असावी संशोधनमूलक शिक्षणपद्धती

    दिनांक  26-Jun-2019   भारतीय संशोधकांनी फार पूर्वी अनेकविध आविष्कार करत जगाला विज्ञान क्षेत्रातील चमत्कारांची ओळख करून दिली. त्यानंतर २१ व्या शतकातदेखील भारतीयांच्या मेंदूने महासत्तेच्या परिघात आपला बौद्धिक अविष्कार दाखविला, याची अनेकविध उदाहरणे आपल्याला माहीत आहेतच. मात्र, तरीही भारतात संशोधन आणि विकास यांना पुरेशी चालना दिली जात नाही, अशी ओरड आपण कायमच ऐकत असतो आणि ते काही अंशी खरेदेखील आहे. ज्या भारतीयांनी संशोधन क्षेत्राची कास धरत संशोधन केले आहे, त्यातील बव्हंशी भारतीयांनी परदेशात जाऊन आपले संशोधन कार्य केले आहे. नुकतेच, वय वर्ष २०च्या आत २४ संशोधन प्रकल्पांवर ज्यांनी काम केले आहे, तसेच, ज्यांच्या नावावर ८ पेटंट आहेत आणि जे २ कंपन्यांचे सहसंस्थापक आहेत, असे यशराज व युवराज भारद्वाज या भावंडांनी नागपूर येथे एका माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना, मानवी जीवनात १८ ते २५ हा उमेदीचा काळ असून त्या काळात संशोधनकामी वाटचाल होणे आवश्यक आहे व त्यासाठी भारतीय शिक्षणपद्धतीत बदल होणे आवश्यक असल्याचे मत मांडले. त्यांच्या मते, भारतात पीएचडी करणाऱ्याचे वय सरासरी ३२ वर्ष आहे आणि या काळात कौटुंबिक जबाबदाऱ्या असल्याने संशोधक जबाबदारी सांभाळण्यास जास्त महत्त्व देतात. या सर्व बाबी लक्षात घेतल्या तर सहज लक्षात येते की, हे सर्व आपण पूर्णत: नाकारू शकत नाहीच. भारतीय शिक्षण पद्धतीचे मॉडेल हे मेकॉलेच्या मॉडेलवर आधारित आहे आणि ते योग्य आहे, हेच आपण मानले आहे. अभ्यासक्रम वगळता काही मोठे बदल आपण आपल्या शिक्षणपद्धतीत स्वातंत्र्यप्राप्तीनंतर केल्याचे दिसून येत नाही. राजकीय दरबारी शिक्षण खात्यास जरी कॅबिनेट दर्जा असला तरी, या खात्याचा क्रमांक हा वरचा नाही. देशाची सुसंस्कृत पिढी आणि विचारक्षम पिढी ज्या क्षेत्रातून पुढे येऊ शकते आणि अशी पिढी पुढे आल्याने देशाचे सार्वभौमत्व अबाधित राहू शकते, त्याच शिक्षणव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे देशात संशोधन होण्यासाठी खरोखरच काही बदल आपल्या शिक्षणपद्धतीत करणे, हीच खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे.

 

समाजमाध्यमांवर विश्वास नाहीच!

 

आजच्या आधुनिक काळात समाजमाध्यमे किती उपयुक्त आहेत किंवा नाहीत, यावर कायमच चर्चा होत असते. मात्र, आता पुन्हा या विषयाची चर्चा होण्याचे कारण म्हणजे नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी मी स्वतःच सोशल मीडिया पीडित असल्याचे केलेले विधान! विश्वास नांगरे-पाटील हे पोलीस खात्यातील नाव माहीत नाही, अशी व्यक्ती विशेषत: तरुण वर्गात सापडणे तसे दुर्मीळच. विश्वास नांगरे-पाटील हे आपल्या पोलीस सेवेतील कारकिर्दीबरोबरच त्यांनी भारतीय पोलीस सेवेत दाखल होण्यासाठी केलेल्या कष्टांसाठीदेखील ओळखले जातात. त्यांची प्रेरणादायी भाषणे, विचार, त्यांचे व्यक्तिमत्त्व हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आदर्शवत असतात. त्यामुळे साहजिकच त्यांचे छायाचित्र असणारे सुविचार, लेख, काव्यपंक्ती, खबरदारीचे उपाय अशा नानाविध स्वरूपाच्या संदेशांनी अनेकांचे फेसबुक भरून पडलेले असते. मात्र, नाशिकमध्ये त्यांना पत्रकरांनी या सर्व संदेशाबाबत विचारले असता, “माझे कोणतेही फेसबुक पेज नसून मी स्वतः सोशल मीडिया पीडित आहे,” असे नांगरे-पाटील म्हणाले. तसेच, सायबर पोलिसांना सांगून मी माझ्या नावे असणारे १९ बनावट फेसबुक पेज, सात युट्यूब व अनेक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज काढून टाकायला लावल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले. यावरून समाजमाध्यमे ही खरंच आवश्यक आहेत का, हा प्रश्न समोर येणे आवश्यक आहे. 'माहितीचा खजिना' वगैरे असे वर्णन करून समाजमाध्यमांची महती वाढविली जाते. मात्र, त्यातून प्राप्त होणारी माहिती ही किती सत्य, किती असत्य हे जाणून घेणे आवश्यक असताना तसे फारसे होत नाहीच. तसेच, या समाजमाध्यमांवर 'फॉरवर्ड' नावाचा एक नवीन समूह आला आहे तो वेगळाच. यामुळे अफवा किंवा अवास्तव चित्र उभे केले जाते. मात्र, असे असले तरी या समाजमाध्यमांची उपयुक्तताही आपत्ती काळात सिद्ध झाली आहे. त्यामुळे तरुणांनी आपले आयडॉल समाजमाध्यमांचे पीडित आहेत, हे लक्षात ठेवत यापुढे विश्वास नांगरे -पाटील यांच्या नावे येणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेऊ नये आणि समाजमाध्यमांचा वापर हा समाजहिताय आणि स्नेहभाव वृद्धीसाठी केल्यास समाजमाध्यमांवरील विश्वास दृढ होण्यास नक्कीच मदत होईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat