कोंढवा दुर्घटना; मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत

    दिनांक  29-Jun-2019पुणे : पावसामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पुण्यातील कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख आणि जखमींना २५ हजार रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली आहे.


या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणाले, बांधकाम मजूर रहात असलेल्या कच्च्या झोपडीवर रात्री दीडच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो.

 

बिहार सरकारने जाहीर केली मदत

 

या दुर्घटनेतील सर्व व्यक्ती बिहारचे असल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये व जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

 

राज्यपालांना दुःख

 

गृहनिर्माण संकुलाची संरक्षण भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी दुःख व्यक्त केले आहे. पुणे येथील गृहनिर्माण संकुलाची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत निरपराध कामगार, महिला व मुलांना जीव गमवावा लागला हे समजून अतिशय दुःख झाले. गमावलेला प्रत्येक जीव मोलाचा होता. या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींच्या आप्तेष्टांना मी आपल्या शोकसंवेदना कळवतो तसेच सर्व जखमी व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी म्हटले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat