हवामानबदलावर 'बर्थस्ट्राईक'

    दिनांक  27-Jun-2019   ब्रिटनमधील 'बर्थस्ट्राईक' नावाच्या गटाने असे ठरवले असून दुष्काळ, महापूर, अन्नधान्य टंचाई, युद्धजन्य परिस्थिती आणि हवामान बदलाची भीती वाटल्याने त्यांनी हे पाऊल उचलले.


हवामानातील बदलांवर गेल्या काही काळापासून प्रचंड चर्चा होताना दिसते. निसर्गचक्रातील मानवी हस्तक्षेपाचा पर्यावरणावर विपरित परिणाम होत असून त्यामुळे अनेक गंभीर समस्याही निर्माण होत आहेत. विकासाच्या, प्रगतीच्या आधुनिक कल्पनांमुळे माणूस पर्यावरणाचा, निसर्गाचा सर्वात मोठा शत्रू झाल्याचेही म्हटले जाते. सोबतच विकासाचे, प्रगतीचे समर्थक आणि विरोधक व दोन्हीत एखादा मध्यममार्ग काढता येईल का, असे म्हणणाऱ्या पर्यावरण-निसर्गप्रेमींसह संस्था आणि संघटनाही आजूबाजूला पाहायला मिळतात. इतकेच नव्हे तर हवामान बदलाचा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावरूनही कितीतरी वेळा उपस्थित केला जातो. देशोदेशींचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी यावर संमेलनांचे, परिषदांचे आयोजन करून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. परंतु, माणसाला अजूनही हवामान बदलाच्या मुद्द्यावर योग्य-अयोग्य काय हे ठरवता आलेले नाही, तसेच ठोस निर्णय घेऊन कार्यवाहीही करता आलेली नाही. अशा परिस्थितीत मानवाच्या भावी पिढ्यांचे काय होणार? आज एकविसाव्या शतकाची उणीपुरी १९-२० वर्षे सरत असताना आणखी १५-२०-३० वर्षांनी निसर्गाची, पर्यावरणाची अवस्था नेमकी काय असेल? ही धरती प्राणी-पक्ष्यांच्या तर सोडाच, माणसाच्या तरी जगण्यालायक राहिल का? असे सवालही कित्येकांना पडतात आणि त्यांची कोणतीही सकारात्मक उत्तरे सापडत नाहीत. म्हणूनच असे प्रश्न पडलेल्या काही पुरुषांनी आणि महिलांनी थेट आता बाळ जन्मालाच घालायचे नाही, असा निर्णय घेतला!

 

ब्रिटनमधील 'बर्थस्ट्राईक' नावाच्या गटाने असे ठरवले असून दुष्काळ, महापूर, अन्नधान्य टंचाई, युद्धजन्य परिस्थिती आणि हवामान बदलाची भीती वाटल्याने त्यांनी हे पाऊल उचलले. लंडनमध्ये राहणाऱ्या आणि पेशाने संगीतकार असलेल्या ३३ वर्षीय ब्लाइथे पेपिनो हिने २०१८ मध्ये या गटाची स्थापना केली. आतापर्यंत सुमारे ३३० लोकांनी या गटाचे सदस्यत्व स्वीकारले असून त्यात ८० टक्के महिला आहेत. आपल्या निर्णयाबद्दल पेपिनो म्हणते की, "मला बाळ हवे आहे. जीवनसाथीबरोबर राहताना माझेही कुटुंब पूर्ण व्हावे, असे मला वाटते. पण हे जग आता बाळासाठी राहण्यास योग्य नाही." मुळात पेपिनोने हा निर्णय कसा घेतला? नेमकी कोणती घटना याला कारणीभूत ठरली? तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदलविषयक समितीने पर्यावरण आणि निसर्गाच्या हानीबद्दल, त्याच्या परिणामांबद्दल इशारा दिला होता. आपल्याकडे हवामान बदलाला रोखण्यासाठी केवळ ११ वर्षांचा अवधी बाकी आहे, असेही संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात म्हटले होते. म्हणजेच ११ वर्षानंतर ही पृथ्वी उत्तम जीवन जगण्यालायक राहणार नाही, असे यावरून भासते व याचमुळे पेपिनो हिने बाळाला जन्म न देण्याचा निर्णय घेतला. सोबतच आपल्या या विचाराचा प्रसार आणि प्रचारही सुरू केला. परिणामी, हवामान बदल व त्याच्या परिणामांबद्दल जागरुक असणारे आणखीही लोक पेपिनोशी जोडले गेले. जे लोक तिच्याशी जोडले गेले, त्या सर्वांनीच मग तिच्यासारखाच निर्णय घेतला.

 

दरम्यान, लोकसंख्येवर नजर ठेवणाऱ्या ब्रिटनमधील एका संस्थेच्या मते, लोकसंख्या वाढेल तसतसे कार्बन उत्सर्जनही वाढेल आणि उष्णकटिबंधीय जंगले कमी कमी होत जातील. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार २०३० पर्यंत पृथ्वीवर ८.५ अब्ज तर २१०० पर्यंत ११ अब्ज माणसे असतील. जागतिक बँकेच्या मते, सध्या एक व्यक्ती एका वर्षात सरासरी पाच टन कार्बन-डायऑक्साईडचे उत्सर्जन करते, तर अमेरिकन व्यक्ती मात्र वर्षाला १५.६ मेट्रिक टन कार्बनचे उत्सर्जन करते आणि श्रीलंका-घाणा देशातील व्यक्ती एका टनापेक्षाही कमी कार्बनचे उत्सर्जन करते. यावरूनच 'कॉन्सिव्हेबल फ्यूचर'चे सहसंस्थापक मेगान कालमन यांनी सांगितले की, "जर जगातील प्रत्येक व्यक्तीने अमेरिकन व्यक्तीइतके कार्बन उत्सर्जन केले, तर सर्वांनाच राहण्यासाठी चार ते पाच पृथ्वींची आवश्यकता भासेल!" दुसरीकडे हवामान बदलाचा हिमनगांवरही परिणाम होत असून १९७५ ते २००० या २५ वर्षांत दरवर्षी सरासरी ४०० कोटी टन बर्फ वितळत असे तर नंतरच्या २००० ते २०१६ या १६ वर्षांतच हा आकडा दुप्पट म्हणजे ८०० कोटी टन इतका झाला, जे धोकादायक आहे. अशा एकूणच बिकट परिस्थितीमुळे ब्रिटनमधील ब्लाइथे पेपिनो हिने 'बर्थस्ट्राईक' नावाच्या गटाची स्थापना करत बाळ जन्माला न घालण्याचे ठरवले. आता हा निर्णय नेमका योग्य की अयोग्य हे सर्वसामान्यांनीच ठरवावे. पण, हवामान बदलावर नेमके उपाय योजले पाहिजे, हे नक्की!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat