शतवर्षाचे चांदणे...

    दिनांक  26-Jun-2019जेव्हा आत्मा, मन आणि शरीर हे शुचिर्भूत होतील, तेव्हा सर्व प्रकारच्या वाईट वासना, दोष, दुर्गुण, नानाविध क्लेश आणि सर्व प्रकारची विघ्ने आपोआपच नाहीशी होतील. कारण, आतून आत्मबलिष्ट झालेला मानव बाह्य संकटांना कदापी घाबरत नाही. जगातील सर्व प्रकारची दु:खं, दारिद्य्र हे अशा वेदमार्गी सर्वांगी पवित्र झालेल्या सर्वदोषपरित्यागी माणसास कदापी विचलित करू शकत नाही. म्हणूनच तो वेदप्रणित १०० वर्षांचे आयुष्य जगू शकतो.


 

वैश्वदेवीं वर्चस आ रभध्वंशुद्धा भवन्त: शुचय: पावका:।

अतिक्रामन्तो दुरिता पदानि शतं हिमा: सर्ववीरा मदेम॥

(अथर्ववेद-१२.२.२८)

 

अन्वयार्थ

 

(वर्चसे) ब्रह्मतेजाच्या प्राप्तीकरिता (वैश्वदेवीम्) सर्व जगाचे कल्याण करणाऱ्या, ईश्वरप्रदत्त वेदवाणीला (आ रभध्वम्) प्रारंभ करा, तिच्या स्वाध्यायाने (शुद्धा:) शुद्ध, मलरहित(शुचय:) मनसा, कर्मणा, वाचा पवित्र आणि (पावक:) अग्नीप्रमाणे तेजस्वी (भवन्त) होत (दुरितानि पदानि) वाईट चालीरीती, वाईट आचरण आणि दुर्व्यवहारांना(अतिक्रामन्त:) पार करीत, दूर सारत(सर्ववीरा:) सामर्थ्यशाली प्राणांनी परिपूर्ण होऊन, सर्वजण शक्तिशाली बनत आपण (शतम् हिमा:) शंभर शरद: (शीत) ऋतू, वर्ष(मदेम) हर्ष आणि आनंदाने जीवन जगू या!

 

विवेचन

 

सुख व आनंदाची अभिलाषा अगदी लहान-लहान जीवजंतूंपासून ते मोठ-मोठाल्या प्राण्यांपर्यंत सर्वांनाच असते. त्यातल्या त्यात माणसांबाबत विचार करूया. जगातील प्रत्येक मानव मग तो गरीब असो किंवा श्रीमंत, एतद्देशीय असोत की विदेशी! कोणीही दु:खात राहू इच्छीत नाही. आनंदाचे जीणे सर्वांनाच आवडते. म्हणूनच तो रात्रंदिवस या ना त्या मार्गाने धन मिळविण्याकरिता धडपडत आहे. पण, त्याची ही धावपळ शरीर व इंद्रियजन्य भौतिक सुखापर्यंतच मर्यादित आहे. मानसिक सुख व आत्मिक आनंद मात्र त्याला मिळू शकत नाही. याचकरिता उपनिषदात मैत्रेयी म्हणते, 'न वित्तेन तर्पणीयो मनुष्य:।' माणूस केवळ धनाने कधीच तृप्त होऊ शकत नाही. त्याकरिता आवश्यकता असते ती 'ईश्वरीय शाश्वत ज्ञानप्राप्ती'ची.

 

वरील मंत्रात 'जीवेम् शरद: शतम्।' या वेदाज्ञेनुसार शतायुष्य मिळविण्याचा मौलिक मार्ग सांगितला आहे. मंत्राचा अंतिम अंश सिद्ध करण्याकरिता प्रारंभीचे तीन अंश आधारभूत घटक आहेत. ज्याला शंभर वर्ष जगावयाचे आहे, त्यांनी परमेश्वराचे सान्निध्य मिळवावे. भगवंतांकडे ओज, तेज, शक्ती, सामर्थ्य मोठ्या प्रमाणावर आहे. यालाच 'ब्रह्मवर्चस्' म्हटले जाते. ब्रह्माचे हे 'वर्चस्' (तेज) सहजपणे मिळू शकत नाही. त्याकरिता सर्व जगाचे कल्याण करू शकणाऱ्या वेदवाणीचा आश्रय घ्यावा लागेल. म्हणजेच वैदिक ज्ञानाचा आधार मिळवावा लागेल. वेदमाऊली आपल्या बाळांचे करू इच्छिते. तिच्या नजरेत सारे ब्रह्मांड व त्यात वसणारे सर्व चेतन व जड समूह आहे. ती सर्वांना जगण्याचा उपाय शिकविते. बुद्धितत्त्वाला चालना व दिशा देऊन मानवमात्राचे सर्वकल्याण साधणारी ज्ञानसरिता आहे. तिच्या या ज्ञानप्रवाहात न्हाऊन निघावे. स्वाध्यायाच्या बळाने जीवन पुनीत करावे. वेदमंत्रांचा यथार्थ भाव जाणून घ्यावा व तो आचरावा.

 

आपल्या आनंदमय जीवनाची सुरुवात विश्वाचे कल्याण करू इच्छविणाऱ्या वैदिक ज्ञानाने (स्वाध्यायाने) करावयास हवी. आपण एखाद्या मांगलिक उत्सव, कार्यक्रम किंवा कौटुंबिक कार्याची सुरुवात जशी वेदमंत्रोद्घोष, श्लोक गायन, यज्ञयाग किंवा परंपरागत पूजापाठाने करतो, तशीच आपल्या दैनंदिन जीवनाची सुरुवातदेखील वेद वाचनाने करावी. म्हणजेच वेद, उपनिषद दर्शन व इतर आर्षग्रंथांचे वाचन करावे. किमान भावार्थ तरी वाचावाच! कारण, 'स्वाध्याया'मुळे जगण्याला बळ मिळते. सद्ग्रंथांचा सहवास व त्यांचे अर्थपूर्ण व भावपूर्ण असे मननयुक्त वाचन हे फारच लाभकारी ठरते. पवित्र ज्ञानग्रंथांच्या वाचनाने दोन गोष्टी घडतात - एक तर माणसाच्या जीवनामध्ये शुद्धता व पवित्रता वाढीला लागते आणि वाईट (दुर्गुण व दोष) बाबी नाहीशा होऊ लागतात. मंत्रात म्हटले आहे -

 

'शुद्धा: शुचय: पावका: भवन्त:।'

 

हे मानवांनो (वेदस्वाध्यायाने) तुम्ही अंतर्बाह्य शुद्ध, मन-वाणी, कर्माने शुचिर्भूत आणि आत्म्याने अग्नीसमान तेजोमय (प्रकाशमान) व्हा! असे हे सर्वांगीण पावित्र्य माणसाला शांत, समाधानी व आनंदी करते. भौतिक धन मिळवून कमावलेल्या बाह्य भोगवस्तूमुळे मानव शाश्वत सुखी होऊ शकत नाही, तर वेदादी शास्त्रांच्या अध्ययनाने शुद्ध, पवित्र आणि ज्ञानाने तेजस्वी बनलो, तरच आनंदाचा मोठ्या प्रमाणात लाभ होतो. जेव्हा आत्मा, मन आणि शरीर हे शुचिर्भूत होतील, तेव्हा सर्व प्रकारच्या वाईट वासना, दोष, दुर्गुण, नानाविध क्लेश आणि सर्व प्रकारची विघ्ने आपोआपच नाहीशी होतील. कारण, आतून आत्मबलिष्ट झालेला मानव बाह्य संकटांना कदापी घाबरत नाही. जगातील सर्व प्रकारची दु:खं, दारिद्य्र हे अशा वेदमार्गी सर्वांगी पवित्र झालेल्या सर्वदोषपरित्यागी माणसास कदापी विचलित करू शकत नाही. म्हणूनच तो वेदप्रणित १०० वर्षांचे आयुष्य जगू शकतो. त्याचे हे शतायुष्याचे जगणे शरद ऋतूप्रमाणे हर्षयुक्त, आनंदी व उत्साही बनते. याचकरिता मंत्रात "शतं हिमा: मदेम्।" असे म्हटले आहे.

 

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat