बेजार ते पिळदार...

    दिनांक  26-Jun-2019   एचआयव्ही एड्सग्रस्त के. प्रदीपकुमार सिंगने शरीरसौष्ठवपटूंनाही लाजवेल असे शरीर कमवून 'मिस्टर मणिपूर,' 'मिस्टर इंडिया,' 'मिस्टर साऊथ एशिया' यांसारखे मानसन्मान पटकाविले आहेत. त्याच्या जिद्दीची ही कहाणी...


आज १ डिसेंबर अर्थात 'जागतिक एड्स दिन'ही नाही किंवा एड्सविषयी जनजागृतीचे इतर कुठलेही 'औचित्य' नाही. कारण, हल्ली 'योग दिन' आला की योगासने, 'एड्स दिन' आला की एचआयव्हीग्रस्तांच्या व्यथा वगैरे असे सगळे काही विशिष्ट तारखांपुरतेच घुटमळताना दिसते. म्हणूनच, कुठल्याही निमित्ताशिवाय आज एड्सशी लढा देऊन 'शरीरसौष्ठवपटू' म्हणून नाव कमावलेल्या प्रदीपकुमारच्या जिद्दीची ही प्रेरणादायी कहाणी...

 

आपल्याला साधी डोकेदुखी, पोटदुखीचा त्रास जरी जाणवत असेल, तरी शरीर पुरते कोमेजून जाते. एक प्रकारची अस्वस्थता, थकवा शरीरासह मनालाही लाचार करून टाकतो. डॉक्टरांकडे आपण धाव घेऊन उपचार घेतो आणि मगच पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतो. मणिपूरच्या प्रदीपकुमारच्या नशिबात यापैकी काहीच आले नाही. २००० साली एचआयव्ही एड्सचे निदान झाल्यानंतर त्याच्या आयुष्याला अंधकाराने व्यापून टाकले. तब्बल तीन वर्षं प्रदीपकुमार स्वत:च्याच घरातील काळकोठडीत बंदिस्त होता. सूर्यप्रकाशाच्या किरणांचाही त्याच्या त्या निपचित पडलेल्या शरीराला स्पर्श झाला नाही. ड्रग्जचे व्यसन, व्यसनातून शरीराला सततची टोचणी प्रदीपकुमारच्या आयुष्यात कायमस्वरूपी एक मृत्यूचे छिद्रच तयार करून गेली. नातेवाईक, मित्रमंडळींही प्रदीपच्या सावलीला उभी राहिली नाहीत. आपले आयुष्य आता संपल्यात जमा आहे, आज आहे, उद्या नाही, या भावनेने प्रदीप नैराश्याच्या गर्तेत अगदी खोलवर बुडाला. इतका की, आत्महत्येचे विचारही वरचेवर त्याच्याशी लपंडाव खेळत. केवळ आणि केवळ त्याच्या कुटुंबाने दाखवलेल्या सामंजस्यामुळे प्रदीपचे हृदय धडधडत होते. शरीरवेदना असंख्य होत्या, पण मनसंवेदना नसल्यातच जमा होत्या. एक दिवस प्रदीपने आपल्या वहिनीला चंपाच्या फुलाला पाणी देताना बारकाईने पाहिले. झाडाला दैनंदिन पाणी दिल्यामुळे होणारी चंपाच्या फुलझाडाची वाढही प्रदीपच्या नजरांनी अलगद टिपली. आशेचा किरण प्रदीपच्या मनात लख्ख प्रकाश पाडून गेला. झाडापासून प्रेरणा घेत, मग प्रदीपनेही स्वत:वर मेहनत घेण्याचा निर्णय मनोमनी पक्का केला. त्यासाठी त्याने सोपा नाही, तर सगळ्यात खडतर, आव्हानात्मक असा शरीरसौष्ठवाचा मार्ग निवडला. शरीरसौष्ठवसाठी नियमित पौष्टिक आहार, खडतर व्यायाम आणि व्यसनमुक्तीचा मार्ग प्रदीपने स्वीकारला. प्रदीपला दीप घेऊन मार्ग दाखवायला कुणी नव्हते. शरीरसौष्ठवावरील पुस्तके वाचून प्रदीपने शरीराला पैलू पाडण्यास सुरुवात केली. जगण्याची जी प्रेरणा, उमेद, ऊर्जा प्रदीप पार गमावून बसला होता, तिचा पुन्हा एकदा त्याच्या अंगी संचार होत होता. गमावलेला आत्मविश्वासही याच दरम्यान प्रदीपने पुन्हा संपादित केला. 'होय, मी एचआयव्हीबाधित आहे,' हे तो न शरमता सांगू लागला. एकेदिवशी प्रदीपच्या भावाने त्याला चक्क शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेण्यास सांगितले आणि काय आश्चर्य, ती पहिलीवहिली स्पर्धाही प्रदीपने आपल्या नावावर केली. त्यानंतर प्रदीपने कधीही मागे वळून पाहिले नाही.

 

पण, या खडतर प्रवासात अपुऱ्या वैद्यकीय सुविधांचाही प्रदीपला सामना करावा लागला. इतकेच नाही तर मणिपूरमधील सरकारी रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका प्रदीपचा स्पर्शही होऊ नये, म्हणून त्याच्या गोळ्या बाजूला ठेवत. रुग्णालयाकडून साधी उशी-चादरही प्रदीप केवळ एचआयव्हीबाधित असल्यामुळे त्याच्या नशिबी नव्हती. प्रदीप सांगतो, “मी रुग्णालयात गेल्यावर मला तपासण्यासाठी कोणीही डॉक्टर तयार नव्हते. माझ्याशी अतिशय भेदभावपूर्ण वर्तणूक केली जाई. इतर लोक अज्ञानामुळे एचआयव्हीबाधित व्यक्तीपासून दूर राहतात, पण डॉक्टर-परिचारिकांचे काय?” यावरून, वैद्यकीय क्षेत्रातच एड्सविषयीची अपुरी जनजागृती आणि एकूणच अनास्था यांचे केविलवाणे रूप समोर येते. आज ४६ वर्षीय प्रदीप एक सामान्य जीवन जगतो आहे. छोट्यामोठ्या शारीरिक व्याधींवर त्याचे औषधोपचारही सुरू असतात. पण, मनाने तो आता स्वस्थ आहे. स्थिर आहे. प्रदीपच्या याच जिद्द आणि चिकाटीमुळे तो मणिपूरच्या एड्स नियंत्रण संस्थेचा चेहरा ठरला. एड्सविषयी जनजागृतीबरोबरच प्रदीप व्यसनाधीनतेविरोधताही मैदानात पूर्ण ताकदीनिशी उतरला. कारण, खासकरून मणिपूर आणि ईशान्य भारतात व्यसनाधीनतेचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. त्याचे एक कारण म्हणजे अगदी सहजपणे उपलब्ध होणारे विविध प्रकारचे ड्रग्ज. त्यामुळे विविध शालेय-महाविद्यालयीन कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून प्रदीप मणिपूरच्या तरुणाईला व्यसनमुक्तीचा संदेश देत फिरत असतो. पत्रकार जयंता कलिता यांनी 'I Am HIV Positive, So What?' या नावाचे प्रदीपकुमारचे आत्मचरित्रपर पुस्तकही प्रकाशित केले आहे. आज एकट्या भारतात २० लाखांहून अधिक रुग्ण एचआयव्हीबाधित असून ही संख्या पुढील काही काळात कमी होण्याची आशा आहे. पण, त्यासाठी गरज आहे ती एचआयव्हीबाधितांना माणूस म्हणून वागवण्याची, त्यांना माणुसकीने जगवण्याची... त्यासाठी प्रदीपकुमार आणि इतर अशी शेकडो उदाहरणे आदर्श ठरू शकतात.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat