आम्हाला नको, असे सांगून टाका!

    दिनांक  24-Jun-2019स्वतःला सत्ता मिळवायची असेल तर अफाट परिश्रम करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते. त्यामुळेच उद्धवजींची तशी काही इच्छा असेल तर त्यासाठी त्यांनी नक्कीच कंबर कसावी, तयारी करावी; अन्यथा आम्हाला नको ते सत्तेचे ताट, नको ते सत्तेचे आसन,असे सांगावे!

 

"मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणार्‍यांनी शेतकर्‍यांचा क्षोभ शमवावा; अन्यथा ते सत्तेची आसने जाळून खाक करतील," असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केले. प्रसारमाध्यमांनादेखील उद्धवजींच्या या शब्दांमध्ये सरकारला दिलेला 'इशारा’ वगैरे दिसला, पण तो इशारा नव्हे तर शिवसेनेचा सत्तेसाठी चालू असलेला आटापिटाच असल्याचे कोणीही सांगू शकेल. कारण, सत्तेत मनाजोगा वाटा मिळाला नाही की, अशा पद्धतीची विधाने शिवसेना वा त्या पक्षाच्या छोट्या-मोठ्या कार्यकर्ते-नेत्यांकडून नेहमीच केली जातात. गेली पाच वर्षे महाराष्ट्राने त्याचा चांगलाच अनुभव घेतला असून मागील १५-२० दिवसांतही राज्यातील नागरिकांना शिवसेनेची असमाधानी बडबड पुन्हा एकदा ऐकता आली. "आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे नेतृत्व करतील", "पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच", "सगळे कसे समसमान पाहिजे," ही शिवसेना नेत्यांची भाषा म्हणजे सत्तेत राहूनही ती स्वैरपणे उपभोगता येत नाही, हे दाखविणारीच होती. आताचे "...तर सत्तेची आसने जळून खाक होतील," हे शिवसेना पक्षप्रमुखांचे विधानही त्याच मानसिकतेतून आलेले आहे.

 

वस्तुतः राजकारणाचा खेळ मोठा मजेशीर असतो. इथे मागून लाथा पडत असल्या तरीसुद्धा समोर चेहर्‍यावर उत्तम हसू आणून आपले आसू लपवावे लागते. ज्याच्याविषयी पराकोटीची असूया वाटते, त्याला मिठ्या मारून कौतुक करावे लागते. शिवसेनेचेही काहीसे असेच झालेले आहे आणि मतदारही शिवसेनेची ही अगतिगता चांगलीच ओळखून आहे. सोबतच युतीत राहिल्यामुळे शिवसेनेला सत्तेचे सगळे लाभ तर मिळतातच, पण सत्तेशिवाय अन्य पक्षात लागलेली जी गळती आपण पाहतो, ती रोखण्याचा एक चिकट गोंदसुद्धा मिळतो. सध्या काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार्‍यांची रीघ लागल्याचे चित्र सर्वत्रच दिसते.

 

इतकेच नव्हे, तर काही दिवसांपूर्वी काँग्रेसने विधानसभेत नेमलेले तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटीलदेखील भाजपमध्ये डेरेदाखल झाले. राष्ट्रवादीचीही तीच गत, त्यामुळेच त्या पक्षाच्या अजित पवारांवर "आता आमचा तिसरा विरोधी पक्षनेता तरी पळवू नका," अशा अजिजीच्या स्वरात बोलण्याची वेळ आली. शिवसेना जर सत्तेत राहिली नसती, तर त्या पक्षाची अवस्थादेखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आताच्या गळकेपणाहून वेगळी झाली नसती. मात्र, राजकारणात कोणतेही नियम नसतात, राजकारणात हे असेच चालत असते.

 

दुसर्‍याच्या डोक्यावरचा सत्तेचा मुकुट आपल्या डोक्यावर कसा फिट्ट बसेल, याचीच काळजी करताना लोक दिसतात. म्हणूनच एका पक्षातून दुसर्‍या पक्षात गेल्यास सत्तापदे मिळतील या मिषाने इकडून तिकडे उड्या मारल्या जातात. अर्थात लोकशाहीत ही अशी सत्तेची स्वप्ने पाहायला हरकत असण्याचेही कारण नाही. मात्र, ती पूर्ण करण्यासाठी आपल्या अंगी तशी 'नेतृत्व क्षमता’, 'संघटन कौशल्य’ आणि 'अधिष्ठान’ही असावे लागते आणि या तीन गोष्टींचा मेळ जिथे साधतो, तिथेच लोक राजकीय पक्षांच्या मागे येतात, असा आजतागायतचा अनुभव आहे.

 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा मोठा नेता लाभूनही शिवसेनेला केवळ एका राज्यात, तेही भाजपच्या साथीने फक्त साडेचार वर्षे मुख्यमंत्रिपद मिळवता आले होते. परंतु, उद्धवजींचे कौतुक असे की, देशात मोदीलाटेची त्सुनामी आलेली असतानाही त्यांनी आपले ६३ आमदार निवडून आणले होते. मात्र, त्यानंतरही त्यांना भाजपच्या मदतीनेच सत्तेत येता आले. २०१४ साली सत्तेत सहभागी होतानाचा शिवसेनेचा रुसवा-फुगवा अवघ्या महाराष्ट्रानेही पाहिला आणि मग पुढची पाच वर्षे चाललेला राजीनामानाट्याचा मनोरंजनात्मक अंकही लोकांनी चांगलाच अनुभवला. विशेष म्हणजे, याच भूमिकेवरून शिवसेनेची राजकीय वर्तुळापासून सर्वसामान्यांच्या जगातही यथेच्छ निर्भर्त्सना केली गेली, शिवसेना चेष्टेचा विषयही झाला.

 

"युतीत २५ वर्षे सडलो," यापासून "आता राजीनामा देणार, दोन दिवसांनी, १५ दिवसांनी, अधिवेशनाआधी, अधिवेशनानंतर, मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही तर राजीनामा देऊ," वगैरे वगैरे वल्गनाही शिवसेना नेत्यांनी याच काळात सातत्याने केल्या. खिशात राजीनामे घेऊन फिरत असल्याचेही शिवसेनेने सांगितले, पण ते देण्याचे धैर्य काही त्या पक्षाला झाले नाही. परिणामी, राज्यभरात शिवसेनेची खिल्ली उडवली गेली, पारा-पारांवरून समाजमाध्यमांतही शिवसेनेची भूमिका हास्यास्पद ठरली. आताचे शिवसेनेचे वागणेही त्याच पठडीचे म्हणावे लागेल. २०१४ साली शिवसेना जशी वागली त्याचाच दुसरा अध्याय हळूहळू सुरू होत असल्याचे गेल्या काही दिवसांतील घडामोडींतून दिसते.

 

नुकताच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यावेळी शिवसेनेच्या वेगवेगळ्या गोटातून आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करण्याच्या सूचनाही मोठ्या उत्साहाने दामटल्या गेल्या. मात्र, दोन-तीन दिवसांतच एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार होत असताना उद्धवजींनी रामलल्लाच्या दर्शनाच्या नावाखाली अयोध्या गाठली. अर्थात, ऐन मंत्रिमंडळ विस्तारावेळीच उद्धवजींच्या मुंबई सोडण्यावरून "या लोकांच्या हाती फारसे काही लागणार नाही," हे सुज्ञ राजकीय दर्शकांना न सांगताच कळून चुकले होते. अर्थात राजकारणात अपेक्षा ठेवत राहणे अजिबातच चुकीचे नाही. अनेकवेळा अशा अपेक्षा ठेवणे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना काम करण्यासाठी प्रेरणा देणारेही ठरते. मात्र, आधी म्हटल्याप्रमाणे 'ते’ तीन घटक जुळवता आले नाही, तर संबंधित पक्ष वा पक्षनेता चेष्टेचा विषय होतो, हे शिवसेनेने लक्षात ठेवावे.

 

दुसरीकडे शिवसेनेने सत्तेला नेहमीच सोन्याचे ताट मानले, पण ते मिळाले नाही तर मात्र हे सत्तेचे ताट जळून खाक होईल, त्याची राख होईल, अशी भाषाही वापरली. राजकारणाच्या क्षेत्रात असे होत असते, पण केवळ तोंडाची वाफ दवडून काहीही साध्य होत नसते. स्वतःला सत्ता मिळवायची असेल तर अफाट परिश्रम करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते. त्यामुळेच उद्धवजींची तशी काही इच्छा असेल तर त्यासाठी त्यांनी नक्कीच कंबर कसावी, तयारी करावी; अन्यथा आम्हाला नको ते सत्तेचे ताट, नको ते सत्तेचे आसन, असे सांगावे!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat