विवेकाचा पुरस्कार

    दिनांक  26-Jun-2019समर्थांनी ही विवेकाची शिकवण दासबोधात ठिकठिकाणी सांगितली आहे. स्वामींची कार्यपद्धती म्हणजे सर्वांना शहाणे करून सोडावे अशी आहे. समर्थांनी विवेकाची महती वारंवार सांगितली आहे. तितकी इतर संतवाङ्मयात सांगितलेली दिसून येत नाही. विवेकाचा पुरस्कार केल्याने आदर्श मूल्ये, कला, विद्या तसेच शास्त्र उदय पावतात. विवेक बाळगल्याने कल्याणकारी, आनंदमय आणि ज्ञानमय ध्येये तयार होतात. त्याच प्रकारची मूल्ये समाजाचे कल्याण करतात.


ब्रह्मज्ञानाबरोबर प्रापंचिक व सामाजिक जाणिवेचे ज्ञानही समर्थ रामदास स्वामी स्पष्ट करीत असतात. समर्थांना असे वाटते की, समाजातील ज्ञानी पुरुषाने आपल्या भोवतालची मानवता विवेकसंपन्न केली पाहिजे. हा सारा विश्वाचा पसारा पंचमहाभूतांनी विणलेला आहे. याची आपणास प्रचिती येते. या महाभूतांच्या वेगवेगळ्या सन्मिलिनीकरणामुळे अनेक दृश्यपदार्थ आकार घेत असतात. सजीवांचा विचार करता या साऱ्यात अंतरात्मा अनुस्युत असतो. समर्थांनी असे म्हटले आहे की, फुलांच्या हारात जसा एकच दोरा सर्व फुले ओवून घेतो, तसा हा अंतरात्मा सर्वत्र पसरलेला असतो. तथापि या अंतरात्म्याची जाणीव सर्व प्राण्यांच्या ठिकाणी सारखी नसते. ज्यांच्या ठिकाणी या अंतरात्म्याची जाणीव मोठ्या प्रमाणात प्रगट झालेली दिसून येते, त्या पुरुषांच्या ठिकाणी ‘कर्तृत्व’ मोठे असते. त्यामुळे आपण त्यांना ‘अवतारी पुरुष’ म्हणून संबोधतो. अंतरात्म्याच्या कमी-अधिक जाणिवेचा विवेक ओळखून माणसाने समाजात वावरावे, असे स्वामींना वाटते. अशा या श्रेष्ठ अंतरात्म्याच्या जाणिवेचे विवरण दासबोधाच्या दशक १५, समास ३ मध्ये येते. त्या समासातून स्वामींनी जो व्यावहारिक, प्रापंचिक उपदेश केला आहे, तो सर्वांना उपयोगी आहे. हा अंतरात्मा ज्या प्रमाणात मानवी जीवनात प्रगट होतो, त्यावर माणसाची योग्यता ठरते. ही जाणीव मोठ्या प्रमाणात असते असा माणूस व्याप वाढवतो, अनेक प्रकारे कष्ट करतो आणि पाहता पाहता भाग्यवान बनतो.

 

व्याप आटोप करिती ।

धके चपेटे सोसिती ।

तेणे प्राणी सदेव होती ।

देखतदेखता ॥ (दा. १५.३.७)

 

ही माणसे ‘भाग्यवान’ ठरतात. त्यांना ‘मोठेपण’ प्राप्त होते. ‘समाजातील मोठेपण’ हे साधारणपणे वयावर अवलंबून असते. जो वयाने ‘वडील’ त्याला ‘मोठा’ म्हटले जाते. पण, स्वामींच्या मते, मोठेपण हे वयावर अवलंबून नसून ते गुणांवर व बुद्धीवर अवलंबून असले पाहिजे. मोठेपणाची ओळख ही विवेकशक्तीवर आधारित असते. ज्याच्या ठिकाणी विवेकशक्ती खऱ्या अर्थाने काम करते, ती माणसे ‘बुद्धिमान’ म्हणून ओळखली जातात.

 

थोर लहान बुद्धिपासी ।

सकट कळेना लोकांसी ।

आभी उपजले तयासी । थोर म्हणती ॥

(दा. १५.३.९)

 

पण ‘मोठेपण’ हे केवळ वयावर अवलंबून असत नाही. हे आपण रोजच्या व्यवहारात पाहतो. राजा वयाने लहान असला तरी, वृद्धसुद्धा त्याला नमस्कार करतात. हा विवेक माणसाला नीट समजला पाहिजे.

 

वयें धाकुटा नृपती ।

वृद्ध तयास नमस्कार करिती ।

विचित्र विवेकाची गती ।

कळली पाहिजे ॥

 

सामान्य माणसांचे ज्ञान हे रुढीतून लोकपरंपरेतून आलेले असते. लोक काय बोलतात तेच त्यांनी ग्राह्य मानलेले असते. ते विचार सामान्य माणसे सोडायला तयार नसतात. स्वामी म्हणतात, अशा लोकांना कसे समजावयाचे. त्यांना किती म्हणून सांगायचे हाच मोठा प्रश्न आहे. मोठेपण ज्ञानावर, बुद्धीवर आधारित आहे. हे त्यांना पटत नाही. मग एखाद्या लहान वयाच्या बुद्धिमान माणसाची प्रगती पाहून हे लोक त्याची हेटाळणी करतात. म्हणून शहाण्या साधकाने हे नेहमी लक्षात ठेवावे की, आपल्याशी सलगी असणाऱ्या अशा माणसांना आपण दूर ठेवले पाहिजे. विवेकी माणसाची प्रगती त्यांना पाहावत नाही. अशा रितीने वयाने लहान असणाऱ्या शहाण्या माणसाने काही सांगितले, तर सर्वसाधारण वडील माणसांची प्रतिक्रिया अशी असते की, ‘आजकाल वडिलांचे वडीलपण राहिले नाही आणि लहानांनी आपले लहानपण सोडून दिले आहे. त्यामुळे लहान असूनही आम्हाला सांगण्याचे हा धाडस करतो.’ परंतु, सर्वसाधारण वडील माणसांची ही प्रतिक्रिया स्वामींना मान्य नाही. सर्व ठिकाणी विवेक बाळगला, तर नुसत्या वयाने वडीलपण मिरवणाऱ्यांना ‘वडील’ शब्दाचा अर्थच कळलेला नाही, असे म्हणावे लागेल. नीट विचार करता वडीलपण हे गुणावर, बुद्धीवर ठरवले पाहिजे. म्हणून स्वामी स्पष्टपणे सांगतात की, ‘गुणेवीण वडीलपण । हें तो अवघेंच अप्रमाण ।’ परंतु, यातही ‘विवेक’ पाहावा लागतो. आपल्यापेक्षा वयाने वडील असणाऱ्यांचा अनुभव जास्त असल्याने त्याला नमन करणे, ही आपली संस्कृती आहे. स्वामी पुढे सांगतात की,

 

तथापि वडिलांस मानावें । वडिले वडिलपण जाणावें ॥

नेणता पुढे कष्टावें । थोरपणी ॥ (१८)

 

यासाठी वयाने वडील असलेल्या माणसांनी आपले ‘वडीलपण’ खरे नाही हे ओळखून असावे व तसे वागावे आणि जर ते तसे करणार नाहीत, तर वृद्धपणी त्यांना त्रास सहन करावा लागेल. यासाठी लहानांनी आपल्याला दिलेला वडीलकीचा मान हा खरा नाही, असा विवेक बाळगून शहाणपणाने वागावे. ज्यांच्या ठिकाणी विवेकाचे हे शहाणपण नाही, ज्यांच्या ठिकाणी वयाचा ताठा आहे, त्यांची बायकापोरेही वृद्धपणी त्यांना किंमत देत नाही. असा मनुष्य मग अडगळीत जाऊन पडतो आणि त्याच्या अंगी ‘मूर्खपण’ येते. म्हणून असे करू नये. ‘शहाणपणा’ने आपले जीवन सार्थकी लावावे. हे जर कळत नसेल, तर त्यासाठी ग्रंथांचा अभ्यास करून त्यातून हे ‘शहाणपण’ शिकता येते. मात्र, हे लक्षात ठेवावे की, शहाणपण शिकण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. ‘शहाणपणा’सारखी उत्तम गोष्ट नाही. (शहाणपण शिकणे । हे उत्तमोत्तम) ‘शहाणा’ खूप लोकांना मान्य असतो. ही ‘शहाण्या’ला ओळखण्याची खूण आहे. अशाला जगात काही कमी पडत नाही.

 

जो बहुतांस मानला । तो जाणावा शाहाणा जाला ।

जनीं शाहाण्या मनुष्याला । काय उणें ॥

 

विवेकाने ‘शहाणा’ झालेल्या माणसाची योग्यता लोक ओळखतात. म्हणून जो खूप लोकांना मान्य झालेला आहे, त्याला ‘शहाणा’ म्हणावे. अशा शहाण्या माणसाला काही कमी पडत नाही. त्याच्या ठिकाणी विवेक सतत जागा असतो. मूर्ख माणसे या संसारात अपार कष्ट करीत असतात. मूर्खपणामुळे ते लोकांची बोलणी खातात. परंतु, शहाणा असे करीत नाही. तो विवेकाने वागतो, सारासार विचार करतो. तो सार निवडतो आणि असाराचा त्याग करतो. समर्थांनी ही विवेकाची शिकवण दासबोधात ठिकठिकाणी सांगितली आहे. स्वामींची कार्यपद्धती म्हणजे सर्वांना शहाणे करून सोडावे अशी आहे. समर्थांनी विवेकाची महती वारंवार सांगितली आहे. तितकी इतर संतवाङ्मयात सांगितलेली दिसून येत नाही. विवेकाचा पुरस्कार केल्याने आदर्श मूल्ये, कला, विद्या तसेच शास्त्र उदय पावतात. विवेक बाळगल्याने कल्याणकारी, आनंदमय आणि ज्ञानमय ध्येये तयार होतात. त्याच प्रकारची मूल्ये समाजाचे कल्याण करतात. समर्थांइतका विवेकाचा पुरस्कार जगातील इतर तत्त्ववेत्त्यांमध्ये क्वचितच दिसून येतो. जगातील तत्त्ववेत्यांचा विचार करता युरोपातील नेदरलँडचा तत्त्ववेत्ता बेनेडिक्ट स्पिनोझा याने तत्त्वज्ञानात विवेकाचा पुरस्कार केलेला दिसून येतो. स्पिनोझाचा जन्म इ.स. १६३२चा असून तो इ.स. १६७७ साली मृत्यू पावला. समर्थांचा काळ इ. स. १६०८ ते १६८१ असा आहे. याचा अर्थ तत्त्वज्ञ स्पिनोझा हा समर्थांचा समकालीन होता. दोघांनीही एकाच कालखंडात भिन्न भिन्न ठिकाणी विवेकाचा पुरस्कार केला, हे आश्चर्यकारक होय! विवेकाच्या तत्त्वज्ञानाला मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले-वाईट यातून सारासार बुद्धीने चांगल्याची निवड करणे व वाईटचा त्याग करणे याला ‘विवेक’ म्हणता येते. तथापि समर्थांच्या मते, दोन चांगल्या गोष्टी समोर आल्या तरी त्यातील अधिक चांगली गोष्ट शोधून तिची निवड करणे व तिचा स्वीकार करणे हा खरा विवेक होय. समर्थांनी हा विवेक निरनिराळया पातळ्यांवर आयुष्यभर केला.

 

- सुरेश जाखडी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat