उन्हाळ्यात कोणते अन्नपदार्थ वर्ज्य करावे?

    दिनांक  03-Jun-2019ऋतुमानानुसार आपला आहार, विहार बदलणे तसे अपरिहार्य असते. पण, बरेचदा आपल्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे याकडे सहसा दुर्लक्ष केले जाते. त्यातही उन्हाळ्यात अधिकाधिक पाणी, फळांचे रस पिऊन ‘हायड्रेट’ राहण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. पण, सहसा उन्हाळ्यात काय खाऊ नये, याविषयी फारशी चर्चा होताना दिसत नाही. तेव्हा, सध्या तीव्र उकाड्याने त्रस्त असताना काही अन्नपदार्थांचे सेवन कमी केल्यास किंवा तात्पुरते थांबविल्यास त्याचा निश्चितच आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येईल. तेव्हा, आज अशाच काही अन्नपदार्थांविषयी जाणून घेणार आहोत, जे उन्हाळ्यात वर्ज्य करावे.

 

. मांसाहारावर मर्यादा

 

उन्हाळ्यात मांसाहाराचे कमीत कमी सेवन करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. त्याचे कारण म्हणजे चिकन, मटण यांसारख्या मांसाहारातून शरीरात उष्णतेचे प्रमाण आणखीन वाढते. तसेच मांसाहारामुळे शरीरातील चरबी अधिक वाढते आणि परिणामी रक्तातील कोलेस्टेरॉलमध्येदेखील वाढ होते. त्यामुळे उन्हाळ्यात खासकरून ‘रेड मीट’चे सेवन टाळा. ताजा माशांचे सेवन करायला आणि अंड्यांचेही मर्यादित स्वरूपात सेवन करायला हरकत नाही.

 

. उष्ण, आंबट फळांचे, भाज्यांचे सेवन टाळा

 

फळांचे सेवन करणे आरोग्यदायी असले तरी काही फळांचे, फळभाज्यांचे उन्हाळ्यात मर्यादित सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये प्रामुख्याने आंबट फळे तसेच टोमॅटो, गाजर, बीट, मिरची, लसूण यांचे सेवन टाळले पाहिजे. कारण, या अन्नपदार्थांमुळे शरीरातील उष्णता अधिक वाढू शकते. त्याऐेवजी काकडी, सलाड यांसारख्या शरीराला थंड ठेवतील, अशा भाज्यांचे सेवन करावे.

 

. अतिउष्ण आणि अतिशीत पदार्थांचे मर्यादित सेवन

 

गरमागरम चहा, कॉफी यांसारख्या अतिउष्ण पेयांचे उन्हाळ्यात मर्यादित सेवन करा. तसेच, एकदम गरमागरम, कडक चहा-कॉफी प्यायची सवय असेल, तर ते थोडे थंड करुन प्यावे. जेणेकरून पित्ताचा त्रास होणार नाही. त्याचबरोबर उन्हाळ्यात अतिथंड, बर्फयुक्त पदार्थांचे सेवनही टाळावे. खासकरून उन्हातून घरात पाय ठेवल्या ठेवल्या अतिथंड पाणी, शीतपेये, सरबत यांचे सेवन करू नये. वरकरणी त्यामुळे शरीराला थंडावा मिळत असला तरी गरमीतून आल्यानंतर अचानक थंड पदार्थ सेवन केल्याने शरीरांतर्गत तापमानात (जठराग्नी) अचानक मोठा बदल झाल्याने पित्ताचा त्रास होऊ शकतो.

 

. तेलकट, तळलेले अन्नपदार्थ टाळा

 

एरवीही आणि खासकरून उन्हाळ्यात तेलकट, तळलेल्या अन्नपदार्थांचे सेवन कटाक्षाने टाळावे. कारण, या तेलामुळे शरीरातील उष्णता वाढते. परिणामी, डिहायड्रेशनचा त्रासही तुम्हाला जाणवू शकतो. शिवाय, रक्तातील साखर, चरबी आणि कोलेस्टेरॉलही अशा तळलेल्या पदार्थांमुळे शरीराला घातक ठरू शकतात.

 

. खारट पदार्थ, सॉसचे सेवन नको

 

उन्हाळ्यात जेवणात चवीपुरत्या कमीत कमी मीठाचा वापर करावा. कारण, मिठातील एमएसजीमुळे अधिक भूक लागते आणि त्यामुळे वजनातही वाढ होऊ शकते. तसेच जर तुम्हाला भरपूर सॉस खायची असेल, तर किमान उन्हाळ्यात तरी सॉसचे सेवन कमीत कमी करावे. कारण, त्यातही मिठाचे प्रमाण जास्त असते.

 

. मद्यपान नको

 

मद्यपान कोणत्याही ऋतूत शरीराला घातकच असले तरी उन्हाळ्यात मद्यपानामुळे डिहायड्रेशनचा सर्वाधिक त्रास जाणवू शकतो. त्यामुळे थंडगार मद्यापासूनही उन्हाळ्यात चार हात लांबच राहावे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat