भारतमाता मंदिराचा अध्वर्यु

    दिनांक  25-Jun-2019   ‘भारतमाता मंदिरा’चे संस्थापक स्वामी सत्यमित्रानंद यांचे मंगळवारी महानिर्वाण झाले. रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजींचा स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांच्या जीवनावर मोठा प्रभाव होता. अखंड मानव व धर्मसेवेचे कार्य करण्याच्या इच्छेने शंकराचार्य पदाचा, मठाचा, वैभवाचाही त्याग करणाऱ्या सत्यमित्रानंदांनी पहिल्यांदा श्रीगुरुजींची भेट घेतली. त्यावेळी गुरुजींनी सत्यमित्रानंदांच्या निर्णयाचे समर्थन करत “आता तुम्ही समाजसेवा अधिक उत्तम प्रकारे करू शकता,” असे म्हटले होते.


स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांचा जन्म दि. १९ सप्टेंबर १९३२ रोजी आग्रा येथे झाला. सत्यमित्रानंदांचे वडील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिवशंकर पांडेय एका सरकारी विद्यालयात शिक्षक होते. आपल्या मुलाचे नाव त्यांनी ‘अंबिकाप्रसाद’ ठेवले होते. शिवशंकर यांनी अंबिकाप्रसादला बालपणापासून अध्ययन, चिंतन आणि सेवेची शिकवण आणि आपल्या ध्येयाप्रति सजग व सक्रिय राहण्याची प्रेरणा दिली. सुरुवातीपासूनच अध्यात्मात रुची असलेल्या अंबिकाप्रसादचे मनही मानव आणि धर्मसेवेतच अधिक रमत असे, तसेच सांसारिक जीवनाबद्दल त्यांना कसलाही जिव्हाळा वा प्रेमभाव वाटत नसे. विशेष म्हणजे, वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांनी नैमिषारण्यात जात प्राचीन धर्मग्रंथांचा अभ्यास सुरू केला, इथे स्वामी वेदव्यासानंद सरस्वती यांनी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. एकदा याच ठिकाणी रा. स्व. संघाचे हिवाळी शिबीर सुरू होते आणि तत्कालीन सरसंघचालक श्रीगुरुजीही तिथे आले होते. अंबिकाप्रसादांच्या मनात श्रीगुरुजींविषयी श्रद्धा होती. त्यामुळे ते पायी पायी चालत शिबीरस्थानी आले आणि त्यांनी गुरुजींना आपल्या आश्रमात येण्याचा आग्रह केला. परंतु, गुरुजींचा पुढील प्रवास निश्चित असल्याने अंबिकाप्रसादांनी अट्टाहास न करता गुरुजींनी दिलेले गरम दूध तेवढे प्यायले. गुरुजींच्या या भेटीने आणि वर्तणुकीने अंबिकाप्रसादांच्या मनात संघाची अमिट छाप उमटली, जी त्यांच्या जीवनाच्या अखेरपर्यंत तशीच होती. पुढे १९४९ मध्ये अंबिकाप्रसादांनी वरिष्ठ संघप्रचारक आणि समाजसेवक नानाजी देशमुखांचे भाषण ऐकले व तेव्हापासून ते संघाच्या अधिकच जवळ आले.

 

दरम्यान, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९६० साली त्यांना मध्यप्रदेशातील ज्योतिर्मठ भानुपुरा पीठाधीश शंकराचार्य स्वामी सदानंद गिरी यांनी संन्यास दीक्षा दिली व अंबिकाप्रसादांचे स्वामी सत्यमित्रानंद गिरी झाले, तसेच पीठाच्या शंकराचार्यपदीही वयाच्या केवळ २६व्या वर्षी त्यांचा अभिषेक करण्यात आला. परंतु, बालपणापासूनच मानव व धर्मसेवेकडे ओढा असलेल्या सत्यमित्रानंदांचे मन आश्रमाच्या वैभवात, पूजाअर्चनेत कमीच लागत असे. गरिबांमध्ये जाऊन, त्यांच्या दुःख-वेदना दूर करण्याची, त्यांची सेवा करण्याची भावना सत्यमित्रानंदांच्या मनात वसलेली होती. परिणामी, आपल्या मानवसेवेच्या कार्यात आड येणाऱ्या शंकराचार्यपदाचा, आश्रमाचा कोणताही लाभ-लोभ न ठेवता त्यांनी त्याग केला. श्रीगुरुजीदेखील या काळात इंदोर येथे होते. हे कळताच स्वामीजी थेट तिथे गेले आणि आपण शंकराचार्यपदाचा त्याग केल्याचे श्रीगुरुजींना सांगितले. श्रीगुरुजींनी त्यावर प्रतिक्रिया देत, “आता तुम्ही समाजसेवा अधिक उत्तम प्रकारे करू शकता,” असे म्हटले. तद्नंतर स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी प्रख्यात डॉक्टर आर. एम. सोजतिया यांच्या सहकार्याने भानुपुरा व जवळपासच्या क्षेत्रातील दीन-दुखितांच्या, गरिबांच्या-निर्धनांच्या उत्थानाच्या दिशेने अनेक वर्षे कार्य केले. स्वामीजींनी आपल्या अवघ्या जीवनाचा गिरीवासी, वनवासी, दलितांच्या सेवेसाठी, सांप्रदायिक मतभेद दूर करण्यासाठी, जगभरात समन्वयाची, सौहार्दाची, सलोख्याची भावना जागवण्यासाठी होम केला. देश-विदेशात कितीतरी ठिकाणी मानव सेवा आणि वंचितांच्या-पीडितांच्या सेवार्थ कार्यक्रम केले, ज्यातील कितीतरी उपक्रम आजही सुरू आहेत. मानवसेवेच्या याच कार्यामुळे स्वामीजींची ख्याती जितकी देशात होती तितकाच मान-सन्मान त्यांना विदेशातही मिळत असे. स्वामीजींच्या याच कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना देशाच्या तिसऱ्या सर्वोच्च पुरस्काराने-‘पद्मभूषण’ने अलंकृत केले.

 

स्वामी सत्यमित्रानंदांनी मानवसेवेच्या कार्याव्यतिरिक्त आणखीही एक महान कार्य केले, ज्यामुळे संपूर्ण जगभरात त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली. पतितपावन गंगा नदीच्या किनारी असलेल्या सप्तसरोवर परिसरात सन 1983मध्ये स्वामीजींनी अनोख्या अशा १०८ फूट उंच आणि आठ मजली ‘भारतमाता मंदिरा’ची स्थापना केली. उल्लेखनीय म्हणजे, भारतामाता मंदिराच्या उद्घाटनासाठी दोन विभिन्न विचारधारेच्या-तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि रा. स्व. संघाचे वरिष्ठ पदाधिकारी रज्जूभैय्या यांना एकाच मंचावर आणण्याचे मोठे अवघड कामही स्वामी सत्यमित्रानंद यांनी केले होते. ‘भारतमाता मंदिर’ भारताच्या निर्मितीत, संरक्षणात सर्वस्वाचा त्याग करत आहुति देणाऱ्या भारतमातेच्या सुपुत्रांना समर्पित आहे. इथे प्रत्येक मजल्यावर भारतातील महान स्त्री-पुरुषांच्या, क्रांतिकारकांच्या, समाजसेवकांच्या प्रतिमा आहेत. हे सर्व विलोभनीय आणि भावविभोर करणारे दृश्य पाहताना मंदिराला भेट देणाऱ्यांना सर्वात तळाशी अखंड भारताचे मानचित्र दृष्टीस पडते. इथेच सुजलाम्, सुफलाम् भारतमातेच्या विराट मूर्तीचे दर्शन घेऊन प्रत्येकजण नतमस्तक होतो. परंतु, भारतमाता मंदिरात अन्य मंदिरांप्रमाणे पूजा-अर्चना, नैवेद्य, स्नानादी कर्मकांडांचे सोपस्कार केले जात नाहीत. तर इथे ‘भारतमाता मंदिर’ तथा ‘समन्वय सेवा ट्रस्ट’द्वारे अनेक सेवाकार्ये चालवली जातात. यात वेद पाठशाळा, दिव्यांग आणि कुष्ठरोग्यांची सेवा, रुग्णवाहिका, वृद्धाश्रम, दृष्टीहिनांची सेवा, हुतात्मा परिवारांची सेवा, सफाई कर्मचाऱ्यांची सेवा आदी प्रमुख कार्य आहेत. आपल्या कार्याच्या माध्यमातून कोट्यवधी भारतीयांना चिरंतन प्रेरणा देणाऱ्या स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat