घराणेशाहीचा 'आनंद'

    दिनांक  24-Jun-2019   
घराणेशाही ही खरंतर भारतीय राजकारणाला आतल्या आत पोखरणारी एक घरगुती कीडच. कारण, घराणेशाहीची ही 'घाणेरडीशाही' पक्षांतर्गत नेतृत्वाबरोबरच संसद-राज्य सभागृहांतील लोकनेतृत्वही आपल्याच हाती एकवटते. परिणामी, इतर मेहनती कार्यकर्ते, नेतृत्वगुण अंगी बाणणारी नेतेमंडळी मात्र पक्षापासून, सत्तेपासून दुरावतात. काँग्रेसच्या पडझडीलाही हीच वंशपरंपरागत चालत आलेली घराणेशाहीकारणीभूत ठरली. बसपच्या सर्वेसर्वा मायावतींनीही हा घराणेशाहीचा कलंक आपल्या पदरी लागणार नाही, यासाठी भरपूर खटाटोप केले. पण, शेवटी खानदानी रक्ताशिवाय इतरांवर अविश्वास ठेवण्याच्या त्यांच्या वृत्तीचे कृतीत रूपांतर झाले आणि आधी लहान भाऊ आणि आता पुतण्याची बसपच्या उपाध्यक्षपदी ताजपोशी करून मायवतींनीही इतर राजकीय पक्षांचाच कित्ता गिरवला. मायावतींचा छोटा भाऊ आनंद कुमार हा पेशाने पक्का व्यावसायिक. २००७-२०१२ या काळात मायावती आणि त्यांच्या खर्‍याखुर्‍या 'बहनजी' मुख्यमंत्री असताना भावानेही साहजिकच डाव साधला. बहिणीच्या मुख्यमंत्रिपदाच्या हत्तीबळावर भावानेही अमाप संपत्तीसंचय केला. माध्यमांपासून, चर्चांपासून बहुतांशी दूर राहणारा हा मायावतींचा भाऊ मात्र 'इडी'च्या नजरेतून सुटला नाही. भ्रष्टाचार, सरकारी पदाचा गैरवापर करून आपले खिसे भरणारा हा मायावतींचा भाऊ याप्रकरणी चौकशीच्या फेर्‍यातडी अडकला. पण, त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तारुढ असल्याने मायावती कसेबसे हे प्रकरण मिटविण्यात यशस्वी झाल्या. तेव्हापासून मायावतींचा हा 'आनंद' कायम पडद्यामागेच राहिला. परंतु, २०१७ साली पुन्हा एकदा आपल्या भावाची निवड मायावतींनी उपाध्यक्षपदी करून अनेकांना अचंबित केले. भावाला 'पद' दिले आणि एक 'पण' मात्र त्याच्याकडून घेतला. तो असा की, आनंद कुमार पक्षाच्या मजबुतीसाठी, वाढीसाठी उपाध्यक्षपदी राहूनच अधिक अधिकारवाणीने काम करेल, पण कधीही, कुठलीही निवडणूक मात्र लढवणार नाही. मायावतींच्या या 'बंधुबंधना'चे त्यांच्या पक्षातही पडसाद उमटू लागले. ज्येष्ठ नेते आपल्या मुलांना, नातेवाईकांना तिकीट मिळावे म्हणून अधिक आग्रही झाले. पक्षाध्यक्ष-उपाध्यक्ष भाऊ-बहीण असू शकतात, तर पिता-पुत्र, काका-पुतण्या का नाही, म्हणून बसपमध्येही घराणेशाहीची एक लाट आली. असे झाल्यास कार्यकर्ते दुरावतील, आपल्या पक्षाचे भवितव्यही अंधारात येईल, या भीतीने अवघ्या एका वर्षात मायावतींनी आपल्या भावाला पदच्युत केले. परंतु, पुन्हा मायावतींना भावाऐवजी पुतण्याला उपाध्यक्षपद देऊन इतिहासाची पुनरावृत्ती का करावीशी वाटली, ते समजून घेतले पाहिजे.

 

घराणेशाहीचे मायावी 'आकाश'

 

मायावतींनी रविवारी दोन प्रमुख निर्णय घेतले. एक, भविष्यात राजकीय अपरिहार्यता म्हणूनही सपशी गठबंधन न करण्याचा आणि दुसरा म्हणजे, पुतण्या आकाश आनंदकडे पक्षाच्या उपाध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्याचा. मायावतींच्या या दोन्ही निर्णयांमागचे राजकीय गणित आणि अचूक 'टायमिंग' समजून घेतले पाहिजे. कारण, हे दोन्ही निर्णय परस्परांना अगदी पूरक आहेत. बसपचा सपशी असलेल्या महागठबंधनाचा काडीमोड लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येताच अपेक्षेप्रमाणे मायावतींनी जाहीर केला, तर रविवारी त्यावर अखेरीस शिक्कामोर्तबही झाले. निमित्त, उत्तर प्रदेशमध्ये होणार्‍या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पोटनिवडणुकांचे. सपशी हातमिळवणी करूनही अपेक्षित यश पदरी न पडल्याने आणि उलट तिकीटवाटपावेळी नेते-कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतल्यामुळे मायावतींनी यादवांशी फारकत घेतली. पण, सध्या मायावतींनी घेतलेल्या दुसर्‍या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, आकाशला उपाध्यक्षपदी बसवून मायावतींनी आपल्या राजकीय उत्तराधिकार्‍याच्या राज्याभिषेकाची तर तयारी सुरू केली नाही ना, अशा चर्चांना उधाण आले. पण, उत्तर प्रदेशातील सद्यस्थिती पाहता, मायावतींनी अवघ्या २४ वर्षीय पुतण्याच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ घालून राजकीय खेळीच खेळली आहे. सर्वप्रथम मायावतींच्या बसपमध्ये युवा चेहरा, युवा नेतृत्व नाही. त्यातच ठाकरे, पवार, पासवानांची दुसरी पिढी राजकारणात हळूहळू स्थिरावताना दिसते. पण, बसपमध्ये बहनजी एके बहनजी. त्यातच आजच्या तरुण मतदारांना मायावती, त्यांचा पक्ष, त्यांच्या राजनीतीचेही कौतुक नाहीच. म्हणून लंडनवरून एमबीए केलेल्या आपल्या पुतण्याला थेट उपाध्यक्षपदी बसवून, आपल्या पक्षाचा चेहरा तरुण, तडफदार दाखवून अधिकाधिक युवांना बसपकडे आकर्षित करण्याचा मायावतींचा हा प्रयत्न म्हणावा लागेल. त्याचबरोबर कांशीरामनंतर मायावती एकहाती पक्षाचा कारभार हाकताहेत. पण, आता पक्षाचा आणखी विस्तार करायचा असेल, निवडणुका जिंकायच्या असतील तर नेतृत्वाचे काहीसे विकेंद्रीकरण केल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठीच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर विश्वास न ठेवता, मायावतींनी घरातलाच हक्काचा, विश्वासाचा माणूस उपाध्यक्षपदी नेमला. मायावतींचे ट्विटर अकाऊंट सांभाळणारा, अवघ्या काही रॅलींमध्ये बसपसाठी मत मागणारा आकाश, बहनजींच्या पक्षात कितपत प्राण फुंकतो, ते पाहणे आगामी काळात औत्सुक्याचे ठरेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat