जगभर.. जाहिरातींच्या आडून

    दिनांक  26-Jun-2019   महिलांनी कसे जगावे, हे तिथल्या संस्कृतीच्या ठेकेदारांना अपेक्षित असलेले हे विधान. तसेच शेवटी पाकिस्तानी महिला क्रिकेट टीमची कप्तान बिस्माह मारूफ दिसते. ती म्हणते, "चार दिवारों में रहो, ये बात नही बल्की दाग है." याच गोष्टीवर पाकिस्तानमधील तथाकथित इस्लाम रक्षकांचा आक्षेप आहे.


'दाग अच्छे है' या टॅगलाईनसह सर्फ डिटर्जन्ट पावडरची 'प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्ब्लर'ने बनवलेली पाकिस्तानातील एक जाहिरात सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. पण, जमेल तिथे, जमेल तसा पाकिस्तानी पुरुषवर्ग या जाहिरातीच्या निषेधात रस्त्यावर उतरला आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांवरही या जाहिरातीविरुद्ध अगदी युद्धसदृश्य स्थिती झाली आहे. कारण, या जाहिरातीमध्ये पाकिस्तानमधील नामांकित महिला क्रिकेट खेळाडू तसेच डॉक्टर, शिक्षक आणि इतर प्रतिष्ठित पेशातील महिलांचा समावेश आहे. अर्थात त्या नकाबपोश नाहीत, तर या महिला काय करतात की, काही मळलेल्या चादरी ओढून काढून, त्या चादरी सर्फने स्वच्छ धुतात. इथपर्यंत ठीक होते. पण, यामध्ये एक महत्त्वाची आणि इस्लामी संस्कृतीच्या दृष्टीने तर अतिमहत्त्वाची गोष्ट होती. ती म्हणजे, महिला ज्या चादरी 'मळक्या' म्हणून फेकतात, त्या चादरींवर लिहिलेले असते, 'लोग क्या कहेंगे, चार दिवारों मे रहो' वगैरे वगैरे. महिलांनी कसे जगावे, हे तिथल्या संस्कृतीच्या ठेकेदारांना अपेक्षित असलेले हे विधान. तसेच शेवटी पाकिस्तानी महिला क्रिकेट टीमची कप्तान बिस्माह मारूफ दिसते. ती म्हणते, "चार दिवारों में रहो, ये बात नही बल्की दाग है." याच गोष्टीवर पाकिस्तानमधील तथाकथित इस्लाम रक्षकांचा आक्षेप आहे. घरोघरी महिलांचा संबंध ज्या वस्तूशी येतो, त्या कपडे स्वच्छ करणाऱ्या डिटर्जंट बारच्या माध्यमातून या जाहिरातीमध्ये सांगितले गेले की, 'चार दिवारों में रहो, ये बात नही बल्की दाग है.' तसेच, 'ये दाग क्या हमे रोकेगा?' असेही ती म्हणते. म्हणजे पाकिस्तानी धर्मांधांच्या मते, ही जाहिरात सरळसरळ पाकिस्तानी महिलांना बंड करायला प्रेरित करते. या जाहिरातीला विरोध करताना पाकिस्तान्यांची मानसिकता दिसून येते. त्यांना स्त्री ही चार भितींच्या आड, कोणतीही इच्छा, अस्तित्व नसलेलीच हवी आहे. तिने स्वतःचे आकाश निर्माण करूच नये जणू...

 

अर्थात, पाकिस्तानचा विषय असल्यामुळे तिथे महिलांबाबत दुटप्पी नियम असणारच, हे जरी गृहित धरले तरी जगभरात जाहिरात क्षेत्रामध्ये यापेक्षा काही वेगळे घडते असेही नाही. जगभरच्या जाहिरातींचा मागोवा घेतला तर, स्त्रीदेहाकडे वस्तूंची मागणी वाढविण्यासाठीचे एक हत्यार म्हणूनच पाहिले गेले. साबण, तेल, शॅम्पू, क्रीम, सेंट वगैरेमध्ये 'ती' असतेच असते, पण जिथे दुरान्वयेही तिचा संबंध नसतो, तिथेही मुद्दाम स्त्रीदेहाचे प्रदर्शन असतेच असते. पण, तिचे 'असणे' हे केवळ कुणाला तरी आकर्षित करण्यापलीकडे नसते. का? या 'का'ला उत्तर नाही. कारण, 'जो बिकता है वही चलता है.' अर्थात, असे जरी असले तरी सौंदर्याचे मापदंड ठरवून त्यापलीकडे रूपरंग असणारे दोषीच आहेत की काय? अशा जाहिरातींचे पेवच फुटलेले. त्वचेचा रंग गोराच असला पाहिजे, स्त्रीची आणि पुरुषांचीही शरीरं ठरवलेल्या मापातच असली पाहिजे, देह उंचच असला पाहिजे, केस मुलायमच हवेत, तसे नसेल तर ते तसे होण्यासाठी आतापासूनच क्रीम, लोशन, शॅम्पू, साबण लावायला हवा अशा सांगणाऱ्या जाहिराती.. काय सांगतात? गोरे नसलेले, रूंद बांध्याचे, उंचीने कमी असलेले लोक तुच्छच आहेत का? यावर कुणीच काही बोलत नाही.

 

पाकिस्तानी जाहिरातींच्या निमित्ताने दोन जाहिरातींचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. या जाहिराती महिलांचा वापर करून वर्ण, वंशभेदाचा एक क्रूर पर्याय उभा करतात. एक जाहिरात एका क्रीमची आणि एक लोशनची. क्रीमच्या जाहिरातीची टॅगलाईन होती 'व्हाईट इज प्युअर.' अर्थात, इथेही सुंदर गोऱ्या त्वचेची महिला होतीच. पण, या टॅगलाईनचा विचार केला तर वाटते की, 'व्हाईट इज प्युअर' असते, तर मग इतर रंग भेसळ असतात का? घाण असतात का? हा मामला नुसता रंगाचा आहे की वर्णभेद, वंशभेदाचा आहे? दुसरी 'लोशन'ची. एक काळ्या रंगाची महिला 'लोशन' लावते आणि वरचा टॉप बदलल्यावर ती पाश्चात्त्य महिलेसारखी गौरवर्णीय होते. का? पाश्चात्त्यांसारखे दिसणे म्हणजेच अतिसुंदर किंवा महान आहे का? असो, तर या अशा जाहिराती पाहून वाटते, या जाहिरातीमधून नक्की वस्तू विकायच्या असतात की, आपली जी काही मतं आहेत ती लोकांवर थोपवायची असतात. जगाच्या पाठीवर जाहिरातीच्या विश्वात असे थंड संस्कृतीयुद्ध सुरू आहे. त्याचा मागोवा घेतला तर एक वेगळेच विश्व दिसेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat