सामान्य जीणे नसावे सर्वमान्य

    दिनांक  03-Jun-2019जेव्हा आपल्याला आपल्याच सर्जनशीलतेवर विश्वास ठेवता येत नाही व एखादा धोका जाणीवपूर्वक घ्यायची प्रेरणा नसते तेव्हा आयुष्य हे मामुलीच असणार, यात कोणाला शंका नसावी. तेव्हा सर्वसामान्य व सर्वमान्य आरामदायी आयुष्य जगायचे की असामान्य आणि दुर्मीळ असे विधायक आयुष्य जगायचे याचा निर्णय घ्यायची गरज प्रत्येकाला आहे, हे खरे.


आपण सर्वसामान्य माणसासारखे जगायला लागतो. आपल्याला ते आवडते. कारण, ते जास्त सुखदायी भासते. सर्वसामान्य आयुष्य जगताना तसा कुठला अज्ञात धोका पत्करायचा नसतो. कुठले तरी आव्हान स्वीकारून कष्टाने घाम गाळायचा नसतो. फक्त आरामात बसायचे आणि जगायचे. डोक्याला त्रास नाही, शरीराला कष्ट कदाचित जास्त नाहीत. स्वप्न बघायची गरज नाही, ध्येय गाठायची घाई नाही. सगळे कसं संथ व सोईचे आपल्या मनाप्रमाणे करायचे. कसला वादविवाद नाही, दुसऱ्याशी मारामारी नाही. हे सगळे तसे पाहिले तर सुरक्षित वाटते. याला ‘कम्फर्ट झोन’ असेही म्हणता येईल. या झोनमध्ये राहून जीवनात काही अधिक मिळत नाही. आपल्याला त्याच त्याच गोष्टी व तेच तेच दैनंदिन आचार करावे लागतात. उगाच आपला नेहमीचा मार्ग बदलून काहीतरी नवे शोधण्यासाठी त्रासदायक जीवनशैलीचा अनुभवही घ्यावा लागत नाही. आपण अधिक पैसा कमवू शकतो. कदाचित आणखी आरामदायी जीवन जगू शकतो. आपली विधायकता वाढवू शकतो. याचा काही लौकिक माणसांना अंदाज नसतो. अशा पद्धतीने सुरक्षित जीवन जगणारी माणसे आत्मसंतोषी असतात. भविष्यात काहीतरी नवनिर्मित करून पाहावे व नवखे आव्हाने पेलावे, या विचारांपासून ही मंडळी मैलोन्मैल दूर राहतात. साधारण आयुष्यातले सामान्य जीणे त्यांना खूप प्रिय असते.

 

आत्मसंतोषी असल्याने आयुष्यात अधिक काही मागावे असे त्यांना सहसा वाटत नाही. त्यांना नोकरीतली सुरक्षितता हवी असते. बँकेत साठविलेल्या पैसा पुरेसा वाटतो. आपण ज्या परिस्थितीत राहतो, त्या परिस्थितीत ते आनंदी वा समाधानी असतील, असे नाही. शिवाय ज्या नोकरीत ते असतात, ती त्यांना आवडत नसेलही, पण त्याच्या आत्मसंतोषी स्वभावामुळे आपण व आपलं आयुष्य बदलायला लागेल, या संकल्पनेचीच त्यांना भीती वाटते. आपण जिथे आहोत आणि जसे आहोत तिथेच त्यांना निर्धोक व खुशाल वाटते. खरे तर जे लोक आपल्या जीवनातून अधिकची अपेक्षा करतात, उत्साहपूर्ण असतात, महत्त्वाकांक्षा मनी ठेवतात, भविष्यापुढील स्वप्ने पाहतात ते लोक लोभी आहेत, असमाधानी आहेत, असं आत्मसंतोषी मंडळींना कायम वाटतं. आपण आत्मसंतोषी आहोत म्हणजे समाधानी आहोत, अशी त्यांची समजूत झालेली असते. ‘जे आहे त्याच्यात समाधान मानून जगा,’ अशी त्यांची ‘फिलॉसॉफी’ असते. ही ‘फिलॉसॉफी’ सगळ्यांसाठी सर्वसाधारण लागू असू शकत नाही. ती मंडळी खूप काही केल्यानंतर, अमाप यश मिळाल्यानंतरही स्वतःला उगाचंच रेटत राहतात. सगळं काही मुबलक असूनही आणखी मिळवण्यासाठी धडपडत राहतात. त्यांनी आहे त्यात समाधान मानावं. उगाचच जीवाला त्रास करून घेऊ नये. पण, ज्यांच्याकडे मर्यादित असूनही अमर्याद पाहता येत नाही, काहीतरी अधिक मिळवून पाहावं, असे वाटत नाही, त्यांच्यासाठी जे आहे त्यात समाधान मानण्यात जर तृप्ती वाटत असेल, तर ते खूपच दयनीय आहे.

 

कारण, आपण जिथे आहोत तिथेच बरे आहोत, नाहीतर आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी आपलाच विनाश होईल, अशा अपरिपक्व विचारांना पोसणाऱ्या मंडळींचे काही खरे नाही. या ‘कूपमंडूक’ तत्त्वज्ञानात जगणाऱ्या मंडळींना आयुष्य एकदाच मिळते. त्यामुळे ते पूर्ण समर्पणाने जगावे व जितका सर्जनशीलतेचा आनंद घेता येईल, तितका तो घ्यावा, याचे ज्ञान व भान दोन्हीही नसते. ‘रटाळपणा’ हा या व्यक्तीच्या आयुष्याचा पाया असतो, तर ‘सामान्यपणा’ हा कळस असतो. या मंडळींच्या मनात अज्ञाताचे भय प्रचंड असते. आयुष्यात येणारा बदल काहीतरी भयानक आणि विघातक करून जाणार आहे, याची अवास्तविक व काल्पनिक भीती त्यांच्या मनात बसलेली असते. आपल्या सजीवतेत किती गोष्टी व प्रसंग अपयशी झाल्या आहेत किंवा होणार आहेत, याची बेअकली आणि हास्यास्पद गणना करण्यातच या व्यक्ती कुशल असतात. बुद्धीचा हा असा निरर्थक व भाकड वापर करणाऱ्या या पृथ्वीच्या बालकांना अयशस्वी होण्यापासून कोण वाचवू शकणार? आपल्या आयुष्यात जिथे आपल्याला सुरक्षित वाटत आहे, तिथेच आपण वस्तीला राहायचे, एवढीच माफक कल्पना त्यांच्या मनात असते. अशा व्यक्तींकडे आयुष्यात प्रचंड ऊर्जा असू शकते व त्यातून खूप नावीन्यपूर्ण व सुपीक असे आयुष्य घडविता येईल आणि याचा विचार करण्याची क्षमता नसते. जेव्हा आपल्याला आपल्याच सर्जनशीलतेवर विश्वास ठेवता येत नाही व एखादा धोका जाणीवपूर्वक घ्यायची प्रेरणा नसते तेव्हा आयुष्य हे मामुलीच असणार, यात कोणाला शंका नसावी. तेव्हा सर्वसामान्य व सर्वमान्य आरामदायी आयुष्य जगायचे की असामान्य आणि दुर्मीळ असे विधायक आयुष्य जगायचे याचा निर्णय घ्यायची गरज प्रत्येकाला आहे, हे खरे.

 

- डॉ. शुभांगी पारकर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat