आता प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कक्ष

28 Jun 2019 17:02:05



डॉ.रणजित पाटील यांची विधानसभेत माहिती

 

मुंबई : राज्यात अंमली पदार्थांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्यासाठी मुंबई शहरात स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात एक कक्ष स्थापन करण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी आज विधानसभेत दिली. ते यावेळी म्हणाले, मुंबईतील युनिटची संख्या वाढविण्यात येईल, त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून दिला जाईल. संबंधित कायद्यात सुधारणा करून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यात अंमली पदार्थाची विक्री कुरिअर व पोस्टामार्फत होत असल्यासंदर्भात अजित पवार यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यास उत्तर देताना डॉ.पाटील बोलत होते.

 

डॉ.पाटील म्हणाले, मुंबईच्या धर्तीवर राज्यात ठाणे, पुणे व नागपूर या आयुक्तालयाच्या ठिकाणी व औरंगाबाद, नाशिक शहर, रायगड या जिल्ह्याकरीता स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन केले आहेत. यासंदर्भातील गुन्ह्याचे प्रकरण दिवाणी न्यायालयाऐवजी सत्र न्यायालयात चालविणे, दोन वर्षांची शिक्षा १० वर्षे तर १० वर्षाची शिक्षा २० वर्षे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाने केलेल्या कारवाईअंतर्गत एक हजार २१ कोटी ७३ लाख २१ हजार ८५३ रूपयांचे फेंटनेल ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. मुंबई शहरात अंमली पदार्थ विरोधी कक्षामार्फत आझाद मैदान, वरळी, बांद्रा, घाटकोपर व कांदिवली हे पाच युनिट कार्यरत असून, यांच्यात वाढ करण्यात येईल. तसेच विशेष पथकासाठी मनुष्यबळ वाढविण्यात येईल. कोणताही निधी कमी पडू देणार नसल्याची माहिती डॉ.पाटील यांनी यावेळी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0