मरणाऱ्या स्त्रियांचे काय?

    दिनांक  30-Jun-2019   विक्रोळीतली सत्यघटना. सधन संपन्न घरची १४ वर्षीय मुलगी वारली. घरात भावाला काही कारणामुळे क्षयरोग झाला. जंतूसंसर्गामुळे तिलाही झाला. तिच्या भावावर उपचार करण्यासाठी कुटुंबाने जंग जंग पछाडले. मात्र, या मुलीचा आजार लपविण्यात आला. भावाच्या उपचाराच्यावेळी घरातल्या इतरांची केस हिस्ट्री तपासण्यात आली, त्यावेळी या मुलीचा क्षयरोग उघड झाला. पण तोपर्यंत क्षयरोगाने या मुलीचे फुफ्फुस गिळंकृत केले होते. या मुलीला रुग्णालयात वेळीच का आणले नाही?, विचारल्यावर घरच्यांचे मुख्यतः आईचे उत्तर होते, "मुलीची जात आहे, टीबी झाला बाहेरच्यांना कळले असते तर तिचे लग्न जमले असते का? कुमारी मुलीचे पाप आम्हाला वाहावे लागले असते." बरं मग, तिच्यावर उपचार का केले नाहीत? तर उत्तर होते, "एकलुता एक पोरगा. त्याच्यावरच उपचार करताना खर्च हाताबाहेर जातोय. हा जगायला पाहिजे. हा बरा झाला की हिचे उपचार करू. पण ती मुलगी बरी होण्यासाठी वाचलीच नाही. महिलांसाठी सरकारी योजना आहेत. हजारो स्वयंसेवी संस्था महिलांच्या आरोग्यविषयावर काम करत आहेत. तरीही महिला आरोग्याचा प्रश्न तितकासा सुटला नाही. का? या का ला उत्तर आहे, जोपर्यंत समाजात महिलांची भूमिका दुय्यम गणली जात नाही, जोपर्यंत महिला शोषण करणाऱ्या कुप्रथा समाजातून हद्दपार होत नाहीत, तोपर्यंत हा प्रश्न सुटणारही नाही. आपल्याकडे मुलीला भावी वधू या रूपातच घडवण्याचा समाजाचा कल आहे. या हेतूपायी दमा, क्षय, थायरॉईड, संधीवात, मधुमेह, इतर शारीरिक आजार मुलींना झालेले असतील तर ते लपवायचा प्रयत्न केला जातो. मुलीला हे आजार आहेत, हे कुणालाही कळू नये म्हणून तिच्यावर उपचारही केला जात नाही. का? तर उद्या या मुलीचे लग्न करायचे आहे. तिने एखाद्या आजारावर उपचार घेतले होते हे जर कुणाला कळाले तर तिचे लग्न जमणार नाही, असा विचार केला जातो. खूपदा तर मुलगी नकोशीच असते. त्यामुळे तिच्या आजारावर फुकट खर्च करून तिला जगवण्याची इच्छाही तिच्या घरच्यांना नसते. अशी ही कित्येक कुटुंब आहेत की, तिथे पती आणि पत्नी दोघेही आजारी आहेत, उपचारासाठी पैशाची तंगी असेल तर अशावेळी कुणावर उपचार करायचा? समाजाचा मागोवा घेतला तर अशावेळी हा प्रश्नही उपस्थित केला जात नाही. कारण पुरुषाने जगले पाहिजे, हा अलिखित नियम पाळला जातो. भयंकर पण सत्य आहे. याला अपवादही आहेतच. पण अपवाद बहुवादाला उत्तर किंवा पर्याय नाही. या मरणाऱ्या मुलींचे आणि स्त्रियांचे काय?

 

मरण्याचे उघड गुपित

 

जगण्याचा हक्क कुणाला? कुणी जगावे? अर्थात जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाला निरोगी जगण्याचा हक्क आहे. निरोगी जगण्यासाठी आपल्या कुवतीप्रमाणे प्रयत्न, खर्च करण्याचासुद्धा हक्क आणि अधिकार आहे. भारत सरकारने आरोग्याला फायदेशीर असणाऱ्या अनेक योजना निर्माण करून तसा हक्क आणि अधिकार भारतीय जनतेला प्रदानही केला आहे. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनने एक सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणातील अहवालात स्पष्ट केले आहे की, आरोग्यदायी उपचार करण्यामध्ये भारतीय स्त्री ही पुरुषांपेक्षा मागे आहे. ऑर्गनायझेशनने देशभरातील शासकीय इस्पितळामध्ये उपचार घेत असलेल्या पुरुष आणि महिलांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातून त्यांनी निष्कर्ष काढला की, पुरुष सरासरी २३ हजार, ६६६ रुपये खर्च करतात तर महिला १६ हजार, ८८१ रुपये खर्च करतात. औषधांचा खर्च, डॉक्टरांची फी, वैद्यकीय चाचणी शुल्क, वैद्यकीय साहित्य यावर महिलांपेक्षा कितीतरी जास्त पटीने पुरुष खर्च करतात. अर्थात ऑर्गनायझेशनच्या सर्वेक्षणातून हे निष्कर्ष निघालेत म्हणून ते जगापुढे आले आहेत, असे समजण्याचे कारण नाही. कारण वंशभेद, प्रांतभेद, धर्मजातभेद वगैरे चौकटी मोडून एका गोष्टीवर समाजात एकजिनसीपणा आहे. ती गोष्ट म्हणजे स्त्री आजारपणामुळे जोपर्यंत अंथरूणावर पडत नाही, तिला हालचाल करता येत नाही, तोपर्यत ती कुटुंबासाठी राबतच असते. अर्थात या राबण्याचे तिला सोयरसुतक नसते. कारण सांस्कृतिक वारशातून आणि थोड्याबहुत भेदयुक्त परंपरेतून तिला तसे घडवलेच आहे की, तू सगळ्यांसाठी जग आणि घर इज्जतीसाठीच मर. जगण्यामरण्याच्या मध्ये तू आजारीबिजारी पडलीस तर तुझं अस्तित्वच मुळी कुटुंब आणि घर आहे, त्यामुळे त्यांचे काय ते आवरून सावरून तुला काय करायचे तर कर. या विधानावर खूप जणांच्या भुवया वक्र होतीलही. कारण, आई, बहीण, पत्नी यांच्यावर जीव ओवाळून टाकणारी कुटुंबेही आहेत. मात्र, असे प्रेमळ कुटुंब जरी असले तरी, कुटुंबाला आपल्यामुळे काही त्रास व्हायला नको म्हणून स्त्रिया आजार लपवतात. मी ठिक आहे रे, मला काय होतेय असे म्हणत यम स्वतः तिला घ्यायला येत नाही, तोपर्यंत ही सावित्री मरणयातना सहन करते. त्यामुळे स्त्रिया स्वतःच्या उपचारासाठी पैसे खर्च करतच नसणार, हे उघड गुपित आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat