संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची सियाचीन भेट

    दिनांक  03-Jun-2019


 


नवी दिल्ली : संरक्षणमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्या दौऱ्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सियाचीनला भेट दिली. त्यांनी सियाचीन ग्लेशियर परिसरात असलेल्या लष्कराच्या तळास भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेची माहिती जाणून घेतली. तसेच, तेथील जवानांशीही संवाद साधला. सियाचीन हे जगातील सर्वात मोठे युद्धक्षेत्र असून ते समुद्रसपाटीपासून २० हजार फूट उंचीवर आहे. हा परिसर सदैव बर्फाच्छादित असतो. त्या भागाचे तापमान उणे ४० अंश सेल्सीअसपर्यंत असते.

 
 
 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सियाचीनच्या बेस कॅम्पवर असलेल्या युद्धस्मारकास श्रद्धांजली वाहिली. लेहमध्ये भारतीय लष्कराच्या ज्या १४ पलटणी तैनात करण्यात आल्या आहेत. त्या संदर्भातील ताजी माहिती तेथील लष्करी अधिकाऱ्यांनी संरक्षणमंत्र्यांना दिली. संरक्षणमंत्र्यांसोबत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत हेही होते. राजनाथ सिंह यांनी तेथील जवानांची चौकशी करण्याबरोबरच त्यांच्यासमवेत आपली छायाचित्रेही काढली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat