७५ देशांची 'क्षितिज' सवारी

    दिनांक  28-Jun-2019   ७५ देशांची सायकलस्वारी करण्यासाठी निघालेल्या क्षितिजने 'वसुधैव कुटुम्बकम्' हा संकल्प सोडत एक पराक्रम करण्याचा निर्धार केला आहे. त्याच्या प्रवासाबद्दल...


काहीतरी 'वेगळे' करण्याची इच्छा असेल, तर त्यासाठी प्रचंड मेहनत आणि जिद्दीची आवश्यकता असते. कोकणातील क्षितिज विचारे या मराठमोळ्या तरुणाने तब्बल ७५ देश फिरून एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जगात 'नाव' करायचे असेल तर झपाटून, वेडे होऊन ध्येयाच्या मागे चालत राहणे एवढाच पर्याय उरतो. मूळ रायगड येथील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे राहणारा क्षितिज विचारे या २७ वर्षीय तरुणाने नेमका हाच पर्याय स्वीकारला आणि जगाच्या सफरीवर एका सायकलद्वारे तो निघाला. विविध देशांत एकट्यानेच सायकलिंग करून नव्याने जग शोधण्याच्या ध्येयाने त्याने आपल्या प्रवासाची सुरुवात केली आहे. चार खंडांतील ७५ देश आणि ७५ हजार किमी सायकल प्रवास करण्यासाठी निघालेल्या क्षितिजला वयाच्या सातव्या वर्षापासून सायकलिंगचा छंद. पुढे 'गिर्यारोहण' आणि 'सायकलिंग' या साहसी छंदासाठी त्याने आपले अवघे जीवन समर्पित केले. यापूर्वी मुंबई ते नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प असा आठ हजार किमींचा प्रवास २६ जानेवारी, २०१८ रोजी क्षितिजने एकट्याने पूर्ण केला. भारतातील किनारपट्टीच्या मार्गाने केरळ, कन्याकुमारी, चेन्नई, पश्चिम बंगाल, आसाम, गंगटोक, भूतान आणि नेपाळ असा प्रवास करत माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत सायकलने प्रवास करणारा तो पहिला भारतीय ठरला. इतक्यावर न थांबता क्षितिजने आणखी मोठे ध्येय ठेवत त्या दृष्टीने प्रवासही सुरू केला. तीन वर्षांत हे ध्येय पूर्ण केले.

 

'वसुधैव कुटुम्बकम्' हा संकल्प सोडत क्षितिजाला गवसणी घालण्याची मोहीम फत्ते करण्याची तयारी त्याने सुरू केली आहे. दि. १५ ऑगस्ट, २०१९ रोजी मुंबईच्या 'गेट वे ऑफ इंडिया'पासून सुरू होणारा त्याचा हा प्रवास २०२२ म्हणजे तब्बल तीन वर्षांनंतर फ्रान्सच्या आयफेल टॉवर येथे पूर्ण होणार आहे. ज्यात पहिल्या वर्षी तो भारत ते चीन असा २५ हजार किमीचा प्रवास करेल, तर दुसऱ्या वर्षी चीन ते तुर्कीपर्यंत २० हजार किमीचा प्रवास करणार आहे. एकूण ३० हजार किलोमीटर प्रवास करत ३७ देशांची तुर्की ते फ्रान्स अशी सायकलस्वारी करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. मराठीमातेचा हा सुपुत्र आपल्या साहसाने जगातील अनेक देशांची संस्कृती व विविधता जवळून पाहणार आहे. या सर्व प्रवासात तो दक्षिण-ईशान्य आशियाई व चीन-मध्य आशियातील देशांमधून सायकल रपेट करणार आहे. जगात सायकलवरून फेरफटका मारण्याची त्याची जिद्द भल्याभल्यांना अचंबित करणारी आहे आणि म्हणूनच त्याच्या या प्रवासाला जगभरातील सायकलपटूंनी शुभेच्छाही दिल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रवासाकरिता निश्चितच चांगल्या नियोजनाची आणि व्यवस्थापनाची गरज आहे आणि याची जबाबदारी त्याचे काही सहकारी सांभाळत आहेत. माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रातील त्याचे सहकारी सच्चिदानंद जोशी, क्रीडा क्षेत्रातील प्रसाद चौलकर, पर्यटन क्षेत्रातील आशिष हिंगमिरे, 'पीस्क्वेअर एज्युस्पोर्ट्स फाऊंडेशन, मुरुड-जंजिरा या संस्थेने क्षितिजच्या या स्वप्नांना बळ देण्याचे ठरविले आहे. सर्व नागरिक तसेच व्यावसायिकांनी क्षितिजला सढळ हस्ते आर्थिक मदत करण्यासाठी आवाहनही केले आहे. त्यासाठी ८२६९०६८४९२ या क्रमांकावर 'पीस्क्वेअर एज्युस्पोर्ट्स फाऊंडेशन'ला संपर्क करण्याचे आवाहन त्याने केले आहे. या संपूर्ण प्रवासात क्षितिजला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. ज्यात बदलणारे हवामान, विविध देशांतील विविध बोलीभाषा आणि आहार ही प्रामुख्याने मोठी आव्हाने त्याच्यासमोर असतील.

 

विविध देश फिरण्यासाठी महत्त्वाचा असणारा व्हिसा आणि तो मिळवण्यासाठीची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. प्रत्येक देशात जाऊन तेथील व्हिसा प्रक्रिया पार पाडण्याचे 'दिव्य' त्याला पार पाडायचे आहे. याशिवाय प्रत्येक ठिकाणी पोहोचल्यावर तेथील भाषा, संस्कृती, नागरिक, जेवण, वातावरण आदींशी जुळवून घेण्याची तयारी क्षितिजने केली आहे. त्याच्या या कार्यात त्याला सच्चिदानंद जोशी हे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून देणार आहेत. त्याला व्हिसासह अन्य बाबींमध्ये मदत करणार आहेत. प्रसाद चौलकर यांनी क्षितिजला प्रशिक्षणासह 'फिटनेस'साठी मदत केली आहे. आशिष हिंगमिरे यांनी त्याच्या संपूर्ण प्रवासाची आखणी करून देण्यास सहकार्य केले. 'पीस्क्वेअर एज्युस्पोर्ट्स फाऊंडेशन'तर्फे या महत्त्वाच्या टप्प्यात नित्यनेमाने त्यात क्षितिजसोबत राहण्याची जबाबदारी उचलली आहे. क्षितिजच्या रोजच्या प्रवासाची संपूर्ण माहिती कुटुंबीयांना देणे, दुसऱ्या दिवसाची तयारी असा सगळा पसारा त्याच्या टीमला पाहायचा आहे. या साऱ्यात क्षितिजला कुटुंबीयांची साथ महत्त्वाची ठरत आहे. आपल्या घरातील तरुण मुलगा जगाच्या पाठीवर एकटा हिंडणार म्हटल्यावर विरोध होणार हे निश्चित होतं. मात्र, कुटुंबीयांना समजावून क्षितिजने प्रत्येक दिवसाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचे वचन दिले आहे. क्षितिज ज्या देशांतून जाणार आहे, त्यापैकी काही देशांमध्ये असलेली युद्ध आणि तणावात्मक स्थिती या साऱ्याची कल्पना त्याने घरच्यांना दिली आहे. या मोठ्या अग्निदिव्यातून तावून सुलाखून जात त्याने पराक्रम करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. आतापर्यंतच्या अनुभवाच्या जोरावर जिद्दीने सर्व अडथळ्यांवर मात करून क्षितिज ध्येय नक्की गाठेल, अशी दै. 'मुंबई तरुण भारत'तर्फे सदिच्छा...!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat