विराट कोहलीने केला ‘हा’ पराक्रम

    दिनांक  27-Jun-2019


 


मँचेस्टर : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार कर्णधार विराट कोहली याने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. मँचेस्टरमध्ये चालू असलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या सामन्यामध्ये विराटने ३७ धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान २० हजार धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांनादेखील मागे टाकले. कोहलीने आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये ४१६ डावांमध्ये २० हजाराचा आकडा पार केला.

 

यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लाराच्या नावावर होता. त्यांनी दोघांनी प्रत्येकी ४५३ डावामध्ये २० हजार धावा केल्या आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत १३१ कसोटी डावांमध्ये ६६१३ धावा, २२३ एकदिवसीय डावांमध्ये ११०८७* धावा आणि टी-२०मध्ये ६२ डावांमध्ये २२९३ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन आणि लारा यांच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने ४६८ डावात २० हजार धावा केल्या आहेत. रविवारी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात विराटने ७७ धावांची खेळी केली होती. तेव्हा वनडेमध्ये सर्वाधिक वेगाने ११ हजार धावा करण्याचा विक्रम विराटने स्वत:च्या नावावर केला होता.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat