सकारात्मक समरस समाजासाठी...

    दिनांक  25-Jun-2019   


 


समाजउत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणार्‍या अशोक शेल्हाळकर यांच्या शब्दाला समाजात चांगलीच किंमत आहे. माझगाव डॉकमध्ये उच्चपदावर कार्यरत अशोक शेल्हाळकर हे सकारात्मक समरस समाजाबाबत आशावादी आहेत.

 

माझ्या आयुष्यातला अभिमानाचा प्रसंग म्हणाल किंवा प्रेरणादायी प्रसंग म्हणाल, तर माझ्या डोळ्यांसमोर तो एक क्षण आठवतो. रा. स्व. संघाचा वर्ग होता. मला तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचा अंगरक्षक म्हणून जबाबदारी दिली होती. खरे सांगतो, तो माझ्यासाठी सन्मानाचा क्षण होता. आर्थिक आणि सामाजिकस्तरावर अत्यंत उतरंडीचे जगणे असलेल्या कुटुंबातला मी, माझ्या आयुष्याचे सोने त्या क्षणाने झाले. खरे तर रा. स्व. संघानेच माझे आयुष्य बदलले, असे म्हणायला हरकत नाही." 'माझगाव डॉक शीपबिल्डर लिमिटेड’मध्ये अतिरिक्त महाप्रबंधकपदावर कार्यरत असलेले अशोक मारुती शेल्हाळकर सांगत होते. अशोकशेल्हाळकर यांचे मूळ गाव शेल्हाळ, ता. उद्गीर, जि. लातूर. अशोक यांचे वडील मारुती हे बसचालक, तर आई धोंडाबाई या गृहिणी.

 

एकूण चार अपत्ये झाली. त्यापैकी एक अशोक. अर्थात, आर्थिक आणि सामाजिक मागास स्तरावरील कुटुंबाचे जे जगणे, जे भोगणे, तेच सर्व अशोक यांच्या आयुष्यात सहजपणे आलेले. त्यामुळे वडील कामाला असूनही घरात कष्ट केल्याशिवाय भाकरी मिळणे मुश्किलच होते. त्यातच दुष्काळी परिस्थितीमुळे गावात जगणेच मुश्किल झालेले. अशोक यांचे आईवडील सरकारी योजनेच्याअंतर्गत गायरान जमिनीतील तण काढायला जायचे. त्यांच्या पाठी अशोकही जात. तेवढाच त्यांना हातभार लागे. 'कष्टामुळे त्रास होतो’ वगैरे म्हणायची सोय त्यावेळी नव्हती. त्याच दुष्काळात लहानगे अशोक रस्ता बांधण्याच्या कामालाही जायचे. 'जगणे’ हे असे होेते. पण, या जगण्याव्यतिरिक्त दुसरेही 'जगणे’ असते, हेसुद्धा माहिती नसण्याचा तो काळ. सरकारी रेशन दुकानात मिळणार्‍या 'सुकडी’ नावाच्या पदार्थावर कसेबसे पोट भरे.

 

पण, या सगळ्या कालावधीत अशोक यांच्या आयुष्याला अर्थ आला तो उद्गीरच्या लाल बहादूर शास्त्री विद्यालयामुळे. पाचवीमध्ये अशोक यांनी या शाळेत प्रवेश घेतला आणि त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. एक तर शाळा रा. स्व. संघाची. तिथे शिकण्यास येणारे विद्यार्थी विविध समाजाचे आणि कौटुंबिक पार्श्वभूमीचे. यामुळे अशोक यांच्या जाणिवा रूंदावल्या. कष्टाची सवय असल्याने अशोक खेळामध्ये नेहमी पुढे असत. त्यांचा गुण हेरत शाळेच्या शिक्षकांनी त्यांच्यावर विशेष मेहनत घेण्यास सुरुवात केली. या शाळेतील शिक्षक देवेंद्र देवणेकर यांच्या मार्गदर्शनामुळे अल्पावधीत अशोक वक्तृत्व, वादविवाद यांसारख्या स्पर्धांमध्ये अव्वल येऊ लागले. त्यातच शाळेच्या बाजूला संघाची शाखा भरे. पाचवीला असतानाच पहिल्यांदा ते शाखेत गेले आणि संघशक्तीने त्यांच्या आयुष्याला समर्थ रूप दिले.

 

शाळेचे एक शिक्षक मोहन मोरे हे मराठा समाजाचे. दुर्बल आणि वंचित समाजातील मुलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी आयुष्य वेचलेले. त्यांनी अशोकमधील गुण वेळीच हेरले. अशोक यांच्या घरी जाऊन त्यांनी आईवडिलांना सांगितले की, "मुलाला शिकवले, तर मुलगा खूप शिकेल. त्याच्या शिक्षणात बिल्कूल अडथळा येता कामा नये." त्यावेळी घरात वीज नव्हती किंवा घरी आणि वस्तीमध्येही शिक्षणाला योग्य वातावरणचनव्हते. त्यामुळे अशोक आणि त्यांच्यासारखीच इतर गरीब, होतकरू मुले मोरे गुरुजींच्या घरी रात्री अभ्यासाला जाऊ लागली. या मुलांमध्ये आमूलाग्र बदल होऊ लागला. चांगल्या सवयी आणि उत्तम संस्कार त्यांच्यावर होऊ लागले.

 

कष्ट करून रात्री गुरुजींच्या घरी अभ्यास करून अशोक यांना दहावीला ७८ टक्के मिळाले. गुरुजींनी आणि शाळेच्या समितीने ठरवले की, अशोक यांनी उच्च शिक्षण घ्यायला हवे. त्यावेळी अशोक यांच्या सोबत संघशाखेत असलेले मित्र किंवा शाळेतील उच्चभू्र समाजातील मित्र उच्चशिक्षण घेण्याची तयारीही करू लागले होते. मात्र, त्यावेळी काही लोकांचे ऐकून वडिलांना वाटले की, "मुलगा शिकला तर हाताबाहेर जाईल. दूर गेला तर तो पुन्हा येईल का?" पण, आईला वाटे की, अशोकने शिकावे. यावेळीही शाळेतील शिक्षक घरी आले. त्यांनी अशोकच्या अभियांत्रिकी शिक्षणाचे महत्त्व वडिलांना समजावले. तो बदलणार नाही, याची हमी दिली. अत्यंत नाखुशीने का होईना, पण वडिलांनी त्यांना औरंगाबादला शिक्षणासाठी पाठवले.

 

तिथेही शिष्यवृत्ती मिळवत अशोक यांनी चांगले गुण संपादन केले. तो काळ होता 'नामांतरा’चा. त्यावेळी रा. स्व. संघाच्या नाना नवले यांनी अशोक यांना मार्गदर्शन व सहकार्य केले. औरंगाबादमध्ये दंगलीचेच वातावरण. पण, अशोक यांच्या महाविद्यालयामध्ये किंवा वसतिगृहामध्ये हे दंगलीचे लोण पोहोचलेनाही. कारण, अशोक यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. मी तथाकथित मागास समाजाचा असूनही प्रत्येक वळणावर मला सवर्ण व्यक्तींनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन साथ दिली. जातीपातीचे राजकारण करून विद्यार्थ्यांचे नुकसान होते, हे मुलांना पटवून देत. तीच भूमिका ते आजही निभावत आहेत. समाजातील मुलांनी स्वत:चा, समाजाचा आणि देशाचा विकास करावा, समाजातील तरुणांनी जातीपाती पलीकडे जाऊन माणूस म्हणून उन्नती करावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. सकारात्मक समाजासाठी ते प्रचंड आशावादी आहेत. ते म्हणतात, "केल्याने होत आहे रे.. आधी केलेच पाहिजे..."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat