गोरक्षकावर कसायांच्या जमावाचा जीवघेणा हल्ला

    दिनांक  25-Jun-2019


 


बदलापूर : बदलापूरमधील अवैध कत्तलखान्यात गायींना कत्तलीपासून वाचवण्यासाठी गेलेल्या चेतन शर्मा या प्राणीमित्रावर कसायांच्या ३०० ते ४०० जणांच्या जमावाने जीवघेणी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे चेतन शर्मा अवैध कत्तलखान्यांच्या तावडीतून गायींना सोडवण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्याबरोबर ३५ ते ४० पोलिसांचा फौजफाटाही होता, तरीही त्यांना जबर मारहाण करण्यात आली.

 

चेतन शर्मा यांच्यावरील हल्ल्याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बदलापूरमधील अवैध कत्तलखान्यात गोहत्या केली जात असल्याचे प्रकरण अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. प्राणीमित्र, गोसेवक आणि विविध संघटनांनी याविरोधात वेळोवेळी भूमिका घेतली, परंतु, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. अखेर सोमवारी (दि. २४ जून) मध्यरात्री बदलापूरमधील अवैध कत्तलखान्याविरोधात कारवाई करण्यासाठी चेतन शर्मा यांच्यासह ३५ ते ४० पोलीस गेले. परंतु, चेतन शर्मा आणि पोलिसांना कत्तलखान्याकडे येत असल्याचे पाहून एकाएकी ३०० ते ४०० कसाई जमा झाले व त्यांनीच उलटा पोलिसांवर तसेच चेतन शर्मा यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनीदेखील आपल्यावर चालून आलेल्या जमावाविरोधात लाठीमार वा अन्य मार्गांचा अवलंब केला नाही. परिणामी, कसायांचा धीर वाढला व चार-पाच जणांनी एकत्र येऊन एका एका पोलिसाला घेरले. तसेच त्यांना कारवाईपासून परावृत्त करू लागले. याचवेळी कसायांपैकी काहींनी चेतन शर्मा यांना लोखंडी रॉडने मारहाण करायला सुरुवात केली. लोखंडी रॉडच्या प्राणघातक हल्ल्याने चेतन शर्मा यांचे डोके फुटले. तरीही पोलिसांनी आक्रमकांना रोखण्याचा प्रयत्न न केल्याने अखेर चेतन शर्मा यांना स्वसंरक्षणासाठी असलेल्या रिव्हॉल्व्हरचा वापर करत हवेत गोळीबार करावा लागला.

 

चेतन शर्मा यांनी हवेत गोळीबार केल्याने कसाई मागे फिरल्याचे लक्षात येताच पोलिसांनीही डोके फुटलेल्या चेतन शर्मा यांना आपल्या गाडीत बसवले. पण गाडी पुढे चालू लागताच कसाई पुन्हा चाल करून आले, त्यांनी पोलिसांच्या गाडीची चावी काढली आणि त्यावरही हल्ला केला. नंतर पोलिसांनी कशीबशी त्यातून स्वतःची सुटका करून घेत गाडी पळवली. परंतु, कसायांनी त्या गाडीचाही २५ ते ३० किमीपर्यंत पाठलाग केला. पुढे चेतन शर्मा यांना अंबरनाथमध्ये आणण्यात आले व त्यांना एका रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला गेला. ‘पीपल फॉर अ‍ॅनिमल’ चे कार्यकर्तेही यावेळी तिथे आले, पण अंबरनाथमधील रुग्णालयाने चेतन शर्मा यांच्या डोक्यावरील मारहाण पाहता त्यांना अन्य ठिकाणी हलवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे चेतन शर्मा यांना डोंबिवलीतील नेपच्यून रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या त्यांच्यावर इथल्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची परिस्थिती नाजूक आहे.

 

दरम्यान, चेतन शर्मा यांना झालेल्या जीवघेण्या मारहाणीचा निषेध म्हणून मंगळवारी ‘पीपल फॉर अ‍ॅनिमल’ संघटनेसह अन्यही अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या सहायक पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्वच कार्यकर्त्यांना कसायांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिलेतसेच बदलापूर पोलिसांनी मारहाण करणार्‍या अज्ञातांविरोधात भादंवि कलम १४७, १४३, १४९ आणि ३५३ नुसार गुन्हा दाखल केला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

 

आम्हीच सुरक्षित बाहेर काढले

 

अवैध कत्तलखान्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही गेलो, परंतु, कत्तलखान्याच्या बाजूलाच मोहल्ला असल्याने पोलिसांच्या गाड्या पाहून तिथली माणसे बघायला आली. चेतन शर्माला आमच्याबरोबर पाहिल्याने ते अंगावर धावून आले. आपल्याला होत असलेली मारहाण पाहून चेतन शर्मा यांनी घाबरून जात हवेत गोळीबार केला. नंतर आम्हीच त्यांना जमावाच्या तावडीतून बाहेर काढले, कारण ती आमची जबाबदारी होती व आता आम्ही हल्लेखोरांवर गन्हा दाखल केलेला आहे.

 

- लक्ष्मण सारीपुत्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat