पालखी सोहळ्यात 'वारी नारीशक्ती'चा चित्ररथ

27 Jun 2019 16:21:41



राज्य महिला आयोगाचा कौतुकास्पद उपक्रम


पुणे : महिलांसाठीच्या महत्त्वपूर्ण कायद्याच्या जागृतीसोबतच शासनाच्या महिलांसाठीच्या योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी व शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने राज्य महिला आयोगाने सुरू केलेला 'वारी नारीशक्ती' चा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

 

राज्य महिला आयोगाच्या वतीने यावर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या पालखी सोहळ्यामध्ये 'वारी नारीशक्ती'ची या उपक्रमांतर्गत चित्ररथ आणि महिला सक्षमीकरणाची दिंडी काढण्यात आली आहे. शनिवारवाडा येथे या चित्ररथ व दिंडीच्या शुभारंभप्रसंगी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, संत साहित्याचे अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यावेळी उपस्थित होते.

 

महिलांच्या सक्षमीकरण व सबलीकरणाची ही वारी आहे. वारीमध्ये प्रत्येक महिलेला सन्मान मिळतो, वारी समानतेचे प्रतीक असल्यानेच 'वारी नारीशक्ती' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे रहाटकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महिलांसाठीच्या महत्वपूर्ण कायद्यांबाबत जागृती, त्यांच्यासाठी असलेल्या सरकारी योजनांची माहिती पोहोचविणे, हा उपक्रमामागचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले.

 

वारी नारीशक्तीची वैशिष्ट्ये

 

* दोन्ही मार्गांवरील चित्ररथांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सची व्हेडिंग मशिन्स आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी 'इनसिनेटर मशिन्स' असतील. नॅपकिन वापरांबाबत आणि पर्यायाने मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत जागृती करण्याचा हेतू आहे. यासाठी महिला व बाल कल्याण मंत्रालयाने भरीव सहकार्य केले आहे.

 

* फिरता चित्रपट महोत्सव- महिला सक्षमीकरणाचे संदेश देण्यासाठी वारीच्या दोन्ही मार्गांवर फिरता चित्रपट महोत्सव आयोजित केला जाणार आहे. मुक्कामाच्या प्रत्येक ठिकाणी महिला सक्षमीकरणाचे संदेश देणारे चित्रपट (उदा. 'दामिनी', 'पॅडमॅन', 'दंगल', 'टॉयलेट एक प्रेमकथा') आणि काही निवडक लघुपट दाखविले जातील.

 

* महिला कीर्तनकार, पोवाडाकार आणि भारूडकार यांचेही ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले आहेत. महिला सक्षमीकरण या संकल्पनेवर त्यांचे कार्यक्रम असतील.

 

* सक्षमीकरणाच्या दिंडीमध्ये दररोज एका क्षेत्रातील नामवंत असतील. त्यामध्ये मराठी चित्रपट कलाकार, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा, वीरमाता- वीरपत्नी, उद्योगिनी, डॉक्टर्स, क्रीडापटू, वकील, वास्तूरचनाकार, बचत गटही असतील. मुस्लिम महिलांचे पथकही या दिंडीमध्ये सहभागी होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0