हिंदूंना न्याय मिळावा, हीच अपेक्षा!

    दिनांक  30-Jun-2019


 


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीदरम्यान मेरठमधील हिंदूंनी दहशतीमुळे पलायन केल्याचे तथ्य आढळले, तर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच मी सत्तेवर असताना असे काही होणे शक्यच नसल्याचेही म्हटले आहे. अर्थात मुख्यमंत्र्यांनीच आदेश दिल्याने या संपूर्ण प्रकरणावरील पडदा उचलला जाईल आणि इथल्या हिंदूंना न्याय मिळेल, इतकीच अपेक्षा!


अडीच-तीन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या कैरानातील हिंदूंच्या पलायनाचा विषय राष्ट्रीय मुद्दा झाल्याचे काहींना स्मरत असेल, तर काहींना नसेलही... हिंदूंना आपल्यावरील अन्यायाच्या, अत्याचाराच्या घटना विसरून जाण्याची तशीही सवयच असते म्हणा! म्हणूनच अशाप्रकारच्या घटना वारंवार घडतात. आताचे प्रकरणही उत्तर प्रदेशातलेच असून तेही हिंदूंच्या पलायनाशीच संबंधित आहे. राज्यातल्या मेरठ शहराच्या प्रल्हादनगर कॉलनीतून ४२५ पैकी १२५ हिंदू परिवारांनी पलायन केले असून त्याला कारण ठरली ती मुस्लीम समुदायातील अराजकी तत्त्वे! फाळणीनंतर १९४७ पासून शरणार्थी म्हणून आलेली ही हिंदू कुटुंबे प्रल्हादनगर कॉलनीत राहतात. तिन्ही बाजूंनी मुस्लिमांनी घेरलेल्या प्रल्हादनगर कॉलनीच्या मागेच मोहल्ला इस्लामाबाद आहे. मोहल्ल्याचा बाहेर जाण्याचा मार्ग हापूड रोडवर असून कॉलनी व या मोहल्ल्यादरम्यान एक गल्ली आहे. इथूनच सकाळ होत नाही तोच मुस्लीम समुदायातील टुकार युवकांच्या अंगात जणू काही क्रौर्य संचारते. प्रचंड वेगाने बाईक चालवत, विनाकारण हॉर्न वाजवत, बाईकवर स्टंट करत, शाळेला-शिकवणीला जाणाऱ्या मुलींची छेड काढत, अश्लील शब्दांत खाणाखुणा करत, इतकेच नव्हे तर चोरीमारी-लुटालूट; बंदुकीने गोळीबार करत हे युवक स्थानिक हिंदू समुदायात, महिला-मुलींत दहशत माजविण्याचे उद्योग करतात. हीच या मुलांची दिनचर्या झालेली असल्याने 'आज थांबेल, उद्या थांबेल,' असा विचार करूनही काही होत नाही... कसलाही फरक पडत नाही...

 

मुस्लीम युवकांचा हिंदूंविरोधातील उपद्रव सुरूच राहतो आणि हे गेल्या ५-६ वर्षांपासून चालू आहे. विशेष म्हणजे प्रशासनही याविरोधात स्थानिकांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता करताना दिसत नाही, तेही मुस्लिमांच्याच कलाने वागत असल्याचे समजते. कारण दोन्ही गल्ल्यांच्या मध्ये गेट उभारण्याची मागणी इथल्या हिंदू समुदायाने केली होती, पण मुस्लीम समुदायाने प्रत्येकवेळी त्याला विरोधच केला. म्हणूनच इथे हिंदूंच्या मागणीकडे कानाडोळा करत पोलिसांकडून तात्पुरते बॅरिकेड्स लावली जातात. पण त्याचा काहीही उपयोग होत नाही, मुस्लीम युवकांची हुल्लडबाजी जशीच्या तशी सुरूच राहते. परिणामी, कितीही संताप आला, चीड आली तरी मुस्लीमबहुल ठिकाणी राहणारा इथला हिंदू हतबल होताना दिसतो आणि मग तो निर्णय घेतो पलायनाचा! मुस्लीम समाजातील अराजकी युवक आपल्या उचापत्यांतून, उपद्व्यापांतून इथल्या हिंदूंना पलायनासाठी लाचारच करतात म्हणा ना! अर्थात यामागे मुस्लीम समाजातली 'आम्ही जेते आणि इतर समुदाय जित' असल्याची भावनाही आहेच. मध्ययुगीन काळातल्या या मानसिकतेतून आताची नवी पिढीही बाहेर पडलेली नाही, त्यामुळेच हे युवक तशाच कारवाया करताना दिसतात. शिवाय मुस्लिमांत ही भावना वाढीस लावणारी समाजविघातक मंडळीही याला कारणीभूत आहेतच. म्हणूनच इथल्या हिंदूंवर आपलेच राहते ठिकाण सोडण्याची वेळ आली. कितीतरी घरांबाहेर 'हे घर विकणे आहे' असे लिहिलेले आढळते. मुस्लीम समाजातील युवकांच्या भयाने ही सगळीच कुटुंबे आपली वर्षानुवर्षांपासूनची घरेदारे कवडीमोल किमतीला विकण्याइतके हतबल झाले आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेच आम्हाला या भीतीच्या, अराजकाच्या परिस्थितीतून बाहेर काढू शकतील, वाचवू शकतील, अशीही त्यांना आशा, विश्वास आहे.

 

आधी कैराना आणि आता मेरठमध्येही हिंदूंंच्या सामूहिक पलायनाच्या घटना घडत असताना देशातली कथित मानवाधिकारवाली, उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष, पुरोगामी गोटातली टाळकी मात्र शांतच असल्याचे दिसते. तीन वर्षांपूर्वीही यापैकी कोणी हिंदूंच्या पलायनाबाबत तोंडातून शब्दही काढला नाही ना आता. इतरवेळी अहिंदूंवरील कथित अन्यायाच्या क्षुल्लक घटना घडल्या, तरी या लोकांकडून मोठमोठ्याने गळे काढले जातात. हा देश आता राहण्यालायक नाही, देशात भीतीचा माहौल आहे, अशी विधाने ही मंडळी करताना दिसतात. यांच्यातलाच कोणीतरी मग पुरस्कारवापसीची टूम काढतो आणि असहिष्णुता, अंधार वगैरे वगैरे शब्दांची फेक करून स्वतःच्याच देशाला नावे ठेवण्याचे उद्योग करतो. पण आज का या लोकांचे तोंड शिवले गेले? आज का या लोकांना मेरठमधला अन्याय दिसत नाही? आरोपी, दोषी मुस्लीम समाजातील आणि पीडित हिंदू समाजातील आहेत म्हणूनच ना! म्हणजेच हिंदूंनी शेकडोंच्या संख्येने एका ठिकाणाहून दहशतीच्या, भयाच्या सावटामुळे पलायन केले तरी ते या लोकांना मंजूर असल्याचेच यावरून दिसते. अर्थात ही काही आजचीच गोष्ट नाही. नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यातून लाखो हिंदू जीव घेऊन पळाले, तेव्हाही मानवाधिकाराच्या नावाने कंठशोष करणारे चिडीचूपच होते. हजारो हिंदूंवर, स्त्रियांवर, मुलींवर अत्याचार केले, तेव्हाही उदारमतवादाचा जप करणारे मातीत चोच खुपसूनच होते आणि आजही आपण तसेच असल्याचे त्यांनी दाखवून दिले. या मंडळींचा मानवाधिकार, उदारमतवाद हिंदूंच्या रक्षणासाठी, हिंदूंना न्याय देण्यासाठी कधीच नसतो, तर मुस्लीम समुदायाच्या पायाशी लोळण घेण्यातच या लोकांना धन्यता वाटते.

 

यंदाच्याच वर्षीच्या, गुरुग्राममधील मुस्लीम युवकाच्या डोक्यावरील गोल टोपी काढण्याचा दावा, दिल्लीतील मदरसा शिक्षकाचा जय श्रीराम न म्हणण्यावरून गाडीने धडक दिल्याचा दावा, तिहार कारागृहातील मुस्लीम कैद्याच्या पाठीवर बळजबरीने ओम लिहिण्याचा दावा, मेरठच्याच विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीने मुस्लीम असल्याने त्रास दिल्याचा केलेला दावा, तेलंगणाच्या करीमनगरमध्ये एका मुस्लीम युवकाला जय श्रीराम न म्हटल्याने मारझोडीचा दावा या आणि अशा कितीतरी खोट्या, काल्पनिक कथानकांवरून देशातल्या मानवाधिकारवाल्यांनी, उदारमतवाद्यांनी कमालीचा गोंधळ घातला, पण पोलीस व प्रशासनिक तपासात हे सगळेच दावे चुकीचे असल्याचे उघड झाले. मग तरीही असे का होते? असे का केले जाते? तर यामागे मुस्लिमांना सदासर्वकाळ पीडित आणि हिंदूंना निर्दयी हल्लेखोरांच्या रुपात दाखविण्याचा डाव असल्याचे लक्षात येते. सोबतच मुख्य प्रवाहातील माध्यमांतही सातत्याने अशाच घटना झळकावून हिंदूच खरा गुन्हेगार आणि मुस्लीम हा निष्पाप असल्याचे चित्र तयार करण्याचाही कावा यामागे असेल. जेणेकरून कोणी हिंदू पीडित असेल तर ते समोरच येऊ नये, हिंदूंवर कितीही अन्याय झाला तरी त्याला स्पेसच मिळू नये आणि नंतर यातूनच आपले हितसंबंध राखले जावेत, असाही उद्देश असू शकतो. म्हणूनच आज मेरठमधील हिंदूंचे पलायन राष्ट्रीय मुद्दा झाल्याचे दिसत नाही. भाजप व हिंदुत्वनिष्ठ संघटना वगळता कोणीही याबद्दल बोलताना, त्याचा विरोध करताना पाहायला मिळत नाही. आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीदरम्यान मेरठमधील हिंदूंनी दहशतीमुळे पलायन केल्याचे तथ्य आढळले, तर कारवाईचे आदेशही दिले आहेत. तसेच मी सत्तेवर असताना असे काही होणे शक्यच नसल्याचा आत्मविश्वासही व्यक्त केला आहे. अर्थात मुख्यमंत्र्यांनीच थेट आदेश दिल्याने आगामी काळात या संपूर्ण प्रकरणावरील पडदा उचलला जाईल आणि इथल्या हिंदूंना न्याय मिळेल, इतकीच अपेक्षा!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat