सामान्यांना कोट्यधीश बनविणारे सतीश आयरे

    दिनांक  27-Jun-2019   किमान ५०० लोकांना कोट्यधीश बनविण्याचा सतीश आयरे यांचा मानस आहे. त्यासाठी ते विविध कार्यशाळा घेतात. 'विस्डम टॉक' या उद्योजकीय कार्यक्रमातदेखील आर्थिक नियोजनासंदर्भात माहिती देणारे उद्योजकीय सादरीकरण ते सादर करणार आहेत. आपल्या सहकार्याने निर्माण झालेले ५०० करोडपती लोक आपल्या मुलाच्या लग्नाला उपस्थित असावेत, अशी त्यांची इच्छा आहे.


"सर, मै बहुत सारे स्कूल के प्रिन्सिपल से मिला. पर इतने जल्दी किसीने हमारा प्रस्ताव स्वीकार नही किया. आपने तुरंत मंजुरी दी?" एका इंग्रजी भाषा शिकविणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचा विपणन अधिकारी असणाऱ्या सतीशने डॉ. जामखानवाला यांना प्रश्न विचारला. "जी सतीशजी, क्योंकी मै चाहता हूँ, हमारे स्कूल का बच्चा, भले वो झोपडपट्टी में रहनेवाला हो पर उसे अच्छी अंग्रेजी आनी चाहिये," डॉ. जामखानवाला सतीशला म्हणाले. डॉ. इशाक जामखानवाला म्हणजे मोठे शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ता. महाराष्ट्र राज्याचे ते राज्यमंत्री होते. 'अंजुमन-ई-इस्लाम' या शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष होते. सतीशने त्यांच्या काही विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवून त्यांच्याकडून इंग्रजी भाषेमधून नाटक बसविले. जेव्हा डॉ. जामखानवालांनी ते नाटक पाहिले, त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. त्यांनी अगदी कृतज्ञतेने सतीशकडे पाहिले आणि पाठीवर शाबासकीची थाप दिली. ही शाबासकीची थाप सतीशसाठी कोणत्याही बक्षिसाहून लाखमोलाची होती. ती नोकरी सोडून सतीश आर्थिक नियोजनकार झाला आणि 'ग्राहकराजा सुखी भव:' हे जणू त्याच्या आयुष्याचं ब्रीदवाक्यच झालं. १६ वर्षांत तब्बल १८०० ग्राहकांना त्यांनी समाधान मिळवून दिलंच; पण त्यातील १८ करोडपती झाले, तर काहीजणांची कोट्यधीश होण्याकडे वाटचाल आहे. हे सतीश म्हणजे सर्वसामान्य माणसांना आर्थिक नियोजनाद्वारे कोट्यधीश बनविणाऱ्या 'मनीग्राफ' संस्थेचे संचालक सतीश आयरे.

 

रत्नागिरी जिल्हा, तालुका लांजा येथील रिंगणे हे एक खेडेगाव. या खेडेगावातील अनाजी यशवंत आयरे हा किशोरवयीन मुलगा वयाच्या १५व्या वर्षी पोटापाण्यासाठी मुंबईला आला. नातेवाईकांकडे राहिला. 'सीमेन्स एम्प्लॉयमेन्ट' या ब्रिटिशांच्या अंमलाखाली असणाऱ्या कंपनीत काम करू लागला. पुढे त्याचा सुमित्रा नावाच्या सालस मुलीसोबत विवाह झाला. ३ मुली आणि २ मुले असं नंदनवन या दाम्पत्याच्या गोकुळात फुललं. या गोकुळातील सतीश म्हणजे शेंडेफळ. मालाडच्या मंगेश विद्यामंदिरात त्याचं शालेय शिक्षण झालं, तर बारावीपर्यंत तो कुलदीपसिंग दिवाण महाविद्यालयात शिकला. पुढे 'कमवा आणि शिका' या तत्त्वावर आपण शिकायचं, असं त्याने निश्चित केलं. महाविद्यालयीन शिक्षण दूरशिक्षण पद्धतीने करायचं ठरवलं. एका मासिकामध्ये तो ऑफिसबॉय म्हणून कामास लागला. एकदा बॉसने त्याला काही कागदपत्रे सीएसटीच्या कार्यालयात देण्यासाठी पाठविले. सोबत गाडीखर्चासाठी ५० रुपये दिले. मात्र, सतीश पत्ता विचारत सगळ्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे कागदपत्रे देऊन आला. त्याने बॉसने दिलेले ५० रुपये परत केले. सतीशच्या या प्रामाणिकपणावर खुश होऊन बॉसने त्याला बढती दिली. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यामुळे बॉसने त्याला इलेक्ट्रॉनिक टाईपरायटर शिकण्यास सांगितले. सतीश आता इलेक्ट्रॉनिक टाईपरायटरवर काम करू लागला. जाहिरातीसुद्धा आणू लागला. याच दरम्यान सतीशने जाहिरात आणि जनसंपर्क विषयाची पदविका मिळवली. या पदविकेसाठी जेव्हा सतीश प्रवेश घ्यायला गेला, त्यावेळेस त्याची फी १२ हजार रुपये होती. एवढे पैसे नसल्याने पुढच्या वर्षी त्याने प्रवेश घ्यायचे ठरवले. एका वर्षानंतर पुन्हा तो प्रवेश घ्यायला गेला, त्यावेळेस १६ हजार रुपये एवढी फी होती. एका वर्षांत चार हजार रुपयांनी फी वाढली होती. महागाई दर काय असतो, हे सतीशने त्यावेळेस अनुभवले.

 

कालांतराने त्या मासिकाचा राजीनामा दिल्यानंतर अन्य एका प्रकाशन संस्थेत सतीश नोकरीस लागला. त्या संस्थेत निव्वळ आठ महिन्यात सर्व बढत्या त्याने मिळवल्यानंतर ती नोकरी पण सोडली. याचवेळी अस्खलित इंग्रजी बोलायला शिकवणाऱ्या एका संस्थेत तो रुजू झाला. लेखाच्या सुरुवातीची घटना याचदरम्यान घडली. अनेक कॉर्पोरेट संस्था, शैक्षणिक संस्था, सरकारी संस्था यांनी सतीशच्या विपणन कौशल्यामुळे इंग्रजी भाषेची सेवा घेतली होती. दरम्यान सतीशच्या सासऱ्यांचं निधन झालं. त्यांच्या अंत्ययात्रेला पुष्कळ लोक जमले होते. हारांचा तर ढीग पडला होता. लग्न होऊन काहीच महिने झाल्याने सासऱ्यांची सर्वसामान्यांमध्ये असलेली लोकप्रियता त्याला माहीत नव्हती. सतीशचे सासरे एकनाथ बाळकृष्ण खामकर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नावाजलेले कबड्डीपटू होते. कबड्डी निवड समितीचे ते सदस्य होते. तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्कार त्यांना मिळाला होता. एवढी लोकसमूहाची श्रीमंती असूनसुद्धा ते आर्थिकदृष्ट्या कमजोर राहिले. त्यांच्या अकाली जाण्याने घरच्यांचा मोठा आर्थिक आधार गेला होता. नेमकी हीच घटना सतीश आयरेंच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. निव्वळ आर्थिक नियोजन न केल्याने त्यांच्या कुटुंबीयांची होणारी ससेहोलपट ते 'याचि देही याची डोळा' अनुभवत होते. थोड्याफार फरकाने सगळ्यांचीच परिस्थिती सारखी आहे. तेव्हा यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, आर्थिक नियोजन, हे त्यांनी ताडले. आधी आयुर्विमा आणि नंतर म्युच्युअल फंड असं करत आयरे आर्थिक नियोजन क्षेत्रात उतरले. गेल्या १६ वर्षांत त्यांनी तब्बल १८०० हून अधिक ग्राहकांना सेवा दिली आहे. आतापर्यंत १८ जणांना त्यांनी करोडपती बनण्यास सहकार्य केले आहे. अनेक वकील, डॉक्टर्स, सनदी लेखापाल, शिक्षक, निवृत्त अधिकारी त्यांचे ग्राहक आहेत.

 

त्यांच्या विभागात एक वडापाव विक्रेता होता. त्याने तयार केलेली कांदाभजी खाण्यास दूरवरून लोक येत असत. हा वडापाववाला एका पतपेढीत दररोज ५०० रुपये जमा करत असे. त्याच्यातून त्याला तुटपुंजे व्याज मिळे एवढंच. सतीश आयरेंनी त्यास नियोजनबद्ध गुंतवणूक योजना अर्थात 'एसआयपी' अंतर्गत पैसे गुंतविण्यास सांगितले. सुरुवातीला त्या वडापाववाल्याने दरमहा १५ हजार रुपयांनी सुरुवात केली. त्या जोरावर त्याने २ दुकाने आणि एक फ्लॅट घेतला. आता तो दरमहा ६५ हजार रुपये गुंतवतो. आयरेंनी वडापाववाल्याला वयाच्या साठीपर्यंत आठ स्थावर मालमत्ता निर्माण तयार होईल, असे आश्वस्त केले आहे. त्यातील तीन मालमत्ता त्याने विकत घेतल्या आहेत. या आठ मालमत्तेची भविष्यातील बाजारभावानुसार किंमत प्रति मालमत्ता अगदी तीन कोटी रुपये जरी पकडली तरी २४ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा वडापाववाला काही वर्षांतच मालक असेल. अशाच प्रकारे किमान ५०० लोकांना कोट्यधीश बनविण्याचा सतीश आयरे यांचा मानस आहे. त्यासाठी ते विविध कार्यशाळा घेतात. 'विस्डम टॉक' या उद्योजकीय कार्यक्रमातदेखील आर्थिक नियोजनासंदर्भात माहिती देणारे उद्योजकीय सादरीकरण ते सादर करणार आहेत. आपल्या सहकार्याने निर्माण झालेले ५०० करोडपती लोक आपल्या मुलाच्या लग्नाला उपस्थित असावेत, अशी त्यांची इच्छा आहे. त्यांची ही इच्छा निश्चितच फलद्रूप होवो, या शुभेच्छा!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat