राहुल व सोनिया गांधी यांनी नरसिम्हा राव यांची माफी मागावी : एन. व्ही. सूभाष

    दिनांक  28-Jun-2019


 

हैदराबाद : पी. व्ही. नरसिम्हा राव यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नातवाच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नरसिम्हा राव यांची माफी मागावी, अशी मागणी त्यांचे नातू एन. व्ही. सूभाष यांनी केली आहे. नरसिम्हा राव यांची आज जयंती असून एकाही नेत्याने त्यांना आदरांजली वाहिली नसल्याने त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

 

कॉंग्रेसने गांधी परिवारावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी नरसिम्हा राव यांच्यासारख्या एका माजी पंतप्रधानाकडे कायम दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ते कॉंग्रेसमधील सर्वात विश्वासू नेते असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. गांधी परिवार आणि कॉंग्रेसला मार्गदर्शन करणाऱ्यांपैकी ते एक होते, असेही ते म्हणाले. गांधी परिवारातील व्यक्ती सोडल्यास कॉंग्रेसने आजवर इतर नेत्यांकडे कायम दुर्लक्ष केल्याची टीका त्यांनी केली विशेषतः त्यात नरसिम्हा राव यांच्यावर अन्याय झाल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

 

एन. व्ही. सूभाष हे २०१४ रोजी भाजपमध्ये सहभागी झाले. त्यांनी पक्षासाठी तेलंगणामध्ये कामाला सुरुवात केली. पी. व्ही. नरसिम्हा राव यांच्यावर झालेल्या अन्यायाची खदखद त्यांनी त्यांच्या जयंतीनिमित्त व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "नरसिम्हा राव यांच्या मृत्यूसमयी त्यांचे पार्थीव हे कॉंग्रेसने दिल्लीतील मुख्यालयात नेण्यास परवानगी दिली नाही, हे स्पष्ट आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात पक्षाशी कधी दुजाभाव केलेला नाही.नरसिम्हा राव यांनी पक्षाला दिलेल्या योगदानाचा मोबदला त्यावेळी पक्षश्रेष्ठींनी त्यांना दिला नाही. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल किमान सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी सुभाष यांनी केली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat