अनोखा विक्रम ! नीट, एम्स, एमएचटी-सीईटीसारख्या प्रवेश परिक्षांत घवघवीत यश

    दिनांक  30-Jun-2019
मुंबई : एका सर्वसाधारण कुटूंबात जन्मलेल्या औदुंबर ज्ञानदेव बाराते याने नीट, एम्स, एमएचटी-सीईटी आदी सर्व परिक्षा उत्तीर्ण करत अनोखा विक्रम केला आहे. भाब्रेकर नगर, कांदिवली येथील लहानश्या घरात राहणारा औदुंबर याचे वडिल पोलीस खात्यात नोकरी करतात. दहावीपर्यंत मराठी शाळेत शिकलेल्या औदुंबर याने नीट, एम्स, एमएचटी-सीईटी या सर्व परिक्षांचा अभ्यास एकत्र करत त्याने ९८ ते ९९.९८ टक्के इतके गुण मिळवत साऱ्यांना सुखद धक्का दिला आहे.

 

औदुंबर सांगतो कि, "परीक्षेत मिळालेल्या यशाचे श्रेय माझ्या आई-वडिलांना आणि गुरुजनांना जाते. दैनंदिन शिकवणी, शिकवणी वर्गानी उपलब्ध करून दिलेली सर्व विषयांची संदर्भ पुस्तके, मार्गदर्शन, वेळोवेळी केलेले शंकांचे निरसन, तसेच अभ्यासासाठी २४ तास उपलब्ध करून दिलेले वर्ग आणि १० ते १२ तास केलेला अभ्यास हेच माझ्या यशाचे खरे गमक आहे."

 

टिव्ही मोबाईलचा वापर टाळला

 

"टिव्ही, मोबाईलचा वापर मी दोन वर्षे कटाक्षाने टाळला, तसेच सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीतही मला अभ्यासासाठी लागणाच्या सर्व सुविधा पुरविण्याचा वडिलांनी प्रयत्न केला. तसेच त्यांनी व आईने मला नियमित अभ्यास करण्यासाठी उत्तेजन दिले." सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात नामाकिंत शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, परंतु औदुंबरला स्वतःच्या कर्तृत्वावर सहज वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळणार आहे. शेवटी औदुंबरने सांगितले कि निखळ यश हवे असल्यास कठोर परिश्रमास पर्याय नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat