त्या बहिणींची सजा माफ व्हावी!

28 Jun 2019 22:31:52



मानवी नातेसंबंध, मानवी मूल्यं यांची चिरफाड करणाऱ्या मिखाईलला जगण्याचा तसाही अधिकारच नव्हता. पण, तरीसुद्धा कायदा हातात घेतला म्हणून या तिघी बहिणींना सबळ पुराव्यामुळे शिक्षा झाली. मात्र, रशियाची जनता या बहिणींच्या सोबत आहे.


रशियामध्ये क्रेस्टिना, एंजेलिना आणि मारिया या तीन बहिणींना तिथल्या न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कारण, या तीन बहिणींनी गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यामध्ये मिखाईल केचाट्यूरेन याचा खून केला होता. मात्र, न्यायालयाने या तीन बहिणींची शिक्षा माफ करावी म्हणून त्यांच्या समर्थनार्थ रशियामध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. या बहिणींची सुटका व्हावी म्हणून तिथे उत्स्फूर्तपणे जनआंदोलन सुरू आहे. रशियन जनता या तीन बहिणींच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. कारण आहे, जगाच्या पाठीवर मानव म्हणून माणसाला ओळख देणारी सद्सद्विवेकबुद्धी. रशियन नागरिकांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत आहे, याचा पुरावा म्हणजेच त्यांचे हे आंदोलन. कारण, या मुलींनी ज्याचा खून केला तो मिखाईल केचाट्यूरेन हा कोणी परका किंवा बाहेरचा माणूस नसून, तो या मुलींचा जन्मदाता बाप होता. पण बापाच्या उदात्त भूमिकेला मिखाईलने काळिमा फासला. तो स्वतःच्या पोटच्या पोरींना क्रूरपणे मारहाण करीत असे. इतकेच नव्हे तर या मुलींचे, या तीनही बहिणींचे हा नराधम लैंगिक शोषण करत असे. या बहिणींनी नकळत्या वयापासून हे अत्याचार सहन केले. शारीरिक, मानसिक आघाताने खचून गेलेल्या या बहिणींनी या भयंकर नरकयातनांमधून सुटण्यासाठी मिखाईलचा खून केला.

 

मानवी नातेसंबंध, मानवी मूल्यं यांची चिरफाड करणाऱ्या मिखाईलला जगण्याचा तसाही अधिकारच नव्हता. पण, तरीसुद्धा कायदा हातात घेतला म्हणून या तिघी बहिणींना सबळ पुराव्यामुळे शिक्षा झाली. मात्र, रशियाची जनता या बहिणींच्या सोबत आहे. हे सोबत असणे खूप महत्त्वाचे. असो, या पार्श्वभूमीवर रशियाच्या तीन बहिणींनी त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करणाऱ्या मिखाईलची हत्या केली, हे योग्यच केले म्हणावे लागेल. मात्र, यावरही काही कायदेपंडितांचे म्हणणे आहे की, कायद्याने शिक्षा झाली असती त्या राक्षसाला. मुलींनी कायदा हातात घ्यायला नको होता. हे म्हणजे 'जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे,' असे झाले. त्या तीन बहिणींनी काय सोसले असेल आणि त्यांना काय वाटले असेल, हे त्यांचे त्याच जाणोत. या मुली वयाने मोठ्या होत्या, त्यामुळे त्यांच्यात अन्यायाला अन्याय समजण्याची आणि त्याला विरोध करण्याची शक्ती होती. पण, आफ्रिका खंडातील त्या छोट्या बालिकांचे काय? हकनाक मरणाऱ्या त्या दुधपित्या मुलींचे काय? भुरट्या चोराने कुणाचे पाकीट मारावे, ही बातमी आपल्याकडे जशी फुटकळ समजली जाते, त्याचप्रकारे आफ्रिकेत एक घटना, एक बातमी अशीच फुटकळ समजली जाते. ती घटना, बातमी असते- वय वर्षे काही तास ते १-२ वर्षाच्या लहान बालिकेचे लैंगिक शोषण झाले, त्यात त्या बालिकेचा मृत्यू. ही बातमी आफ्रिका खंडामध्ये अगदीच नगण्य गणली जाते. कारण, तिथे या घटनेची वारंवारिता जास्त आहे. ही अशी घटना घडली तर लोकांना त्यात काही आश्चर्य वा गुन्हाही वाटत नाही.

 

का? कारण आजही आफ्रिका खंडातील बहुतेक लोकांमध्ये समज आहे की, आईच्या दुधावर असणाऱ्या बालिकेशी संभोग केला असता, सर्व लैंगिक समस्या सुटतात. त्यातही लैंगिक आजार असतील तर ते बरे होतात. एड्सही बरा होतो. त्यामुळे नवजात बालिकेचे अपहरण होणे, तिच्यावर अत्याचार होणे किंवा कुटुंबातल्याच कुणीतरी तिच्याशी कुकर्म करणे, या गोष्टी तिथे अंगवळणी पडलेल्या. अंधश्रद्धेचा बळी होणाऱ्या या बालिका... त्यांच्या किंकाळ्या, त्यांचे दुःख तिथले समाजमन थंडपणे पाहतो. तिथले प्रशासन, स्वयंसेवी संस्था या अंधश्रद्धेविरोधात जागरूकता आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. पण, तरीही या दुधपित्या बालिकांवरचे अत्याचार थांबायचे नाव घेत नाही. त्याचे कारण सांगितले जाते की, या बालिकांच्या जवळच्या नात्यातल्या महिला जसे आई, आजी वगैरे महिला, बालिकांवरचे अत्याचार दडपून टाकण्याचा प्रयत्न करतात. कारण, घरातल्या पुरुषमाणसाने हा अत्याचार केला असेल तर त्याला शिक्षा होईल. सगळ्यात महत्त्वाचे, इज्जतीचे काय? लोक काय म्हणतील? अमुकअमुक कुटुंबामध्ये असे झाले. कुणालाही कळू नये म्हणून तिथे ही प्रकरणे गुपचूप दडपली जातात. इज्जत वगैरे वाचवण्यासाठी लहान बालिकेवर होणारे अत्याचार लपवायची सवय तिथेही दिसते. मुलगीच होती, ती मेली तर काय झालं? अशीच एकंदर मानसिकता तिथेही. मुलींच्या जगण्याला मरणयातनांचा स्तर देणाऱ्या परिस्थिती जगाच्या पाठीवर या ना त्या स्वरूपात कायम आहेत. या पार्श्वभूमीवर लैंगिक शोषणाच्या कू्रर अत्याचाराला सुरुंग लावणाऱ्या रशियाच्या तीन बहिणींची माफ व्हायलाच हवी.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0