सोन्याचे भाव वाढतच राहणार !

    दिनांक  26-Jun-2019


 


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चढत जाणाऱ्या सोन्याला आणखी काही दिवस असाच भाव राहणार असल्याची शक्यता गुंतवणूक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या लग्नसराईच्या दिवसांत सामान्यांना सोन्याचा दर तूर्त दिलासादायक नसल्याचे चित्र आहे. मे महिन्यातील सोन्याचा भाव १० टक्के वाढीसह गेल्या सहा वर्षातील उच्चांक ठरला आहे. महिन्याभरात प्रतिदहा ग्रॅमला २ हजार २७० रुपयांची वाढ झाली आहे.

 

गुंतवणूक सल्लागारांच्या मते, 'अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक फेडरल रिझर्व्हतर्फे व्याजदरात कपात करण्यात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी सोन्याला पसंती दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १ हजार ४३९ डॉलर इतका आहे. यंदाच्या वर्षात अमेरिकेतर्फे किमान दोन ते तीनवेळा व्याजदर कपात केली जाऊ शकते. त्यामुळे येत्या काही महिन्यांत सोन्याचा दर हा वाढतच राहणार आहे.'

 

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे अवमुल्यन, व्यापार युद्ध, कच्च्या तेलाचे वाढलेले भाव यामुळे बाजारपेठेत अस्थिरता दिसत आहे. व्यापार युद्धामुळे गुंतवणूकदारांनी डॉलरमधील गुंतवणूक कमी करत सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरूवात केली आहे. याचा परिणाम थेट सोन्याच्या भावावर झाल्याने ही भाववाढ झाली आहे. येत्या काळात ही परिस्थिती निवळण्याची चिन्हे नाहीत, त्यामुळे सोन्याचा दर हा चढाच राहणार असल्याचे मत गुंतवणूकदार सल्लागारांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat