हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ नवी आव्हाने - उपराष्ट्रपती

03 Jun 2019 17:15:13




तिरुपती : हवामान बदल, जागतिक तापमान वाढ यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहता यावे यासाठी अशा मुद्यांची वैज्ञानिक आणि संशोधकांनी दखल घ्यावी, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळेच्या वैज्ञानिक आणि युवा संशोधकांना ते आंध्रप्रदेशमधील तिरुपतीजवळ संबोधित करत होते. हवामान बदलामुळे दर दिवशी नवी आव्हानं निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.

 

चक्री वादळं, गारांचा पाऊस, दुष्काळ यासारख्या रुपात जागतिक तापमान वाढीचा आपल्याला फटका बसत आहे. हवामानाच्या बदलत्या स्वरुपामुळे कृषी आणि अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले. पाण्याची तीव्र टंचाई, नद्या कोरड्या होणे, वाढते प्रदूषण, प्राणी आणि वनस्पती वर्गाला अस्तित्वासाठी निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन वैज्ञानिक आणि संशोधकांनी याची तातडीने दखल घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

 

युवकांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी व्हावे या दृष्टीने राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळेने सोप्या पद्धतीने वातावरण विज्ञानाविषयी साहित्य निर्माण करावे असे आवाहन त्यांनी केले. वातावरणाविषयी अचूक अंदाज व्यक्त करण्याबरोबरच हवामान बदल ते दारिद्रय निर्मूलनासारख्या विविध आव्हानांवर उपाययोजना सूचवण्यावर वैज्ञानिकांनी लक्ष केंद्रीत करावे असे उपराष्ट्रपती म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0