मुंबईत आनंदसरी : 'सनडे'ही ठरला 'रेनी'डे

    दिनांक  30-Jun-2019


 


मुंबई : गुरुवारी रात्रीपासून मुंबईवर कृपा'वर्षा'व केलेल्या वरूणराजाने रविवारीही मुंबईवर 'जोर'धार मारा केला. मात्र, रविवारचा पाऊस चाकरमान्यांचा आनंद द्विगुणित करणारा ठरला. शुक्रवारी मन मानेल तसा मुसळधार कोसळून चाकरमान्यांची त्रेधातिरपीट उडवून देणारा पाऊस शनिवारी मात्र संततधार बरसत होता.

 

लहान मुलांनी भिजून पहिल्या पावसाचा आनंद लुटला तर रविवारी मध्येच उघडीप घेत धुवांधार कोसळणाऱ्या पावसात मोठ्यानी त्यांच्यापरीने संडे साजरा केला. तरुणाईने तर कॉलेज प्रवेशासाठी झालेला त्रास दूर करण्यासाठी गुरुवारपासूनच रविवारचे प्लॅन तयार केले होते. सरीवर सरी कोसळणाऱ्या पावसात तरुणाईचे जथ्थे सकाळीच बाहेर पडत होते. मुंबईच्या समुद्रकिनारीही अनेकांनी गर्दी करीत पावसाचा आनंद लुटला.

 

एकंदरीत रविवारचा पाऊस आबालवृद्धांचा आनंद द्विगुणित करणारा आनंदसरी ठरला. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी पाऊसधारा असल्याने हवेत गारवा निर्माण झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकराना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, येत्या २४ तासात मुंबईत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत कुलाबा १२.४ व सांताक्रूझ येथे ८.२ मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनेकांनी पावसात भिजत एन्जॉय केला.अरबी समुद्रात हवेचा दाब वाढला आहे. त्यामुळे कोकणच्या आजुबाजूच्या भागात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ४ दिवस, मुंबईसह ठाणे आणि इतर भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
शहर - उपनागरातल्या पावसाची नोंद (मिमी)कुलाबा - ७८.७

वरळी - ४४.८०

माझगाव- ७२.७

दादर- ३८.२०

वांद्रे -४२.६०

बिकेसी - ११३.००

सांताक्रूझ- ५२.८०

अंधेरी - ८९.२०

गोरेगाव - ९९.६०

मालाड - १२५.६०

कांदिवली - ६५.६०

बोरिवली - ४६.८०

चेंबूर - ८२.८०

विद्याविहार - ७६.६०

पवई - ७३.४०

जोगेश्वरी - २२.००

भांडुप - ६५.२०

मुलुंड - ९९.२०तलाव क्षेत्रातला पाऊस ( मिमी)


अप्पर वैतरणा---२०

मोडकसगर---६३

तानसा---८९

मध्य वैतरणा---३२

भातसा---७४

विहार---८३

तुलसी---८५

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat