स्वप्नातही दिलेला शब्द पाळतो; तोच कर्माने मराठा ठरतो

    दिनांक  28-Jun-2019मुंबई : मराठा आरक्षणाच्या वैधानिकतेवर उच्च न्यायालयाने गुरुवारी शिक्कामोर्तब केल्यामुळे मराठा समाजासोबत सरकारमध्येही आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा दिलेला शब्द पाळल्याने सकल मराठा समाजामधून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सरकारचे आभार मानले जात आहेत.


मराठा आरक्षणाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. अखेर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आपला निकाल जाहीर करत अपवादात्मक स्थितीत आरक्षणात ५० टक्के बदल शक्य असल्याचे मत व्यक्त करत फडणवीस सरकारने दिलेले मराठा आरक्षण ग्राह्य असल्याचे सांगितले. यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा महापूर आला असून #DevendraRealMaratha हा हॅशटॅग सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.


मराठा आरक्षणाच्या वैधानिकतेवर उच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केल्यामुळे शासनाने एक मोठी लढाई जिंकली असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याबद्दल सकल मराठा समाजाने देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले असून स्वप्नातही दिलेला शब्द पाळतो; तोच कर्माने मराठा ठरतो, अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत.


दरम्यान, राज्य शासनाने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाने आयोगाच्या अहवालाने केलेल्या अभ्यासाच्या आधारे नोकरीसाठी १३ टक्के आणि शिक्षणासाठी १२ टक्के आरक्षणाची शिफारस केली आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat