‘खाकीतला सर्पमित्र’

    दिनांक  28-Jun-2019   


 

 
 

पोलीस दलात कार्यरत असूनही ‘सर्पमित्र’ म्हणून सुपरिचित असणारे पोलीस शिपाई मुरलीधर जाधव यांना नुकतेच मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्यावतीने गौरविण्यात आले. त्यानिमित्ताने...

 
 
मुंबई ( अक्षय मांडवकर) :  वयाच्या आठव्या वर्षी झालेल्या सर्पदंशाने सर्पजीवांविषयी भीती निर्माण होण्याऐवजी जळगावच्या मुरलीधर जाधव यांच्या मनात या जीवांप्रति जिव्हाळा निर्माण झाला. या घटनेनंतर नागरी वस्तीत शिरणार्‍या सापांना पकडण्याचे काम ते करू लागले. पुढे पोलीस दलात भरती झाल्यानंतर त्यांच्या या कामाची व्याप्ती वाढली. आज मुंबई पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असणार्‍या जाधव यांना ’खाकीतला सर्पमित्र’ म्हणून ओळखले जाते. गेल्या १२ वर्षांच्या पोलीस दलातील आपल्या सेवेत त्यांनी सुमारे चार हजारांहून अधिक साप पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या बचाव कार्यादरम्यान त्यांना एकदाही सर्पदंश झालेला नाही. ‘वन्यजीवांचे रक्षण’ आणि ‘नागरिकांची संकटामधून सुटका’ अशी दोन्ही ध्येये या कामातून साध्य होत असल्याचे जाधव सांगतात.
 
 

 

 

जळगाव जिल्ह्यातील लाहोरा या छोट्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात १६ एप्रिल, १९८६ साली मुरलीधर यांचा जन्म झाला. शेतीवरच कुटुंबाचे पोट असल्याने लहानपणापासूनच मुरलीधर शेतकामासाठी शेतावर जातं. अशीच एकदा ज्वारीची पेंढ उचलताना त्याखाली दडलेल्या विषारी नागाने त्यांना दंश केला. त्यावेळी मुरलीधर आठ वर्षांचे होते. सर्पदंशाचा उपचार मांत्रिकच करू शकतो, या अंधश्रद्धेने गावाला जखडले होते. त्यामुळे गावातील मांत्रिकाकडे त्यांना घेऊन जाण्यात आले. मांत्रिकाच्या भोंदूगिरीने फरक न पडल्याने त्यांना तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. तोपर्यंत मुरलीधर यांच्या शरीरभर विषाचा प्रभाव पसरला होता. डॉक्टरांनीदेखील त्यांच्या जगण्याची आशा सोडून दिली होती. अशा कठीण प्रसंगी मदतीला चाळीसगावचे सर्पमित्र राजेश ठोंबरे धावून आल्याचे जाधव सांगतात. ठोंबरे यांनी जळगावहून विषविरोधी औषध मागवून मुरलीधर यांचे प्राण वाचविले. या घटनेमुळे आपला पुनर्जन्म झाल्याची भावना मनात ठेवून मुरलीधर यांनी सापांच्या निरीक्षणास सुरुवात केली. ठोंबरे यांच्याकडून साप पकडण्याचे प्राथमिक ज्ञान शिकून घेतले. मात्र, या कामाला कुटुंबाचा विरोध होता. अशा वेळी भाऊ राजेंद्र जाधव यांनी पाठिंबा देऊन घरच्यांची समजूत काढली. पुढे शालेय आणि महाविद्यालयीन वयात मुरलीधर सापांच्या बचावाचे काम करत होते.
 

विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेले मुरलीधर अपघाताने पोलीस दलात भरती झाले. २००७ मध्ये ते पोलीस दलात रुजू झाले. त्यांच्यासोबत भरती झालेल्या सहकार्‍यांना जाधव सर्पमित्र असल्याचे माहीत होते. त्यामुळे शहरात साप आढळल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर हौशी सर्पमित्रांना बोलाविण्याऐवजी मुरलीधर यांना पाठविण्यात येऊ लागले. 2014 साली घडलेल्या एका प्रसंगाने मुरलीधर प्रकाशझोतात आले. वांद्रे-कलानगर येथील ’मातोश्री’ बंगल्याच्या शेजारील बंगल्यात अजस्र अजगर शिरला होता. त्याला बाहेर काढण्याची जोखीम मुरलीधर यांनी उचलली आणि त्याची सुखरूप सुटका केली. या घटनेने ते प्रसिद्ध झाले. त्यांना अधिकाधिक सापांच्या बचावकार्यासाठी पाठविण्यात येऊ लागले. दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात कार्यरत असताना घडलेल्या एका प्रसंगाची आठवण मुरलीधर सांगतात. वरळीच्या ‘लीली कॉटेज’ परिसरातील एका गल्लीत नागीण शिरली होती. त्यावेळी गल्लीच्या एका टोकाला शाळकरी मुले अडकून राहिली होती. एकूणच परिस्थितीचा अंदाज घेता नागिणीला हातानेच पकडावे लागणार होते. मुरलीधर यांनी बड्या हिंमतीने नागिणीच्या फण्यावर हात ठेवून तिला पकडले आणि मुलांची त्या कठीण प्रसंगामधून सुटका केली.

 

 
 
 
 गेल्या १२ वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत राहून मुरलीधर सर्पबचावाचे काम करीत आहेत. काही हौशी सर्पमित्र या कामासाठी पैसे आकारत असल्याने त्यांना हे काम करावे लागले. मात्र, बालपणापासूनच जे काम करण्याची गोडी होती ते काम मुरलीधर यांना पोलीस दलात करण्याचे समाधान मिळाले. सध्या ते पोलीस शिपाई म्हणून कुर्ला पोलीस ठाणे येथे नियुक्तीस असून मध्य नियंत्रण कक्ष येथे प्रतिनियुक्तीस आहेत. गेल्या दशकभरात त्यांनी सुमारे साडेचार हजार सापांची मानवी वसाहतीतून सुखरूप सुटका केली आहे. विशेष म्हणजे, या कामाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची ’मानद वन्यजीव रक्षक अधिकारी’ म्हणून नियुक्ती केली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्याकडून उत्कृष्ट कामगिरीबाबत १० हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मुरलीधर जाधव यांना पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’ कडून शुभेच्छा...!
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat