
अलीगड : रस्त्यावर फास्टफूड विकणाऱ्या व्यापाऱ्यांचे वर्षाला उत्पन्न किती असेल याचा अंदाज तुम्ही सहज बांधू शकाल मात्र, उत्तर प्रदेशातील अशाच एका व्यापाऱ्याने आयकर विभागातील अधिकाऱ्यांनाही चक्रावून सोडले आहे. अलीगडमध्ये एका सिनेमागृहाजवळ कचोरीचा स्टॉल लावणाऱ्या मुकेशची कमाई वर्षाला ७० लाख ते कोटीच्या घरात आहे. त्याच्याविरोधात तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
कचोरी विकणाऱ्या एका सामन्य व्यापाऱ्याला आयकर विभागाकडून आलेली नोटीस बजावण्यात आल्याचे वृत्त ऐकताच काहींनी आयकर विभागाकडून चूक झाली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, प्रकरणाची शहानिशा केल्यावर मुकेशची वार्षिक कमाई ऐकून अनेकांना धक्काच बसला. अलीगड येथील सिनेमागृहाबाहेर मुकेश कचोरी नावाचा एक स्टॉल लागतो. अनेकजण तेथे कचोरी घेण्यासाठी रांगा लावतात.
आयकर विभागाने मुकेशला नोटीस बजावली. वर्षाला ७० ते १ कोटींची कमाई होऊनही त्याने दुकानाची अधिकृत नोंदणी केलेली नाही, अथवा जीएसटी क्रमांक नोंदणीही केलेली नाही. मात्र, या प्रकारावर मुकेशचे उत्तर तर त्याहूनही धक्कादायक आहे. 'मी केवळ कचोरी विकून माझे पोट भरतो. गेली १२ वर्षे माझा हा व्यवसाय सुरू आहे. मात्र, कुणीही मला अशाप्रकारे रोखलेले नाही. किंवा अधिकृत नोंदणी करण्यासाठी सांगितले नाही.'
जीएसटी नियमावलीनुसार, ४० लाखांहून जास्त कमाई करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाला जीएसटी बंधनकारक आहे. खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना पाच टक्क्यांची सुट दिली जाते. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार, मुकेशने त्याच्या कमाईच्या आकड्यांबद्दल कबुली दिली आहे. तेल आणि गॅस व इतर खर्चांची माहीतीही त्याने दिली आहे. या प्रकरणी आता पुढे काय कारवाई होईल याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat