा पडद्यावरचा हिंसाचार, मुलांच्या आचारात उतरायला फारसा वेळ लागणार नाही.

 

व्हिडिओ गेम्स तसेच स्मार्टफोनवरील गेमिंग अ‍ॅप्समध्ये रमणारी हल्लीची लहान मुलं. मैदानी खेळांपेक्षा मोबाईलच्या खेळांमध्येच या पिढीला अधिक स्वारस्य. पण, हल्ली याचे दुष्परिणामही प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. आधी ‘ब्लू व्हेल’, आता ‘पब्जी’ सारख्या मोबाईलवरील खेळांमुळे कोवळ्या वयातील मुलांमधील आक्रमकताच केवळ वाढीस लागत नाही, तर या खेळांमुळे देशविदेशात हजारो मुलांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. कोणी ‘ब्लू व्हेल’च्या नादी लागून उंच इमारतीवरून उडी घेऊन आयुष्य संपवले, तर कोणाला सलग सहा तास ‘पब्जी’ खेळून हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे बालरोगतज्ज्ञ, मनोवैज्ञानिक या निष्कर्षाप्रत पोहोचले की, या हिंसाचार, आक्रमकता आणि नकारात्मकता पसरविणाऱ्या खेळांचा निश्चितच लहान मुलांवर विपरीत परिणाम होतो. त्या खेळातील वैशिष्ट्ये आपसूकच लहान मुलांच्या वर्तनात प्रतिबिंबित होतात. मारझोड, रक्तपात या सगळ्या ‘रिअल लाईफ’मधील भयंकर, मन विषण्ण करणाऱ्या घटनांचे त्यांना फारसे अप्रूप वाटेनासे होते. अत्याचार, हिंसा अशा मुलांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होऊन जातो. कसंही करून जिंकण्याची, शत्रूवर कुरघोडी करण्याची संधी हातची जाता कामा नये, हे विचार त्यांना भंडावून सोडतात. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तो खेळ एके खेळ, त्यातील आव्हाने आणि ती पूर्ण करण्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची त्यांची मानसिक तयारी प्रौढांनाही कधी कधी अवाक् करणारी. तहानभूक विसरून ही हट्टी मुलं अगदी या खेळांच्या आहारी जातात. त्यांचा त्यांच्या मनावर, मेंदूवर आणि एकूणच जीवनशैलीवर विपरीत परिणाम जाणवतो. या संदर्भातच अमेरिकेमध्ये नुकतेच एक संशोधन करण्यात आले. त्या संशोधनातूनही व्हिडिओ गेम्स, मोबाईल गेम्समुळे मुलांमधील आक्रमकता वाढीस लागत असल्याच्या निष्कर्षावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

 

या प्रयोगासाठी ‘माईनक्राफ्ट’ नावाच्या एका व्हिडिओ गेम्सची तीन वेगवेगळी व्हर्जन्स निवडण्यात आली. ८-१२ वयोगटातील मुलांना या तीनपैकी एक एक व्हर्जनचा व्हिडिओ गेम खेळण्यास सांगण्यात आले. पहिल्या व्हर्जनमधील खेळात राक्षसाला मारण्यासाठी बंदूक हे अस्त्र, तर दुसऱ्या व्हर्जनमध्ये तलवारींचा वापर करण्यात आला. त्याउलट तिसऱ्या व्हर्जनमध्ये यापैकी कुठल्याही शस्त्रास्त्राचा वापर मुलांना खेळताना करायचा नव्हता. एकूण २२० मुलांवर हा प्रयोग करण्यात आला. हा व्हिडिओ गेम खेळण्यासाठी मुलांना २० मिनिटे देण्यात आली. त्यानंतर एका बंद खोलीत त्यांना खेळण्यासाठी सोडण्यात आले, जिथे खोट्या बंदुकी मुद्दाम ठेवल्या होत्या. ज्या मुलांनी पहिल्या व्हर्जनमधील बंदुकीसह व्हिडिओ गेम खेळला होता, त्या ७६ पैकी ६२ टक्के मुलांनी लगेच ती बंदूक हातात घेतली. तलवारीसह दुसऱ्या व्हर्जनचा व्हिडिओ गेम खेळणाऱ्या ७४ पैकी ५७ टक्के मुलांनी बंदुकीला स्पर्श केला, तर कुठलीही हिंसा नसलेल्या या खेळाच्या तिसऱ्या व्हर्जनचा आस्वाद घेणाऱ्या ७० पैकी केवळ ४४ टक्के मुलांनी त्या बंदुका आपल्या हातात घेतल्या. व्हिडिओ गेम संदर्भातील मुलांच्या या वर्तणुकीमुळे तसेच त्यांचे लिंग, वय, घरातील वातावरण अशा इतरही घटकांचा विचार करता, संशोधक याच निष्कर्षाप्रत पोहोचले की, व्हिडिओ गेममधील हालचालींचा मुलांच्या मानसिक, भावनिक पातळीवरही खोलवर परिणाम जाणवतो.

 

त्यामुळे व्हिडिओ गेम, स्मार्टफोन आपल्या मुलांच्या हातात देताना आपण नेमका कोणता खेळ त्यांना खेळायला देतोय, याचे सर्वस्वी भान पालकांनी ठेवणे अत्यावश्यक आहे. मारामारी, आदळआपट यांसारख्या खेळांपेक्षा शब्दकोडे, बुद्धीला चालना देणाऱ्या मोबाईलवरील गेम्सची त्यांना ओळख करून द्यावी. खरंतर आपली मुलं कमीतकमी वेळ अशा व्हिडिओ गेममध्ये रमतील, यासाठी पालकांनी मुलांना वाचन, चित्रकला, कथाकथन, संगीत किंवा मुलांच्या आवडीच्या गोष्टींमध्ये त्यांचे लक्ष गुंतवायला हवे. मुलांच्या आवडीनिवडी, त्यांचे छंद विकसित करण्यासाठी पालकांनीच पुढाकार घ्यायला हवा. मुलांबरोबर नियमित संवाद साधणे, त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात मोकळ्या, स्वच्छ हवेत खेळायला बाहेर घेऊन जाणे, गोष्टी सांगणे अशा विविध पातळीवर मुलांना व्हिडिओ गेम आणि मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवता येईल. पण, हे करताना पालक म्हणूनही आपण मुलांसमोर मोबाईलचा अतिवापर तर करत नाही ना, याचीही काळजी घ्यायलाच हवी. कारण, मुलं ही अनुकरणाने शिकतात, हे विसरून कसे चालेल? तेव्हा, आपल्या मुलांच्या हाती संगणक, मोबाईल, व्हिडिओ गेम देताना त्यांच्या डोळ्यासमोर नेमके काय चित्र आपण उभे करत आहोत, याचे पालकांनी भान ठेवायलाच हवे; अन्यथा पडद्यावरचा हिंसाचार, मुलांच्या आचारात उतरायला फारसा वेळ लागणार नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat