पाचशे फूट दरीतून पाणीपुरवठा सुरू

    दिनांक  03-Jun-2019शहापूर : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील पंधरवड्यात शहापूर तालुक्यातील दापूर या अतिदुर्गम अशा आदिवासी वाडीला भेट दिली होती. आदिवासी ग्रामस्थांच्या पाणी, वीज, रस्ता याबाबतच्या समस्या समजल्यानंतर त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला त्यांनी दिले होते. गुरुवारी दापूर गावात तब्बल ५०० फूट दरीतून ‘जलपरी’द्वारे पाणी आल्यावर येथील वनवासींना पाण्याच्या त्रासातून मुक्तता मिळाली आहे. शहापूर तालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. दरवर्षी लागणाऱ्या टँकरपेक्षा यंदा अधिक टँकर प्रशासन पुरवित आहे. तालुक्यातील अनेक गाव-पाड्यांमधील ग्रामस्थांना, आदिवासी महिलांना हंडाभर पाण्यासाठी तब्बल दोन तासांची पायपीट करून दरीत उतरावे लागत असे.

 

मराठी तरुणाने आणली ‘जलपरी’

 

अरुण शिंदे या मराठी तरुणाने विदर्भातील नागपूर, भंडारा, नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाईविरोधात राबविलेल्या मोहिमेत सोलार वॉटरपंपच्या माध्यमातून शंभर ठिकाणी ‘जलपरी योजना’ राबविली आहे. त्याच धर्तीवर शहापूर तालुक्यातील डोंगराळ भाग असलेल्या दापूर या गावात प्रायोगिक तत्त्वावर या जलपरीचे काम सुरू केले होते. नाशिक जिल्ह्यातील ’ब्लू चिप पॉवर एनर्जी’ या अरूण शिंदे यांच्या स्वतःच्या कंपनीत जर्मनी, तैवान या देशातून सोलारसाठी आवश्यक असलेली साधनसामुग्री मागवली जाते. सोलार पंप, डी.सी. पंप, पवनचक्कीच्या माध्यमातून ही जलपरी बनवली जाते. दापूर गावाच्या मागील बाजूस असलेल्या वैतरणा नदीपात्रातून तब्बल ५०० फूट दरीतून या जलपरीद्वारे पाणी गावात आणले जाते. याच पद्धतीने तालुक्यातील डोंगराळ भागात पाण्यासाठी जलपरीची योजना राबविण्याची योजना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचाराधीन असून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे समजते. तसेच टंचाईग्रस्त गावपाड्यांत पाच हजार लिटरच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले असून सुमारे शंभरहून अधिक टाक्यांचे वाटप करण्यात आले आहे.

 

आठ दिवसांत सौरऊर्जाच्या दिव्यांनी सावरखेड चमकणार

 

दरम्यान, या दुर्गम भाग असलेल्या दापूर माळ, सावरखेड या गावाची पाणीसमस्या सोडविण्यात यश आले असतानाच लवकरच विजेचीही व्यवस्था उपलब्ध होणार आहे

 

पालकमंत्र्यांनी आमच्या समस्या जाणून घेत त्यावर तोडगा काढला व दौऱ्याच्या दिवसापासूनच आमच्या पाण्याची समस्या सोडवली.”

 

- विजय शिंगवा, ग्रामस्थ

 

प्रायोगिक स्तरावर जलपरीची योजना दापूर येथे राबवली असून, त्यामध्ये तब्बल ५०० फूट वर पाणी आणण्यास यशस्वी झालो आहोत. आता गावात ५००0 लिटरची टाकी बसवून त्यातून संपूर्ण गावात नळपाणी योजना राबविणार आहे. या योजनेचा अंदाजे खर्च सहा ते सात लाख आला असून तो मी स्वतः केला आहे.”

 

- अरुण शिंदे,

जलपरी पाणी योजना

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat