नीरव मोदीला दणका ! : २८३ कोटी रकमेची चार खाती गोठवली

27 Jun 2019 13:14:03



बर्न : पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदीला दणका देण्यात भारत सरकारला यश मिळाले आहे. तब्बल १३ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार करून पसार झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीला तपास यंत्रणेंच्या या मोठ्या कारवाईनंतर मोठा धक्का बसला आहे.

 

स्वित्झर्लंडमध्ये नीरव मोदी आणि त्याची बहिण पूर्वी मोदी यांच्याशी संबंधित चार बँक खाती गोठवण्यात आली असून या खात्यांमध्ये २८३.१६ कोटी रुपये जमा होते. संपूर्ण रक्कम गोठवण्यात आल्याची माहीती स्वीस बॅंकेने दिली आहे. स्विस बँकेने या प्रकरणी एक निवेदन जाहीर करत ही माहीती दिली आहे.

 

केंद्र सरकारने नीरव मोदीच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वीस बॅंकेकडे पाठपुरावा करण्यात आला होता. पीएनबी गैरव्यवहार प्रकरणात तपास यंत्रणा आलेले हे दुसरे मोठे यश मानले जात आहे. यापूर्वी आरोपी मेहूल चोक्सीचा प्रत्यार्पणाचा मोठा अडथळा दूर करण्यात तपास यंत्रणांना यश आले होते. चोक्सीचे नागरिकत्व रद्द करत असल्याचे अँटिगुआच्या पंतप्रधानांनी म्हटले होते.

 

प्रकरण काय ?

पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटींचा गैरव्यवहार करून नीरव मोदी भारताबाहेर पसार झाला. त्याने मामा मेहुल चोक्सीच्या साथीने हा गैरव्यवहार केला होता. याप्रकरणी सीबीआय व ईडीकडून चौकशी सुरू असून मोदी व चोक्सीची ४ हजार ७६५ कोटींची संपत्ती यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी मोदीची पत्नी अमी हिच्याविरुद्धही अजामीनपात्र अटक वॉरंट जारी आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0