‘भोगी म्हणूनी स्वीकारा...’

    दिनांक  23-Jun-2019   
योग दिनीच आपल्या भोगवृत्तीची प्रचिती देणारे काही लोक आहेत. त्यांचे महामेरूपद अर्थातच जाते ते ‘राजकुमार’ यांना. अमेठीमधून ‘अंडे’ मिळवत वायनाडमधून धार्मिक विद्वेषाचा आधार घेत निवडून आलेले ‘राजकुमार.’ त्यांना योग दिनाचा तसा तिटकाराच. ‘राजकुमारां’च्या ‘आलू’पासून ‘सोनाबिना’ला झूठ ठरवणारे काही लोक म्हणतात, ‘राजकुमारांना योग आवडत नाही. कारण, योगबिग हे भारतीय आहे. तो काही विदेशी किंवा इटलीचा वारसा नाही.ज्यांच्याबद्दल लंडनचे नागरिक आहे की नाहीत, याबाबत मधून मधून शंका उपस्थित केली जाते, त्या ‘राजकुमारा’ला भारतीय परंपरेच्या योगसाधनेबद्दल आत्मीयता असणे शक्यच नाही. दुसरे असे की, सुट्टीच्या काळात थायलंड, बँकॉक वगैरे... ठिकाणी जाऊन आराम केल्यानंतर ‘योगबिग’मध्ये जीव शिणवून का घ्यावा, असा सुज्ञ विचारही ‘राजकुमार’ करतात. लोक काहीही म्हणाले म्हणून ‘राजकुमार’ आपले चाळे करायचे सोडत नाहीत. ते असते ना, ‘उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नकायाचे पालन राजकुमार कसोशीने करतात. स्थळ-काळ-वेळ याची जराही तमा न बाळगता कुठेही असू देत, ते त्यांचा वसा बिल्कूल सोडत नाहीत. त्यांचा वसा कोणता? तर त्यांचा वसा आहे - फालतू चाळे आणि निरर्थक मनोरंजन करण्याचा.’ इतर मनोजरंजनकर्त्यांना बक्षिस म्हणून पैसे, मान, सन्मान, शाबासकी मिळते. पण ‘राजकुमारां’नी केलेल्या मनोरंजनातून त्यांना केवळ जनतेचा रोष, निंदाच मिळते. लोकांच्या मनातून-नजरेतून उतरल्यावरही ते आपले फालतू चाळे करण्याचे सोडत नाहीत. योग दिनानिमित्त भारतीय सैन्य आणि भारतीय लष्करातील श्वान पथकाचे योग प्रात्यक्षिके करतानाचे छायाचित्र टाकून त्यावर ‘राजकुमारां’नी ‘न्यू इंडिया’ असे ट्विट केले. ‘राजकुमारां’नी केलेल्या ट्विटमधून त्यांचे भारतीय संस्कृती, संकल्पना याबाबत असणारे अज्ञान आणि वाटणारा द्वेष दिसला. तसेच भारतीय सैनिकांविषयीची अनास्था आणि अनादरही दिसला. राजकुमारांना योग आवडत नाही, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ‘भोगी म्हणूनी उपहासा मी योगी जन्माचाहे श्रीकृष्ण चरित्रावरचे उत्तम गीत. ‘या गीताची माफी मागून’ म्हणावेसे वाटते की, योग दिनामित्त काहीबाही बरळून ‘राजकुमारां’नी ‘भोगी म्हणूनी स्वीकारा... मी भोगी जन्माचा...’ हे वाक्य आयुष्याची टॅगलाईन बनवली असावी.

 

मधले ‘राजकुमार’ शून्य...

 

मनोरंजन करण्यात, स्वत:चे हसे करून घेण्यात ‘मोठे राजकुमार’ कुठेही कमी पडत नाहीत तसेच महाराष्ट्रातील ‘राजकुमार’ही कमी पडत नाहीत. थांबा! आता लगेच ब्लू प्रिंटवाल्या खळखट्याकवाल्या ‘राजकुमारां’ना मध्ये ओढू नका. ते तर ‘धाकले राजकुमार.’ आपले ‘मधले राजकुमार’ आहेत, ते जे स्वत:ला मागास समाजाचा मसिहा समजतात. मोठे वायनाडचे ‘राजकुमार’ जसे मोदीद्वेषातून बाहेर यायलाच तयार नाहीत तसेच ‘मधल्या राजकुमारां’चेही आहे. मोदीद्वेष, धार्मिक वर्गीकरण आणि इव्हीएम मशीन यांच्या प्रेमातून ‘मधले राजकुमार’ही बाहेर पडले नाहीत. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाला वैयक्तिकरीत्या एकही जागा जिंकता आली नाही, याचे मूल्यमापन करताना या ‘मधल्या राजकुमारां’नी इतका अभ्यास केला की त्यातून त्यांना उत्तर मिळाले की, भाजप जिंकला तो इव्हीएम मशीनमुळे. हरलेल्या बहुतेकांना वाटते की, इव्हीएम मशीनने त्यांची मते खाल्ली आणि खाल्लेल्या मतांची मिठाई भाजपला दिली. आता या सगळ्यांची ‘सच्चाई’ सगळ्या भारतीयांना ठाऊक आहे. त्यामुळे ते एकटे एकटे किंवा त्यांच्या गटातच इव्हीएम मशीनबाबत कोल्हेकुई करत असतात. तर या सगळ्यांप्रमाणाचे ‘मधल्या राजकुमारां’नाही ते हरल्याचे गमक इव्हीएम मशीनमध्ये आहे असे वाटते. आता ‘मधल्या राजकुमारां’ना हे असे वाटणे साहजिकच आहे. कारण, त्यांच्यासोबतच्या काही विघ्नसंतोषी लोकांनी गेल्या वर्षी महाराष्ट्रात जातीय तेढ माजवण्यासाठी जंगजंग पछाडले होते. त्यात समाज दुभंगेल, असे या लोकांना वाटले होते. मात्र, तसे झाले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जगणारा समाज एकसंधच राहिला. जाना था जपान, पोहोच गये चीन’ या एका प्रसिद्ध गीतासारखे ‘मधल्या राजकुमारां’चे झाले. महाराष्ट्राचे अनभिषिक्त राजे बनण्याचे स्वप्न पाहत असतानाच या राजकुमारांना सगळीकडेच शून्य... शून्याची कमाई झाली. ‘जशी संगत तशी पंगत.’ मात्र ‘मधले राजकुमार’ आता सगळीकडे सांगत आहेत की, केंद्र सरकारच्या पुन्हा मुदतपूर्व निवडणुका घेण्यास भाग पाडू. आता हे कोण भाग पाडणार? ते की त्यांचे विघ्नसंतोषी यार दोस्त ? हे मात्र ते बोलत नाहीत. मात्र, २०२४ पर्यंत इव्हीएम मशीनचे गीत ‘मोठे,‘ ‘मधले’ आणि ‘धाकले राजकुमार’ गातच राहतील यात शंका नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat